विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अतीश - अतीश किंवा दीपंकर हा बौध्दधर्मीय साधु हिंदुस्थानचा रहिवाशी होता तरी त्यानें तिबेटांत जाऊन तेथें लामाधर्मांत बरीचशी सुधारणा घडवून आणिली. इ.स. १०३८ त जेव्हां त्यानें तिबेटांत पाऊल टाकलें तेव्हां त्यावेळचा तेथील बौद्धधर्म अनीतिमान् भिक्षुकांच्या हातांत असून त्यांतील पिशाच भक्तीमुळें तो अवनतीस पोंचला आहे असें अतीशाला आढळून आले. शुद्धतम बौद्धधर्माचा नमुना पुढें ठेवून त्यानें एक नवीन कादम नांवाचा पंथ काढिला. या पंथांतूनच पुढें, हल्ली तिबेटचा राष्ट्रधर्म असणारा गेलुग (पीत-शिरस्त्राण) पंथ निघाला. ब्रह्मचर्यपालन व पिशाचभक्तीचें उच्चाटण या अतीशानें केलेल्या कांहीं धार्मिक सुधारणा होत. त्यानें जे अनेक तात्त्विक ग्रंथ लिहिले त्यांमध्यें `बोधिपंथप्रदीप’ हा प्रख्यात आहे. त्यानें हिंदुस्थानांतल्या बौद्धभाष्यांचीं तिबेटी धर्मग्रंथातून भाषांतरें केली. अतीशाच्या उपदेशाचा हितकारी परिणाम म्हणजे सस्क्य व कर्ग्यु नांवाचे दोन अर्धवट सुधारलेले पंथ पुढें निर्माण झाले; व त्यांतल्या त्यांत सस्क्य पंथाचें वर्चस्व तर बरेच दिवस टिकून होतें. इ.स. १०५२ त अतीश ल्हासाजवळ ने-टंग ( Ne-tang ) येथें मरण पावला. तेथें त्याच्या समाधीवर उभारलेला स्तूप अद्याप दिसतो.