विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतपुर - म्हैसूर संस्थान. शिमोगा जिल्ह्याच्या सागर ता लुक्यांतील एक खेडें. उ. अ. १४०  ५' व पू. रे. ७५० १३'. लोकसंख्या सुमारें चारशें. पूर्वी यास अंधासुर असें नांव असून हें महत्त्वाचें ठिकाण होतें. अंधासुर नांवाच्या राजानें हें वसविलें. पुढें आठव्या शतकांत हुंचा राज्याचा संस्थापक जिनदत्त यानें अंधासुरास जिंकलें. अकराव्या शतकांत अंधासुर गांव चालुक्यांच्या राज्यांत मोडत होता. इ. स. १०४२ सालीं १२०० ब्राह्मणांस या गांवाचा अग्रहार केला होता व इ. स. १०७९ सालीं हें गांव राजधानीचें ठिकाण होतें असें दिसतें. सतराव्या शतकांत केलदी राजा वेंकटप्पा नाईक यानें शिवाचार मठ स्थापिला, चंपकसरस् नांवाचा तलाव बांधला आणि गांवाचें नांव आनंदपुर असें ठेविलें. त्याचें रूपांतर हल्लीं अनंतपुर असें झालें आहे. हैदर आणि टिपू यांच्या काळांत या गांवांवर पुष्कळ वेळा मोहिमी झालेल्या होत्या. (इ. गॅ. ५).