विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अण्णिगिरी : मुबई इलाखा धारवाड जिल्हा. धारवाड-गदग रस्त्यावर नवलगुंदच्या आग्नेयीस सुमारें १० मैलांवर उ. अ. १५०.२२’ पूर्व रे. ७५०.२६’. एक सात हजारांवर लोकवस्तीचा गांव आहे. अमृतेश्वराचें एक देऊळ असून तें जखनाचार्यानें बांधलें असें म्हणतात. देवळांतील भिंतीवर पुराणांतील चित्रें खोदलेलीं आहेत. देवळांत इ. स. ११५७ पासून १२०८ पर्यंतच्या दरम्यानचे सहा शिलालेख सांपडले आहेत. दुसर्याहि काही देवळांतून शिलालेख सांपडतात.
इ. स. ११६१ सालीं कलचुरीचा राजा बिज्जल यानें पश्चिमेकडील चालुक्यांचा पाडाव करून अण्णिगिरी ही आपली राजधानी केली. इ. स. ११७५ पर्यंत ही राजधानी असावी असें बिज्जलचा पुत्र सोमेश्वर (११६७-११७५) याच्या वेळचे शिलालेख येथें सांपडले आहेत, यावरुन दिसतें. इ.स. ११८४ सालीं पश्चिम चालुक्यांचा राजा चवथा सोमेश्वर यानें कल्याण येथील जैन व लिंगायत यांमधील लागलेल्या भांडणाचा फायदा घेऊन चालुक्य राज्य पुन्हां स्थापण्याचा प्रयत्न केला होता. इ.स. ११८९ सालीं देवगिरीचा तिसरा यादव भिलज्म (११८७–११९१) याचा मांडलिक महामंडेलश्वर बाचिराज याची राजधानी अण्णिगिरी होतीं असें एका शिलालेखावरून दिसतें. पुढें लवकरच वीरबल्लाळ नांवाचा होयसल राजा (११९२-१२११) याचीहि ती राजधानी होती असें एका शिलालेखावरून दिसतें (फ्लीटचा “कानडी राजघराणी”ग्रंथ).
इ. स. १८०० सालीं प्रसिद्ध धोंडया वाघ ह्यानें डंबलहून पळ काढला तेव्हां अण्णिगिरीस त्यानें मुक्काम केला होता. अण्णिगिरी, धारवाड आणि हुबळी येथें आक्टोबर १८०० साली क. वेलूस्लीनें तंबु तयार करविले (सप्लिमेंटरी डिस्पॅचेस भाग २). ब्रिटिश अंमल सुरू झाला त्यावेळीं अण्णिगिरी हें निपाणी संस्थानच्या जहागिरींत मोडत होतें. १८२७ सालीं येथें ४५० घरें, १४ दुकानें व कांहीं विहिरी होत्या. इ. स. १८३९ सालीं कोणी कायदेशीर वारस न उरल्यामुळें ती जहागीर ब्रिटिश सरकारनें खालसा केली. हुबळी धारवाडाप्रमाणें हें गांव पूर्वी कापडाविषयीं प्रसिध्द होतें. (धारवाड ग्याझेटीअर; इंपीरियल ग्या. ५)