विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजयपाल - ( इ. स. ११७३ - ११७७ ) गुजराथच्या चालुक्य वंशांतील कुमारपालानंतरचा राजा. याच्या बापाचें नांव महीपाल. कुमारपाल निपुत्रीक मेल्यामुळें अजयपाल हा त्याच्या भावाचा पुत्र स.१२२९ मध्यें गादीवर आला [ व्द्याश्रय काव्य व वेरावळ येथें असलेला पाटणचा अंकित लेख पहा ]. कुमारपालप्रबंधांत म्हटलें आहे कीं, कुमारपालाच्या मनांत आपल्या मुलीचा मुलगा प्रतापमल्ल यास राज्य द्यावयाचें होतें, पण अजयपालानें बंड करून विषप्रयोगानें कुमारपालाचा खून केला. सुकृतसंकीर्तनाचां कर्ता लिहितो कीं अजयपालाच्या दरबारीं असलेलें रुप्याचें छत सपादलक्षा ( शिवालिक ) च्या राजांकडून आलेली नजर होती. जैनग्रंथांत याचा उल्लेख आढळत नाहीं. कीर्तिकौमुदींत अजयपालाचा केवळ नांवाला उल्लेख आला असून प्रबंध चिंतामणिकारानें तर अजयपालानें आपल्या चुलत्यानें बांधलेलीं जैन देवालयें उध्वस्त केलीं असें स्पष्टच म्हटलें आहे. आंबडा वगैरे कुमारपालाचे जैन अमात्य त्याच्या मर्जीत नव्हते. अजयपाल हा निर्दय व गर्विष्ठ स्वभावाचा होता असें दिसतें. उदयपुरच्या अंकितलेखांत इ. स. ११७३ च्या सुमारास सोमेश्वर हा अजयपालाचा कारभारी होता असा उल्लेख आहे. त्यानें कपर्दि नामक इसमास तो ब्राह्मणानुयायी होता म्हणून आपला कारभारी नेमिलें होतें. पण त्याचें पटेनासें झालें तेव्हां यानें त्याला उकळत्या तेलाच्या कढईंत टाकण्याचा हुकूम सोडला ! दुसर्या एका प्रसंगीं त्यानें रामचंद्र नामक एका जैन पंडितास तांब्याच्या तापलेल्या पत्र्यावर बसण्याची शिक्षा दिली. उपर्युक्त आम्रभट उर्फ आंबडा नामक त्याच्या सरदरानें त्याचा हुकूम पाळण्याचें नाकारल्यावरून दोघांमध्यें लहानशी लढाई होऊन तींत आंबडा मारला गेला. स. १२३३ त अजयपालाच्या विज्जलदेव नामक द्वारपालानें त्याचा खंजीर भोसकून वध केला. अजयपाल मुसुलमान झाला होता हें टॉडचें विधान ( वेस्टर्न इंडिया ) खरें मानण्यास सबळ पुरावा पाहिजे. त्याच्या पश्चात् त्याचा पुत्र दुसरा मूळराज हा पाटणच्या गादीवर बसला. मूळराज अल्पवयस्क असल्यामुळें त्याची आई नैकी देवी, कादंबराजा परमादि (११४७-११७५) याची कन्या, ही सर्व कारभार पाहूं लागली व तिचा भाऊ भीमदेव हा सेनापति झाला. भीमदेव हा मोठा शूर होता. परंतु दोन वर्षांच्या आंतच बाळराजा मूळराजा मरण पावला. [ संदर्भग्रंथ-बाँबे गॅझिटियर, गुजराथ ]