विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अटालिया - हें पँफिलियांतील प्राचीन शहर असून परगाममच्या दुसर्‍या अ‍ॅटलसराजावरून याला हें नांव मिळालें. आग्नेय फ्रिजिया या सुपीक जिल्ह्याजवळील बंदर म्हणून ह्याला बरेंच महत्त्व होतें. मध्य आशियामायनरमधून सीरिया व ईजिप्तमध्यें जाण्याच्या मार्गांत हें होतें. म्हणूनच पॉल व बार्नावर येथून जहाजानें अँटिऑकला गेले. ख्रिस्तीशकारंभाचे सुमारास अटालिया हें पेर्गाचें बंदर असल्यामुळें, जुन्या राजधानीस मागें टाकून राज्याचें मुख्य शहर झालें. येथील अवशेषांत हेड्रियनची वेस आहे. बाजूला महाराणी जुलियानें बांधलेला बुरुज आहे.