विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अघमर्षण - (१) एक ऋषि. मधुच्छंदाचा पुत्र व त्याचें कुळ.
(२) आणखी एक ऋषि.
(३) विंध्य पर्वताजवळील एक तीर्थ येथें प्राचेतस दक्षानें दीर्घ कालपर्यंत तप केलें.
(४) अघमर्षण म्हणजे पापक्षालन. संध्येंत अघमर्षणविधि असतो; त्यावेळी ऋग्वेद १० वें मंडळ १९० सूक्त म्हणतात तें असें:-

ऋतं च सत्यं चाभीद्धातपसोध्यजायत ।
ततो रात्र्य जायत तत: समुद्रो अर्णव: ॥ १ ॥
समुद्रादर्णवादधिसंवत्सरो अजायत ।
अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी ॥ २ ॥
सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत्
दिवंच पृथिवीं चान्तरिक्षमथोस्व: ॥ ३ ॥

या अघमर्षण सूक्ताला पदपाठ नाही हें विशेष आहे. हें सूक्त उच्चारून हुंगून जमिनीवर टाकण्यांत येतें. त्याचा अर्थ शरीरांतील पापपुरुष हातांतील पाण्यामध्यें श्वासरुपानें टाकून तें पाणी आपल्या डाव्या बाजूस जमिनीवर आपटलें असतां त्या पापपुरुषाचा नाश होतो. यथाश्वमेध: क्रतुराट् सर्वपापापनोदन: । तथाघमर्षणं सूक्त सर्वपापप्रगाशनं ॥ असा या सूक्ताचा प्रभाव आहे. स्नानाच्या वेळींहि हें सूक्त म्हणतात. गुरुपत्‍नी, जननी, भगिनी, स्नुषा यांच्याशीं गमन यासारखीं भयंकर पातकेंहि त्रिवार पाण्यांत उभें राहून सूक्त म्हटलें असतां नाहींशीं होतात अशीहि फलप्राप्ति या विधीच्या स्तोत्यांकडून सांगण्यांत आली आहे.