विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्रिजेन्टम् :- सिसीलीच्या दक्षिण किनार्यावरील शहर समुद्र किनार्यापासून २॥ मैलावर आहे. इ.पूर्वी ५८२ सालीं गॅलच्या वसाहतवाल्यांनीं हें शहर वसविलें. पिल्हारीस ( इ.स. पू.५७०-५५४ ) आणि थेरॉन ( ४८८-६३) या दोन एकतंत्री राजानंतर थ्रॅसिडेअसला हद्दपार केल्यावर येथें प्रातिनिधिक राज्य स्थापण्यांत आलें. इ. सनापूर्वी ४०५ साली. कार्थेजीनिअन लोकांनीं हें शहर लुटलें. ३३८ सालीं टॅंपोलिअननें येथें वसाहती केल्या. फिंटिआस या एकतंत्री राजाच्या कारकीर्दीत या शहरास थोडी पूर्वसत्ता मिळाली. २६१ आणि २१० सालीं रोमन लोकांनी आणि २५० सालीं कार्थेजीनिअन लोकांनी हें शहर लुटलें. येथून धान्य कापड आणि गंधक परदेशांस जातें. या शहराच्या पूर्वेस अॅथेना खडाकावर झ्युस अॅटेविअस आणि अॅथेना ह्यांचीं मंदीरें होतीं. शहराच्या उत्तरेकडील उंच कड्याच्या एका शिखरावर हा खडक आहे आणि दुसर्यावर प्राचीन शहर आहे. या दोन शिखरांमध्यें एक मोठी दरी आहे. या शहराच्या पूर्वेस असलेल्या अॅक्रेगॅस नांवाच्या दरीवरून या शहरचें नांव पडलें. या शहरचे प्राचीन अवशेष भाग म्हटले म्हणजे डॉरीक पद्धतीनें बांधलेली मंदिरें होत. हिरेक्लिसचें मंदिर फार जुनें आहे. पोप दुसरा ग्रेगरी ह्यानें ५९७ सालीं येथील मंदिराचे ठिकाणीं मुख्य प्रार्थनामंदिर बांधलें. झ्युसच्या मंदिरांत अॅटलासच्या आकृती आहेत. हें आणि हिरेक्लिसचें मंदिर धरणीकंपानें मोडलीं गेलीं. याशिवाय पुष्कळ अवशेष भाग आहेत परंतु त्यांत महत्त्वाचें असें कांहींच नाहीं. या शहरच्या भिंतीला हिर्याक्लसच्या मंदिराजवळ असलेल्या पोर्टोऑरिआ दरवाज्यांतून एक सडक गेली आहे. या शहराच्या पश्चिमेस ग्रीक लोकांचीं थडगीं आहेत. दक्षिण भिंतीच्या बाहेर रोमनलोकांची श्मशानभूमी आहे. ब्यालाटिझो येथें एक लहान खेडें शोधून काढलें आहे.