विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अत्तर व सुगंधी पदार्थ - अत्तरें करणें किंवा सौगंधिकी कला. मनुष्यास शब्द, स्पर्श, रूप, रस वगैरे ज्याप्रमाणें प्रिय आहेत त्याचप्रमाणें घ्राणेंद्रियास प्रिय असलेलीं अत्तरे किंवा सुवासिक पदार्थ यांचा उपयोग मनुष्य जातींत फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पुष्पांचा मधुर सुवास तसेंच कस्तूरी मृग, जवारी मांजर वगैरे प्राण्यांपासून निघणारी सुगंधि द्रव्ये व वनस्पतिजन्य निर्यास यांपासून निरनिराळीं अत्तरें व सुगंधी तेलें व अर्क तयार होतात. सुगंधी पदार्थाचे योगानें मनुष्याचें मन प्रसन्न व आल्हादित होतें. यामुळें प्राचीन काळच्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांत त्यांचा मोठया प्रमाणावर उपयोग होत असे. इजिप्त, अरबस्तान, असुरिया, इराण, या देशांत तसेंच इटली व ग्रीस या देशांत ह्यांचा फार खप होत असे व त्यामुळें अत्तरें व सुगंधी पदार्थ तयार करण्याची कला फार पूर्णत्वास गेली होती. आपला हिंदुस्थान देश ह्या कलेंत फार प्रवीण होता. कारण सुगंधी द्रव्यें या देशांत फार विपुल असून ह्या कलेस उत्तेजनहि फार मिळत असे. अत्तरें व सुगंधी तेलें यांचा शोकी व विलासी लोकांतच प्रसार नसून धार्मिक संस्कार व शुभ कृत्यें करतांना व देवतांचें पूजन करतेवेळेस पुष्पें व इतर सुगंधी पदार्थांचा उपयोग करण्याचा प्रघात सर्वं देशांत प्रचलित आहे. सुगंधी पुष्पें देवांस किंवा साधुसंतांचे मूर्तीस वाहणें तसेंच सुगंधी तैल मर्दन करुन अभ्यंग स्नान करणें फार प्राचीन काळापासून बहुतेक सर्व देशांत प्रचलित आहे. मिसर देशांत मृत मनुष्याचे प्रेतास संस्कार करतेवेळीं सुगंधी तेलाचा वगैरे सौगंधिक पदार्थांचा उपयोग करीत. ग्रीस रोममध्यें सुगंधी पदार्थांचा इतका प्रसार एकदां झाला होता व त्यांच्या किमती इतक्या भयंकर वाढल्या होत्या कीं त्याला आळा घालण्याकरितां सरकारला निरनिराळे कायदे वेळोवेळां करावे लागले. कित्येक अगदी जंगली जातींत सुद्धां अत्तरें व सुगंधी तेलें वापरण्याचा फार शौक आहे. तसेंच गृहशुद्धीकरतां चंदन, अबीर व ऊद
वगैरे सुगंधी पदार्थ जाळण्याचा कित्येक समाजांत प्रघात आहे.
सुगंधी द्रव्यें वर सांगितलेल्या पदार्थांखेरीज रासायनिक मिश्रणानेंहि तयार होतात त्यांना रासायनिक सुगंध म्हणतात.
अत्तरें व अर्क काढण्याच्या निरनिराळया कृति आहेत. त्या सर्व या लेखांत विस्तृत रीतीनें देणें शक्य नाहीं. रासायनिक अर्क जर्मनी वगैरे परदेशांतून आपले देशांत येऊं लागल्यापासून आपलेकडील अत्तराचे कारखाने बहुतेक नामशेष झाले आहेत. कारण हे अर्क किंमतीनें स्वस्त असून त्यांचे मिश्रणानें सुगंधी तेले वगैरे करण्याचें काम अगदी सोपें झालें आहे. ह्यामुळे हिंदुस्थानांतून परदेशी कच्चीं सुगंधी द्रव्यें बाहेर पाठविणें एवढाच धंदा बहुतेक शिल्लक राहिला आहे. लाखों रुपये किंमतीचा कच्चा माल हिंदुस्थानांतून बाहेर जाऊन त्याचेंच रूपांतर होऊन निरनिराळे अर्क व अत्तरें आपले देशांत येतात उ. १९१४|१५ मध्यें वजन टन ६७२५ व किंमत १४ लाख रुपये इतका कच्चा माल आपल्या देशांतून बाहेर गेला.
