विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनंतपुर गांव - जिल्ह्याचें, विभागांचे व तालुक्याचें मुख्य ठिकाण. उ. अ. १४० ४१', व पू. रे. ७७० ३७', सदर्न मराठा रेलवेच्या गुंटकल-बंगलोर शाखेवर हें स्टेशन आहे. लोकसंख्या (१९२१) ११४५२.
विजयानगर राजाचा दिवाण चिक्कण्णा उडियार यानें इ. स. १३६४ सालीं हा गांव वसविला. व त्यास आपली पत्नी ' अनंता ' हिचें नांव दिलें. याच चिक्कण्णानें त्याच सुमारास अनंतपुर येथें असलेला मोठा तलाव बांधला. या तलावांत पंदामेरू नदी अडविली आहे. विजयानगरच्या राजापासून हनुमप्पा नायडुपैकीं हंडे घराण्यास या भागाची सनद सोळाव्या शतकांत मिळाली. या घराण्याकडे हा प्रदेश दोन शतकेंपर्यंत होता. इ. स. १७५७ सालीं गुत्तीचा संस्थानिक मुरारराव यानें या गांवास वेढा दिला होता. परंतु ५०००० रुपये मिळाल्यावर त्यानें वेढा उठविला. इ. स. १७७५ सालीं हैदरानें गुत्ती व बल्लारी जिंकून या भागांतून ६९००० रुपये उकळले. तेथील पाळेगारास या रकमेची भरपाई करतां न आल्यामुळें हैदरानें त्यास कैदेंत टाकलें व त्याचा प्रदेश आपले राज्यास जोडला. यापुढें त्या घराण्यानें डोकें वर काढलें नाहीं. वयोवृध्द पाळेगार इ. स. १७८८ सालीं मरण पावला. यानंतर लवकरच टिपूनं या घराण्यांतील कोणीं याउपर त्यास त्रास देऊं नये म्हणून त्या घराण्यांतील सर्व पुरुषांस फांशी देण्याचा हुकूम केला; व त्या सर्वांस गांवाबाहेर फांशी देण्यांत आले. त्या वृद्ध पाळेगाराचा तिसरा पुत्र श्रीरंगपट्टणास होता तो निसटला व कालहस्ती येथील राजाच्या आश्रयास जाऊन राहिला. इ. स. १७९९ सालीं तो परत अनंतपुरास आला पण तो निजामास लवकरच शरण आला. निजामानें त्यास सिद्दरामपुर गांव इनाम दिला. इ. स. १८०१ सालीं तो मरण पावल्यावर मुख्य शाखेची नकल झाली.
इ. स. १८६९ सालीं येथे म्युनिसिपालिटी स्थापन झाली. इ. स. १९०३-४ मध्यें उत्पन्न १७५०० व खर्च १६००० होता. अनंतपुर गांवाभोंवती बागाईत असल्यामुळें हवा रोगट आहे. यूरोपियन लोकांची वस्ती चांगल्या ठिकाणीं झाली आहे. पाऊस सरासरी इंच २०.२९. येथें चांगला डाक बंगला आहे. एक कॉलेज, तीन हायस्कुलें, सरकारी ट्रेनिंग शाळा, व इतर कांहीं शाळा आहेत. एक जिनिंगचा कारखाना आहे. धान्य, लोखंड व किरकोळ माल यांचा व्यापार चालतो. मुख्य पोलिस कचेरी, मॅजिस्ट्रेट कोर्टे, दुय्यम तुरुंग वगैरे कचेर्या आहेत.
[ इं. गॅ. ५. अर्नोल्ड. इं. गाइड; सेन्स रिपोर्ट ]