विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अदवानी शहर - याच नांवाच्या तालुक्याचें मुख्य ठिकाण उत्तर अक्षांश १५० ३८’व पूर्व रेखांश ७७० १७’. हें मद्रासपासून ३०७ मैलांवर आहे. या जिल्ह्यांतील हें एक मल्लारीच्या खालोखाल सर्वांत मोठें शहर आहे. लोकसंख्या ( १९२१ ) ३०२३२ त्यांपैकीं शेंकडा ६० हिंदु असून मुसुलमानांचें प्रमाण शेंकडा ३७ होतें. लोक फार थोडे आहेत.
अदवानी हें या प्रांतांतील कापसाच्या व्यापाराचें केंद्रस्थान असून कापसाचे गठ्ठे बांधण्याचे व सरकी काढण्याचे येथें अनेक कारखाने आहेत. त्यांत सुमारें ७००० लोक मोसमांत काम करतात. येथील मुख्य धंदे सुती व रेशमी कापड मागावर विणणें हे आहेत. तसेंच रंग व टिकाऊपणाबद्दल नांवाजलेल्या सत्रंज्या येथें पुष्कळ होतात. या शहरास इ. स. १८६७ मध्यें म्युनसिपालिटी मिळाली. इ. स. १९०३-४ या वर्षांतील उत्पन्नाचें व खर्चाचें प्रमाण ५६५०० व ५०००० होतें. पाण्याकरितां एक मोठा तलाव बांधलेला आहे त्यांत ४५०००० घन फूट पाणी मावतें. त्यांतून गांवाला पाणी पुरवलें जातें.
इ ति हा स – अदवानीचा किल्ला फार बळकट असून, सरळ उंच गेलेल्या गिरिशिखरांवर बांधलेला आहे. कृष्णा व तुंगभद्रा या दोन नद्यांमधील सुपीक प्रदेशाचें हें नाक असल्यामुळें दक्षिण हिंदुस्थानच्या लढायांमध्यें या किल्यानें बरेंच कार्य केलेलें आहे. इ. स. १४ व्या शतकामध्यें विजयनगरच्या राजांचा हा एक उत्तम गड असून त्याकाळीं तो अभेद्य समजला जात असे. इ. स. १५६८ मध्यें तालिकोटच्या लढाईनंतर तो विजापूरकरांच्या ताब्यांत गेला; व इ. स. १८०० मध्यें तो इंग्लिशांच्या ताब्यांत येईपर्यंत मुसुलमानांच्या ताब्यांत होता. इ. स. १६०४ ते ३१, पर्यंत येथें विजापूरचा सरदार मलिक रहामनखान हा किल्लेदार होता. नंतर इ. स. १६३२-८७ पर्यंत सिद्दि मसूदखान हा किल्लेदार होता. इ. स. १६८६ मध्यें अवरंगझेब दक्षिण जिंकण्यास आला असतां, त्यानें तो किलज जिंकून घेतला. १७५४ च्या सुमारास फ्रेंचांचा अधिकार मुसा बुसीमार्फत या किल्लायावर स्थापन झाला असावा कारण शहानवाजखानानें मुसाबुसीचे मनोगतानुरूप अदवानीचा मामला ख्वाजे न्यायदुल्लाखानास करार केला. ( पत्र ता. ५।१। १७५४ रा. खं. १.२२,५९). इ. स. १७५६ मध्यें निझामानें आपला आप्त बसालतजंग यास तो जहागीर दिला. १७६० सालीं सदाशिवराय भाऊंनीं जेव्हां निजामावर स्वारी केली तेव्हां बसालतजंग निजामाच्या मदतीस गेला ( बाबुराव बुंदेल्याचें गोविंदपंतांस पत्र २० मार्च १७६० रा. खं. १,१६९-२७२). पेशव्यांचा निजामाशीं संग्राम १७७४ मध्यें चालू होताच, त्या सुमारास बसालतजंगाचा मुलगा अदवानीकडून नबाबाकडे येत असतां मोहलेवर आला आणि श्रीमंतांस बातमी कळून श्रीमंत धांवलें ( चैत्र व॥ ६ शके १६९५ चें पत्र. रा. खं. १०,११८, ७५). या पत्रांत बसालतजंगास निजामअल्लीचा जांवई म्हटलें आहे. इं. ग्या. १९०८ मध्यें भाऊ म्हटलें आहे.