दिल्ली, अमृतसर व लाहोर येथून या अत्तरांचा व्यापार होतो. कच्चा माल मुंबई बंदरांतून बाहेर जातो. खालील सुगंधी द्रव्यांपासून तेलें किंवा अत्तरें तयार होतात. विलायती किंवा वेडया बाभळीची फुलें, बेलाची फुलें, धूप, शिलारस, कोष्ट-कोळिंजन, वेलची, अगरु, भुईमुग, दालचिनी, संत्र्याचीं फुलें, किंवा संत्र्याच्या सालीचें तेल, खटयानिंबाचें फूल, रोशेल, मोतिया, जुई, चमेली, व जाईचीं फुलें, सोनचाफा, व साधा केवडा, कस्तुरी, जटामांसी, पाच किंवा पानडी, गुलाबाची फुलें, चंदन, गव्हलाकचोरा, तीळ, वाळा, लोबाण, नागरमोथा, दवणा, मरवा, इ.
आपले देशांतून सुगंधी द्रव्यें फक्त परदेशीं जातीं तर विशेष नुकसान आपलें झालें नसतें. परंतु त्याच कच्च्या मालाचीं अत्तरें परत देशांत आल्यानें आपलें फार नुकसान होते. परदेशी अत्तरामुळें कनोजचे कारखाने बंद पडत चालले आहेत. कारण अत्तरांचे तीव्र अर्क (Concent-rated Essences ) साध्या तेलांत मिसळून त्यापासून सुगंधी तेलें व अत्तरें करणें फार सोपें व कमी खर्चाचें झालें आहे. ही मिश्रणें जरी अस्सल अत्तराशीं तुलना केल्यास कमी दर्जाचीं ठरतात तरी त्यांचा खप अतोनात होतो. नुकतीच जर्मनीबरोबर लढाई होऊन त्या लढाईच्या धामधुमींत परदेशीय अर्क येणें अजीबात बंद झालें होतें त्यावेळीं मात्र कनोजच्या कारखान्यास पुन: उत्तेजन मिळालें होतें. कनोज, जोनपूर व गाझीपूर हीं तीन शहरें अत्तरासंबंधानें सर्व हिंदुस्थानांत फार प्रसिद्ध आहेत. आपलेकडील तेलें व अत्तरें काढण्याच्या कृति फार सोप्या परंतु ओबडधोबड तऱ्हेच्या असल्यामुळें त्यांचा टिकाव सध्या परकीय मालापुढें होत नाहीं.
कृति नं. १ – पांढरे तीळ चांगले स्वच्छ धुऊन वाळवावे. नंतर त्यांस थोडा पाण्याचा हात लावून जाईचें किंवा इतर ज्या फुलाचें तेल काढणें असेल त्या फुलाचा एक थर करुन त्यावर एक तिळाचा थर द्यावा. ह्याप्रमाणे एक फुलांचा व त्यावर एक तिळाचा असे थर देत राहावें व नंतर त्यावर एक स्वच्छ रुमाल झांकून १२ पासून १८ सपर्यंत तसेंच राहूं द्यावें नंतर तेलघाणीनें तेल काढावें.
कृति नं. २ –अत्तर करणारे गंधीलोक एका मोठया हांडयांत पाणी भरुन त्यात फुलें टाकतात नंतर त्या भांडयाखालीं आंच लावून त्यांतील वाफ ऊर्ध्वनलिकायंत्रानें दुसऱ्या भांडयांत उतरवितात. ह्या भांडयांत आरंभींच चंदनी तेल किंवा रोशेल घातलेलें असतें. ह्याप्रमाणें संचायकामध्यें वाफेचें पाणी जमून थंड झाल्यावर ह्या पाण्याचे वरतीं तेल जमतें तें युक्तीनें वरचेवर काढून घेतात. हें तेल म्हणजेच उत्तम अत्तर.
कृति नं. ३ –आपणास ज्या फुलांचें अत्तर काढणें असेल तीं फुलें एका कांचेच्या कुपींत भरावीं व तीं बुडेपर्यंत तिळांचें तेल घालून हवा आंत न जाईल अशा रीतीनें बाटलीला बूच मारावें व ती सुमारें महिना सवा महिना उन्हांत ठेवावी. नंतर तीं फुलें काढून टाकून पुन्हा नवीन फुलें घालावीं. याप्रमाणें तीन चार वेळ केल्यानें उत्तम प्रकारचें अत्तर तयार होईल.
