विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अझमगड जिल्हा - (१) संयुक्त प्रांतांत, गोरखपूर विभागाचा दक्षिणेकडील जिल्हा. क्षे. फ. २२०७ चौ. मै. याच्या उ. फैझाबाद व गोरखपूर जिल्हे; प. बालिया द. गाझीपूर व जोनपूर आणि पश्चिमेस जोनपूर व सुलतानपूर, हे आहेत. घोग्रा, टोन्स, छोटी शरयू या ह्या जिल्ह्यांतील नद्या होत. या जिल्ह्यांत २० तळीं आहेत; पैकीं गंभीरवन कोटेल, जमवावन सलोना, पाक्री, पेवा, हीं मुख्य आहेत. या जिल्ह्यांतील जमीन नदीच्या गाळाची बनलेली आहे. पावसाळ्याशिवाय इतर ऋतूंत हवा निरोगी असते. पावसाचें सरासरी वार्षिकमान ४१ इंच आहे.

इ ति हा स.- भार, सोएरी, व चेरू हे येथील मूळचे रहिवासी होत अशी परंपरा आहे. मुसुलमानांच्या हाताखालीं हा जिल्हा प्रथम कनोजच्या व पुढें दिल्लीच्या राज्यांत सामील झाला. अझमगडजिल्हा कांहीं दिवसपर्यंत शर्की राजांच्या हातांत होता. पण तें घराणें मोडल्यानंतर शिकंदर लोदीनें तो जिल्हा फिरून दिल्लीच्या राज्यास जोडला व तेथें शिकंदरपूरचा किल्ला बांधिला. सतराव्या शतकाच्या अखेर, मुसुलमानी धर्म स्वीकारिलेल्या गौतम रजपुतांच्या हातांत हा जिल्हा होता. १७३१ च्या सुमारास, त्या घराण्याचा मुख्य मोहबतखान यानें कर देण्याचें नाकारल्यावरून अयोध्येच्या नबाबानें त्याजवर
सैन्य पाठवून त्याला पळावयास लाविले. १७५८ पासून १८०१ पर्यंत हा जिल्हा अयोध्या प्रांतांत मोडत असे.

१८५७ सालांत जूनच्या ३ र्‍या तारखेस अझमगड येथील देशी शिपायांनीं बंड करून कांहीं अधिकार्‍यांस ठार केलें व सरकारी खजीना फैजाबाद येथें नेला. यूरोपियन लोक गाझीपुरास पळून गेले. गाझीपूरहून सैन्याची मदत आल्यावर इंग्रजांनी अझमगड काबीज केलें. परंतु कांहीं दिवसांनीं दिनापुरास बंड सुरू झाल्यावर त्यांना फिरून गाझीपूरकडे जावें लागलें. कुंवरसिंग हा लखनौहून पळून या जिल्ह्यांत आला होता; त्याजवर इंग्रज सैन्यानें अत्रावळी येथें हल्ला केला; पण त्यानें तो परतवून इंग्रजांना अझमपूरकडे खेंचलें व त्या गांवाला वेढा दिला. हा वेढा जवळजवळ दोन महिने टिकला. परंतु पुढें सर ई. ल्युगार्ड यानें त्याचा पराभव करून वेढा उठविला. कुवरसिंग गंगानदी उतरून जात असतां मरण पावला; व पुढें ५।६ महिन्यांत जिल्ह्यांत शांतता झाली.

मधुवन येथें कनोजच्या हर्षवर्धन राजाच्या वेळचा (इ. स. ६३१ ) एक ताम्रपट सांपडला आहे. एका तळ्यावर असलेल्या लेखावरून तें तळें ११४४ त तयार केलेलें आहे असें दिसतें.