बसालतजंगाच्या ताब्यांत अदवानीचा किल्ला असतां हैदरनें दोन वेळा हल्ला चढविला पण तो निष्फळ झाला असा उल्लेख इं. ग्या. मध्यें आहे. तो कोणच्या प्रसंगानें हल्ला झाला व तो निष्फळ करण्याचें श्रेय मराठयांस आहे, याविषयीं माहिती येणेंप्रमाणें देतां येईल. १७७९ च्या सुमारास मराठे, निजाम व हैदर यांची इंग्रजांविरुद्ध जूट झाली. त्या जुटींत निजाम मिळण्याचें कारण अदवानीसंबंधाची भानगड होय.
इ. स. १७७८ मध्यें फ्रेंचांशी लढाई होण्याचा प्रसंग दिसूं लागला तेव्हां अर्काटच्या महमदअल्लीमार्फत अदवानीचा नबाब बसालत जंग याच्याशीं इंग्रजांनीं तह केला तो निजामला न विचारतां केला. त्या तहामध्यें नबाबानें आपल्या मुलखापैकीं कांहीं भाग इंग्रजांस भाडयानें दिला आणि फ्रेंच फौज काढून टाकण्यासंबंधानें अभिवचन दिलें. त्याबद्दल इंग्रजांनीं हैदराविरुद्ध अदवानी किल्ल्याचें संरक्षण करूं अशी हमी घेतली. ( हैदरअल्ली व टिपू सुलतान यांचें चरित्र एल. बी. बावरिंग आक्सफर्ड १८९३ ). त्या तहाप्रमाणें शके १७०० ( इ. स. १७७९ ) मध्यें बसालतजंग याच्या नोकरींत फ्रेंच सरदार लाली हा होता. परंतु त्याची नोकरी सोडून पेशव्याकडे येण्याची इच्छा परशुरामभाऊंस त्यानें दर्शविली परंतु परशुरामभाऊंनीं त्यास चाकरीस ठेवण्याचें नाकारल्यानंतर तो निजामअल्लीकडे गेला ( खरे. ऐ. ले. सं. पृ. ३४०१ ).
वर सांगितलेल्या करारामध्यें निजामास दुर्लक्षिल्यामुळें निजाम चिडून गेला व पुढें त्या कटांत पडला. अदवानीच्या संरक्षणास इंग्रज जात असतां त्यांस हैदराच्या मुलखांतून जावें लागलें त्यामुळें हैदर व इंग्रज यांमध्यें चकमक उडाली आणि हैदराने अदवानीपर्यंत मुलूख ताब्यांत घेतला. हा मुलुख पडला निजामाचा. आणि तो हैदर घेतो यामुळें हैदराचें व निजामाचें फिसकटणार होतें तें नाना फडनविसांनीं टाळलें असें दिसतें.
शके १७०१-२ मध्यें तेथें पेशव्यांचा वकील कृष्णाजी नारायण जोशी हा होता आणि तो मराठयांतर्फें निजाम, हैदर व अदवानीवालें यांशीं राजकारण करीत होता. नाना फडनविसांचें कार्य खालील पत्रांतील उतारे स्पष्ट करतील.
कृष्णाजी नारायण जोशी यांस नाना यांचें मार्ग. शु. ७ १७०१ मधील पत्रांत नाना लिहितात – रा. गोविन्द नारायण यांचे पत्रावरून अदवानीचा महसरा उठवून नबाब हैदर-अल्लीखान नेण्हार तें समजलें. महसरा अदवानीचा लौकरच उठवून नेत असें आधीं करवावें ( रा. खं. १९,११,५,१५१८; १६१९ ).