गुलाबपाणी – गुलाबाचीं फुलें व पाणी एकत्र करून एका मडक्यांत घालावीं. व ह्या मडक्यावर दुसरें एक लहानसें मडकें पालथें घालून ओल्या मातीनें दोन्हीचीं तोंडें बंद करावीं. व एक नळी घेऊन त्यावरच्या लहान मडक्याच्या कुशींत भोंक पाडून त्यांत ती नळी गच्च बसवावी व त्या ठिकाणींहि ओली माती बसवावी. म्हणजे आंतील पाणी किंवा वाफ बाहेर येणार नाहीं. मग त्या नळीचा मध्यभाग दुसऱ्या शीतल पाण्यांत बुडेल असें करावें, आणि नळीच्या तोंडापुढें एक भांडें ठेवून मडक्याखालीं अग्नि प्रदीप्त करावा. आंतील पाणी तापलें म्हणजे त्याची वाफ होऊन ती नळींतून खालीं ठेवलेल्या पात्रांत पडेल, त्यासच गुलाबपाणी म्हणतात. हें ऊर्ध्वनलिका यंत्रानें काढलेलें पाणी फार सुवासिक होतें.
कृति नं. २ –ओटो डी रोझ ( गुलाबी अत्तराचा अर्क ) - ॥ - द्राम, मॅग्नेशिया १ औंस, डिस्टिल्डवाटर (ऊर्ध्वपातितजल) - ॥ - ग्यालन. प्रथम आटोडीरोझ व मॅग्नेशिया यांचें मिश्रण करावें नंतर डिस्टिल्डवाटर त्यांत घालून ब्लाटिंगपेपरनें गाळून बाटलींत भरावें.
ऑरेंजवाटर –निरोळीच्या तेलाचे थेंब ३० व १/२ द्राम मॅग्नेशिआ एकत्र करून डिस्टिल्डवॉटर ३ पाव घालावें. उत्तम सुवासिक ऑरेंजवाटर तयार होतें.
कोलनवाटर करण्याची कृति न. १ – निरोळीचें तेल २५ थेंब, एसेन्स ऑफ सिदरेट २५ थेंब, आरेंज २५ थेंब, एसेंस ऑफ लेमन २५ थेंब, एसेन्स आफ बर्गेमोर २५ थेंब, एसेन्स ऑफ रोजबरी -॥ - औंस, एसेन्स ऑफ पोर्चुगाल निरोळी -। - औंस, अल-कोहोल १ ग्यालन हे सर्व जिन्नस एकत्र करून काचेच्या भांडयांत बूच मारुन ८ दिवस ठेवावे.
लवेंडर वाटर तयार करण्याची कृति – उत्तम लवेंडर तेल २ द्राम, लवंगेचें तेल -। - द्राम, कस्तुरी २॥ ग्रेन, स्पिरिट आफ वाईन २॥ औंस, पाणी १ औंस, प्रथम लवेंडर थोडें स्पिरिट-मध्यें मिसळून नंतर बाकी वर राहिलेल्या सर्व जिनसा घालून सर्व एकत्र करून सारखें हालवून ८ दिवस ठेवावें. नंतर त्याचा उपयोग करावा.
उदबत्या तयार करण्याची कृति नं. १ – नखला ४॥ टांक, गटाना २॥ टांक, गुलाबकळी - । - टांक, दगडफूल २। टांक, उदाचें फूल -। - टांक, शिलारस -। - टांक, मध - । - टांक, वाळा - ॥ - टांक, ब्राम्ही २॥ टांक, चोपचिनी २॥ टांक, जटामांसी ४॥ टांक, पत्री २॥ टांक, वरील जिन्नस बारीक वस्त्रगाळ करून मधांत कालवावे व काळेपणा येण्याकरितां त्यांत कोळशांची पूड घालून नंतर बांबूच्या चोया घेऊन त्यावर उदबत्या वळाव्या.
कृति नं. २ –मलबारी चंदन -।- टांक, कृष्णागरु -।- टांक, देवदार ४॥ टांक, नखला ५ तोळे, मध ९ तोळे, कवडयाऊद ५ तोळे, अंबर -॥।- तोळा, चोपचिनी ३ तोळे, गहुला १ तोळा, ब्राम्ही १ तोळा, साखर २॥ तोळे, अगरु ५॥ तोळे, कस्तुरी -।- तोळा. सर्व जिन्नस वस्त्रगाळ करून मधांत कालवावे व कोळशाची पूड घालून बांबूच्या चोयांवर उदबत्या वळाव्या.
