विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अइजल - असाममधील लुशाइ डोंगरी जिल्ह्यांतील एक पोटभाग.  उ.अ.२३.१ ते २४.१९ व पू.रे.९२.१६ ते ९३.२६ क्षेत्रफळ ४७०१ चौ.मै. लोकसंख्या ५३,००० यांत १२५ खेडीं आहेत.

अइजल हें या विभागाचें व लुशाई जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. उ.अ.२३.४ व पू.रे. ९२.४४. हें एक डोंगराच्या कड्यावर समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर वसलेले गांव आहे.  लोकसंख्या सुमारें अडीच हजार.  पावसाचें सरासरी मान ८० इंच असतें.  तें आसामच्या मानानें विशेष नाहीं. हवा थंड व उत्तम आहे. हें लष्करी ठाणें आहे.  येथें एक दवाखाना व तुरंग आहे.  पूर्वी या डोंगरावर पाणी फार दुर्मिळ होतें पण आतां पुष्कळ पैसा खर्चून पावसाचें पाणी धरुन ठेवण्याची व्यवस्था करण्यांत आली आहे. (इं.गॅ.५-१९०८)