अदवानीचा महसरा लवकरच उठवून अमिरुल उमराव यांशीं सलूखा करतों म्हणून नबाबांनीं वकीलास उत्तर लिहिलें परंतु अद्याप हंगामा मना झाला नाहीं. अदवानीचा महसरा उठविण्यांत येईल असे निजाम अल्लीखान यांस लिहिलें गेल्यावरून अदवानी ताब्यांत घेण्यासाठीं त्यांनीं फौज पाठविली. त्याशी बहादुराकडील फौजेचा कलह न व्हावा म्हणून मार्ग. व॥ ६ शके १७०१ चें पत्र. ( रा. खं. १९-१९-१०).
हैदरअल्लीखान बहादूर यास नानांचें पत्र ( मार्ग. व॥ १० शके १७०१.) अदवानी तालुक्यांत आम्हैरबांकडून हंगामा आहे येविशीं तहनाम्यांत कलम लिहिलें व आपणांसहि कलमीं केलें... विनाबरा अदवानीचा हंगामा जलद रफा व्हावा म्हणजे नबाब मवसूफ यांची खातरजमा होऊन सर्वत्रांची एकदिली जालियाचा दाब दुषमनावर पडून नेमल्या मसलतीस जिल्हे व खलक येईल. ( रा. खं. १९-२५-१६).
कृष्णराव नारायण जोशी यांचें पत्र ( पौष वद्य ११-१७०१ ) हैदर अल्लीशीं मुलाजमत झाली. त्या प्रसंगीं, तहनाम्यांतील अदवानीच्या कलमासंबंधीं बोलले कीं श्रीमंतांची व निजाम अल्लीखान बहादूर यांची दोस्ती आहे पण आमचें व त्यांचें सुदामत नाहीं. त्यांनीं इंग्रजांचे मसलतींत आपल्याशीं बेइमानी केली. त्यांच्या तालुकातीचें कलम तहनाम्यांत कां लिहिलें ? ( रा. खंड १९-४९-३० )
कृष्णराव नारायण जोशी यांस नानांचें पत्र ( माघ शुद्ध ॥ २, १७०१ ) अदवानीचा हंगाम मना होय तोंपर्यंत आम्हीं सिकाकोलीकडे जात नाहीं. असें निजाम अल्लीखान बहादूर म्हणतात म्हणून लिहिलें आहे. (रा. खं. १९-५८-३९).
( माघ शु॥ ३ चे ) पत्रांत नबाब बसालत जंग बहादूर यांचे वकील पट्टणांत आहेत, त्यांशीं नबाब बहादूर पन्नास हजार होन मागतात म्हणोन कळलें. तरी श्रीमंतांचे मर्जीकरितां अदवानीचा हंगामा दूर करून अमीर, उमराव यांसी सलूखान करतों ऐसें नरसिंगराव यांसी बहादरांनीं लिहिलें होतें त्याप्रमाणेंच करावें, पैक्याविशीं कांहीं न म्हणावें म्हणून नाना लिहितात. ( रा. खं. १९-५९-४० ).
( ज्येष्ठ व॥ १०-१७०२ ) च्या कृष्णराव नारायण यांस लिहिलेल्या पत्रांत अदवानी हावेलीचीं ठाणीं सुटल्याबद्दल उल्लेख आहे. (रा. खं. १९-१६४-१०८. )
भाद्रपद व ॥ २ शके १७०२. रामचंद्र कृष्ण रिसबुड याचें नानास पत्र – “मुकाम अदवानी नजीक नबाब बसालतजंग जाणोन वर्तमान यथास्थित असे”- ( रा. खं. १० २५९.१८३.)
अदवानीचें रक्षण करण्याचें कार्यं शके १७०१ मध्यें जरी मराठयांनीं केलें तरी त्यांस तें शके १७०८ ( इ. स. १७८६) मध्यें करतां आलें नाहीं. त्या वेळेस टिपूनें तो किल्ला घेतलाच. त्याची हकीगत येणेंप्रमाणें वासुदेवशास्त्री खरे देतात. ( ऐ. ले. सं. पृ. ४०१३-५ ).