कृति नं. ३ –डिंकाचे पाण्यांत बुका कालवून दाट बलक करावा नंतर त्या बलकांत एकेक काडी बुडवून काढून बुक्यांत घोळावी. नंतर ती गुळगुळीत फळीवर हलक्या हातानें लाटून साफ व तुळतुळीत करावी.
उत्तम सुवासिक उदबत्ती करणें असल्यास उदबत्ती लाटून झाल्यावर अत्तराचा अगर सुवासिक तेलाचा बोळा हलकेच वरून फिरवून उदबत्ती सावलींत वाळवावी.
कृति नं. ४ – नागरमोथे ४ तोळे, कृष्णागरु ४ तोळे, वाळा २ तोळे, दालचिनी ४ तोळे, तगर २ तोळे, कचोरा २ तोळे, चंदन १८ तोळे, दगडफूल २ तोळे, गव्हला ६ तोळे, गुलाबकळी २ तोळे, मैदालकडी ९ तोळे, कस्तुरी -।- तोळा, हे सर्व पदार्थ वेगवेगळे कुटून शिलारस व कस्तुरीशिवाय बाकीचे एकत्र करून वस्त्रगाळ करावे. नंतर शिलारसांत ती वस्त्रगाळ केलेल्या इतर पदार्थांची भुकटी व कस्तुरी घालून मिश्र करावी. काळा रंग येण्याकरितां कोळशांची थोडी वस्त्रगाळ केलेली भुकटी त्यांत मिसळून सर्व मिश्रण मर्दन करून एकजीव करावा. उदबत्ती करण्यास गोल आकारापेक्षां चौरस आकाराच्या काडया घेणें बरें, कारण चौरस आकार मिश्रण जसें धरतो तसा गोल धरित नाहीं. काडयांवर मिश्रण लावतात तें हातास चिकटूं नये म्हणून सुवास दिलेली कोळशाची भुकटी जवळ ठेवावी व ती मधून मधून हातास लावीत जावी.
अगरबत्ती करण्याचा प्रकार – कस्तुरी १ गुंज, अंबर २ गुंजा, चंदन १ तोळा, केशर १ तोळा, तगर २ तोळे, कंकोळ -।।- तोळा, लवंग फूल -॥- तोळा, गवला १ तोळा, अगरु २ तोळे, उद -।।।- तोळा, शिलारस २ तोळे, नखला १ तोळा, वेलदोडे १तोळा, जायफळ -॥- तोळा, कोष्टकोळिंजन २ तोळे, गुळ १ तोळा, कृष्णागरु १ तोळा, नागर मोथा -॥- तोळा, हे जिन्नस घ्यावे. बाकी सर्व कृति उदबत्तीप्रमाणें.
केशराच्या गोळया करण्याची कृति - चांगलें केशर आणून उन्हांत वाळवावें. नंतर खलबत्यांत बारीक खलावें. वस्त्रगाळ पूड झाल्यावर त्यांत थोडें गुलाबपाणी घालून खलांत बारीक खलून तयार झाल्यावर त्याच्या गोळया करतेवेळीं हातास थोडेसे सुवासिक तेल लावून लांबट गोळया करून वाळवाव्या.
अष्टगंध – केशर, कस्तुरी, कापूर, गोरोचन, देवदार, कृष्णा-गरु, पांढरा चंदन, नागरमोथे, यांना अष्टगंध ही संज्ञा आहे.
कृत्रिम कस्तुरी करणें –एक द्राम अंवरतेल घेऊन त्यामध्यें त्याच्या चौपट त्राम्ल ( नैट्रिक अॅसिड ) थोडथोडें घालावें, नंतर कांचेच्या सळईनें तें मिश्रण पिवळी पूड होईपर्यंत ढवळावें म्हणजे त्याला खर्या कस्तुरीचा वास येऊं लागतो. नंतर त्यांत कस्तुरी १५ ग्रेन मिळवावी.