उ द्यो ग धं दे - या जिल्ह्यांतील मुख्य धंदे साखर तयार करणें व कापड विणणें हे होत. विलायती कापड येऊं लागल्यापासून येथील कापडाचा धंदा बराच खालावला आहे. मुबारकपूर, मौ व कोपागंज येथें कापड विणण्याचे मुख्य कारखाने आहेत. या जिल्ह्यांत पूर्वी निळीची लागवड बरीच होत असे. परंतु कृत्रिम नीळ येऊं लागल्यापासून ती अगदीं खालावत चालली आहे. कापड, कापूस, तंबाखू, मीठ, भांडीं वगैरे जिन्नस बाहेरून या जिल्ह्यांत येतात व साखर, अफू, गळिताचीं धान्यें, नीळ व सोरा वगैरे जिन्नस बाहेर जातात.

आगगाडीचे लहान फांटे या जिल्ह्यांतून गेलेले आहेत. शहागंजपासून, अझमगड व मौपर्यंत बंगाल आणि नार्थ वेस्टर्न व औध-रोहिलखंड फाट्याची लूप लाईन, यांना जोडणारा एक फांटा आहे. कोपागंजहून एक फांटा डोहरीघांटपर्यंत व दुसरा बालियापर्यंत गेलेला आहे.

रा ज्य व्य व स्था - या जिल्ह्यावर कलेक्टर असून त्याच्या हाताखालीं एक सिव्हिल सर्व्हंट असतो. देवगांव, अझमगड,  माहूल, सग्री, घोसी आणि महमुदाबाद या तालुक्यांवर तहशीलदार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणीं डिस्ट्रिक्ट व सेशन्स जज्ज असून इतर ठिकाणीं सबजज्ज व मुनसफ आहेत.

लो क सं ख्या - १९०१ मध्यें या जिल्ह्याची लो. सं. १५,२९,७८५ होती, शें. ८६ लोक हिंदू व शें. १४ मुसलमान आहेत. येथील लोकवस्ती बरीच दाट आहे; व या जिल्ह्यांतून पुष्कळ लोक बाहेर जातात. शे. ९४ लोक बहारी भाषा बोलतात. शें. ६० लोकांचा उदरनिर्वाह शेतकीवर होतो व  शें. १२ लोक मजुरीवर पोट भरतात. १९११ सालीं लोकसंख्या १४,९२,८१८ होती.

शेतकी- जिल्ह्याच्या दक्षिण भागांतून पाणी नीट वाहून जात नसल्यामुळें जमीनी चिखलाच्या आहेत व त्यांत मुख्यत्वेंकरून तांदूळ पिकतो. उत्तर भागांत चिकण मातीची जमीन बरीच आहे. छोटी शरयू व घोग्रा नदीकांठच्या खांचर जमिनींना पुरांपासून धोका असल्यामुळें त्यांत फारसें उत्पन्न होत नाहीं. या जिल्ह्यांतील मुख्य पिकें तांदुळ व जव हीं होत. याशिवाय, वाटाणे, गहूं, हरभरा, मका, ऊंस वगैरे पिकेंहि होतात. विहिरी, तळीं व लहान ओहोळ यांच्या पाण्यावर सर्व शेती होते.

या जिल्ह्याची पद्धतशीर जमाबंदी १८३४ पासून १८३७ पर्यंत झाली. १८६६ पासून १८७५ पर्यंत, त्या जमाबंदीची फेरतपासणी होऊन, जमीनीचे निरनिराळे वर्ग ठरविण्यांत आले व त्याप्रमाणें जमिनीवर कर आकारण्यांत आले. १९०३-४ मध्यें जमिनीवर करांचे उत्पन्न १७.८ लक्ष रु. म्हणजे सरासरी दर एकरीं १.५ रु. होतें.

येथील हिंदु मुसुलमानांत वारंवार दंगे होतात. व लोकहि साधारणपणें बरेच भांडखोर आहेत.

या जिल्ह्यांत फक्त अझमगड येथें म्युनिसिपालिटी आहे. इतर ठिकाणचीं कामें जिल्हा बोर्डाकडे असतात.

शि क्ष ण :- १९०१ मध्यें, या जिल्ह्यांत लिहितां वाचतां येणार्‍यांचें लो. सं. त प्रमाण शें ३.३ ( पुरुषांपैकीं शे ६.८ व बायकांपैकीं शें. २ ) होतें. १९०३-०४ मध्यें एकंदर शाळांची संख्या २६५ असून त्यांत १ हायस्कूल होतें.