“बदामी काबीज झाल्यावर हरीपंत तात्या मे महिन्याच्या अखेरीस तेथून कूच करून गजेंद्रगडाकडे गेले. त्या किल्ल्यास मोर्चें दिल्यावर पायदळाच्या दोन लहान तुकडया टिपूकडून कुसकेस येत होत्या त्या मराठी स्वारांनीं वाटेंतच गांठून मारून टाकिल्या. मग किल्लेकर्यांनीं घोरपडयांचे मार्फत संधानाचें बोलणें लाविलें. आठ दिवस वाटाघाट होऊन आतां किल्ला स्वाधीन व्हावा तों टिपूनें अकस्मात् जाऊन अदवानीस मोर्चें दिल्याची बातमी आली. अदवानीचें संस्थान निजामअल्लीचे बंधु बसालतजंग यांचें होतें हें पूर्वी सांगितल्याचें वाचकांस स्मरत असेलच. बसालतजंग आतां वारले होतें व त्यांचे पुत्र मोहबतजंग हे मुलांमाणसांसुद्धां अदवानींत होते. टिपूनें त्या किल्ल्यास वेढा घालून फार निकड केली. परंतु मोहबतजंगांनीं शर्थीनें लढून शत्रूचे दोन हल्ले माघारे परतविले. `आपली कुमक झाली नाहीं तर आपण मुलांमाणसांसुद्धा शत्रूच्या हातीं पडणार; याकरितां आपल्या घराण्याची अब्रू रहावी, आपल्या घरच्या बायका टिपूच्या हातीं लागूं नयेत, एवढयाकरितां तरी कुमकेस फौज पाठवून आपला बचाव करावा,’अशी मोहबतजंगांनीं आपल्या चुलत्याची म्हणजे निजामअल्लीची प्रार्थना केली, निजामअल्लींनीं तत्काळ आपले धाकटे बंधू मोगल अल्ली यांबरोबर पंचवीस हजार फौजेची रवानगी केली व हरिपंततात्यास निकडीचीं पत्रें पाठविलीं कीं, तुम्ही आपली फौज व मोगलअल्ली एकत्र होऊन टाकोटाक अदवानीस जाऊन टिपूचे मोर्चे उठवावे. तीं पत्रें येतांच तात्यांनी गजेंद्रगड घेण्याकरितां तिसरा हिस्सा फौज आपणाजवळ ठेवून सुमारें दोनतृतीयांश फौज तारीख ९ जून रोजीं अदवानीकडे रवाना केली. त्या फौजेंत आप्पा बळवंत मुख्य सरदार असून त्यांचे हाताखालीं बाजीपंत अण्णा, रघुनाथ नीळकंठ पटवर्धन व मोगलाई फौजेसुद्धां तहवारजंग हे सरदार नेमिले होते. आप्पा बळवंत यांनीं भागानगराहून मोगलअल्ली आले होते, त्यांस सामील करून घेऊन अदवानीकडे झपाटयानें चाल केली. तें तेथें पोंचतांच टिपू मोर्चे उठवून तीन कोस मागें सरला. तारीख २२ जून रोजीं आप्पा बळवंत व बाजीपंत व रघुनाथराव पटवर्धन हे त्रिवर्गं सरदार तयार होऊन टिपूवर चालून गेले. टिपूनें आपल्या अघाडीस हजार बाराशे स्वारांची चौकी ठेविली होती, ती मराठयांनीं मारून उधळून दिली व तिचे शें दीडशे घोडे हिसकून घेतले, तों खासा टिपू सुलतान पायदळ व तोफा घेऊन गोटांतून आला त्यानें तोफांचा भडिमार केला. अस्तमानपर्यंत लढाई होऊन शेवटीं मराठयांनीं टिपूस त्याच्या गोटापर्यंत रेटीत नेलें. इतकी लढाई झाली तरी मोगलांची चाळीस पन्नास हजार फौज लढाईचा तमाशा पहात गोटांतच बसून होती ! मराठयांची कुमक तिनें काडीमात्र केली नाहीं.