अरगजा करण्याचा प्रकार – नागरमोथा, गवला, नरकचोरा,जटामांसी, तज आणि वाळा हीं प्रत्येक दोन दोन भाग घ्यावीत. दगडफूल, कृष्णागर, जायपत्री, लवंग, वेलदोडे, चंदन, जायफळ, कापूरकचरी, पाच व कस्तूरी हीं प्रत्येक एक एक भाग, केशर -॥- भाग, मोतिया अत्तर -।- भाग, चंदनी अत्तर -।- भाग, गुलाबी अत्तर -।- भाग या सर्व जिनसा घेऊन त्यांपैकी कस्तुरी, केशर, आणि अत्तरें खेरीज करून बाकी सर्व जिनसा कुटून बारीक वस्त्रगाळ कराव्या. नंतर त्यांत केशर व कस्तुरी खलून त्या मसाल्यास अत्तराचीं पुटें द्यावीं. म्हणजे उत्तम प्रकारचा सुवासिक अरगजा तयार होतो.
अंगास लावण्याचीं सुगंधी उटणीं.
कृति नं. १ – बारीक दालचिनी, वेलदोडयाचे दाणे, शेव-ग्याच्या बिया, नागरमोथा, जायपत्री, कचोरा, वाळा, आणि कापूर हे जिन्नस सारख्या प्रमाणानें घेऊन पाण्यांत वाटून अंगास लावणें; हें उटणें फारच सुगंधी आहे.
दशांगाच्या गोळया – सुगंधी पदार्थांच्या गोळया करून सुवास येण्याकरितां जाळतात. त्या करण्याचा प्रकार येणेप्रमाणे :- उंचीचंदन ८, गुगुळ ८, बाळंतबोळ २, धूप ४, कृष्णागर ८, देवदार २, जायफळ -॥-, कोष्ट कोळिंजन २, कापूर -॥-, वाळा ३, वर लिहिल्याप्रमाणें तोळेवार जिन्नस घेऊन ते बारीक वस्त्रगाळ करून त्या चूर्णाच्या तुपांत गोळया कराव्या. वर सांगितलेल्या कृतीप्रमाणे शुद्ध अत्तरें व तेलें निघतात. परंतु अलीकडे रसायनशास्त्राच्या प्रगतीनें या पूर्वीच्या पद्धतींची जरूरच राहिली नाहीं. रासायनिक रीतीनें प्रथम सर्व जातींच्या सुवासिक द्रव्यांचें पृथक्करण करतां येतें. या पृथक्करणाचे साधनानें प्रत्येक जातीच्या सुगंधांत मूलद्रव्यें कोणतीं आहेत व कोणत्या प्रमाणांत तीं सृष्टपदार्थांत मिसळलेलीं सांपडतात, हा प्रथम शोध करतां आला. या शोधामुळें अत्तरांत भेसळ करून निरनिराळीं मिश्रणें तयार करुन गंधी लोक निर्भेळ अत्तरें म्हणून विकतात. मूळ फुलें किंवा इतर सृष्टिजन्य सुगंधी पदार्थ यांचा उपयोग दिवसेंदिवस मागें पडत चालला आहे व रासायनिक मिश्रणजन्य अत्तरें व अर्क यांचाच खप अतिशय जारीनें सुरू आहे. जर्मन हैको (Heiko) नांवाचे सुगंधी अर्क साधे तेलांत (म्हणजे तिळेल खोबरेल वगैरे) किंवा वासरहित व रंगहीन घासलेट तेलासारखें एक शुभ्र तेल मिळतें त्यांत मिसळून नाना प्रकाराचीं अत्तरे व केंसास लावण्याचीं तेलें तयार करतात. या कृतीनें थोडया खर्चांत तेलें व अत्तरें होत असल्यामुळें करणारास फायदा चांगला राहून मेहनत फार थोडी पडते. कृत्रिम नीळ व वनस्पतिज नीळ यांच्यांत जो फरक तोच कृत्रिम अत्तर व फुलांपासून किंवा इतर सृष्टपदार्थांतून काढलेलें अत्तर यांतहि दिसून येतो म्हणजे खर्या अत्तराला किंवा अर्काला जो सौम्य आल्हादकारक व टिकाऊ सुवास येतो तो कृत्रिम अत्तरांत किंवा अर्कात नसतो. याचें कारण खर्या फुलांत व सुगंधी द्रव्यांत असे कांहीं सूक्ष्म पदार्थ असतात कीं त्यांचा शोध रसारनशास्त्र्यांस अद्याप लागला नाहीं व यामुळें कृत्रिम सुगंध करण्याची कला अद्याप पूर्णावस्थेस पोंचली नाहीं. [ वाङमय – वाङमयसूची `आध’ व `आभ’ पहा. ].