विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकंपन - १., कोणी एक राजर्षि, हा कोणत्या कालीं, व कोणत्या कुलांत जन्मला, तें कांहीं आढळत नाहीं.  याला, परम पराक्रमी हरि हा नामेंकरुन एकच पुत्र होता, तो एका युद्धांत मरण पावला असतां, यास परम दुःख होऊन, हा शोक करीत आहे तों, तेथें नारद ॠषी प्राप्‍त झाले, व त्यांनीं, मृत्यु अनिवार्य आहे, या विषयींची मूळ कथा सांगून, याचें समाधान केलें. ( भार. द्रोण. अ. ५२-५४).

२. रावणदूत एक राक्षस. जनस्थानीं, खरादिक राक्षसांचा वध रामचंद्रानें केला, तें वृत्त प्रथमतः रावणास यांने कळविलें होतें.  शूर्पणखेनें मागून कळविलें.  (वा. व. अर. स. ३१ ) रामरावणयुद्धांत हा असून, पुढें मारुतीच्या हातून मरण पावला. (वा. रा. युद्ध. स. ५६).