आप्पा बळवंत निघून गेल्यावर दोन दिवसांनीं गजेंद्रगड हरिपंततात्यांच्या हवालीं झाला. मग तेहि अदवानीकडे गेलेल्या फौजेचा पाठपुरावा करण्याकरितां तेथून निघून कवताल भानूपर्यंत आले. ते दिवस अखेरीचे होते, तरी तुंगभद्रेच्या उत्तरतीरीं बुनगें ठेवून पलीकडे जाऊन पलीकडची फौज व आपण एकत्र होऊन टिपूवर चालून जावें व लढाईचा हंगाम त्याच्या मुलखांत पाडावा असा तात्यांचा बेत होता. त्या वर्षी त्या प्रांतीं मृगाचा पाऊस झाला नव्हता. पुढची एक दोन नक्षत्रें पाऊस न पडता, तर तात्यांचा बेत सिद्धीस जाता आणि कदाचित् चार महिनेपर्यंत मोगल मराठी फौजांची छावणीहि तिकडेच झाली असतीं. परंतु आर्द्रांचा पाऊस झपाटयाचा सुरू झाल्यामुळें तात्यांचा पलीकडे जाण्याचा वेत एकीकडेच राहून पलीकडे सडी फौज अदवानीच्या कुमकेस गेली होती, ती नदीस पाणी येऊन पलीकडेच अडकून पडते कीं काय ही त्यांस काळजी उत्पन्न झाली ! अशा अडचणीच्या दिवसांत अदवानीस शह देऊन टिपूनें हरिपंत तात्यास एक प्रकारचें कोडेंच घातलें होतें व हें कोडें ते कसें सोडवितात हें तो पहात बसला होता ! सडी फौज घेऊन पलीकडे जावें तर बुनगें अलीकडे राहिल्यामुळें नदीस पाणी आल्यावर निभाव लागणार नाहीं आणि मागून धान्य व वैरण पोंचणार नाहीं ! पलीकडे न जावें तर अदवानीचा टिकाव शत्रूपुढें कसा लागणार ? नरगुंदचा अनुभव तात्यांस होताच. या सर्व अडचणींचा विचार करून त्यांनीं आप्पा बळवंत यांस लिहून पाठविलें कीं, तुम्ही मोहबतजंग यांस मुलेंमाणसें व चीजवस्तुसुद्धां अदवानीहून काढून नदीस पाणी भरलें नाहीं तों लौकर निघून अलीकडे यावे. याप्रमाणें आप्पा बळवंत यांनीं केलें. पण अदवानीची तटबंदी पाडणें, तोफा फोडणें, धान्याचा नाश करणें, या गोष्टी शत्रु ठाणें घेणार हें कळलें असूनहि परत जाण्याच्या धांदलीत त्यांस करितां आल्या नाहींत. तें घाईघाईनें परत आले तों तुंगभद्रा नदीस उराइतकें पाणी झालेंच होतें ! अलीकडच्या तीरीं लष्कर पुरतें उतरतें व उतरतें तों नदीस पूर येऊन दुथडा पाणी भरून चाललें !
याप्रमाणें अदवानीच्या मसलतींतून शर्थीनें पार पडल्यावर दोन्ही सैन्यें पुन्हां एकत्र होऊन कनकगिरीपर्यंत आलीं. तेथें मोगल अल्लीस निरोप देऊन तहवारजंगास मात्र बरोबर घेऊन हरिपंत तात्या बहादुरबिंडयास आले. इतकें होतें तों जुलैचा महिना संपला. कुमकेस आलेली फौज नदीपार जातांच टिपूनें अदवानीच्या किल्यावर निशाण चढविलें. अदवानी टाकून येण्याची मसलत हरिपंतांनीं केली ती परशुरामभाऊस पसंत पडलीं नाहीं. “अदवानी टाकून आलें, हें ठीक झालें नाहीं. होणार भावी !”हे त्यांचे उद्गार एका पत्रांत आहेत. परंतु
तात्यांच्या अडचणी काय होत्या त्या आम्हीं वर दर्शविल्याच आहेत.”
या प्रसंगीं टिपूनें अदवानी किल्ला घेतला. तो पुढें निजामाला टिपूकडून जो प्रदेश गेला त्यांत निजामाला परत मिळाला व पुढें तो १८०० मध्यें इंग्रजांस मिळाला.