विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडत्या :- कोणत्याहि व्यापारामध्यें, देवघेवीचीं कामें करण्याकरितां, आपले कारखान्यांत तयार केलेला, किंवा कोठारांत सांठवून ठेवलेला माल खपविण्याकरितां किंवा इतर व्यवहारांत आपले तर्फे जबाबदारी अंगावर घेऊन आपल्या वतीनें तिर्‍हाईत माणसाशीं व्यवहार करण्याकरितां मध्यस्थ माणसाची जरूर असते. अशा माणसास अडत्या, गुमास्ता किंवा दलाल अशी संज्ञा आहे. कायद्याच्या भाषेंत गुमास्ता म्हणजे दुसर्‍या मनुष्याकरितां कांहींतरी कृत्य करण्याला अथवा तिसर्‍या मनुष्याशीं असलेल्या देवघेवींत दुसर्‍या माणसाऐवजीं प्रतिनिधी दाखल वागण्याला नेमलेला जो मनुष्य तो होय. ज्या मनुष्याकरितां हा व्यवहार केला जातो म्हणजे गुमास्ता ज्याचा प्रतिनिधी असतो त्याचें नांव मुख्य किंवा मालक असें समजावें ( कलम १८२ कराराचा कायदा ).

व्या पा री द ला लां चे प्र का र अ ड त्या :- मालकानें पाठविलेला किंवा ताब्यांत दिलेला माल दलाली घेऊन विकणें हें याचें मुख्य काम असतें. आडत्या याचें दुसरें काम म्हणजे मालकाकरितां लागेल तो माल विकत घेणें व तो माल ताब्यांत घेऊन मालकाकडे पोंचता करणें. एकाच कामाकरितां अडत्या नेमतां येतो, व त्या कामासंबंधानेंच त्यास मुखत्यारपत्र मिळतें, किंवा मालकाचीं ह्याच प्रकारचीं जीं जीं कामें निघतील तितकीं सर्व कामें बजावण्यास त्यास कुलमुखत्यारपत्रहि दिलें जातें. याची नेमणूक कांहीं विवक्षित कालपर्यंत किंवा मालक मुखत्यारनामा रद्द करी तोंपर्यंत चालू असते. अडत्या दलाल नव्हे.

मुंबईस बाहेर गांवचा जो व्यवहार होतो तो अडत्यांमार्फत होतो. हे अडते पुष्कळ प्रसंगी पेढीवाले सावकारहि असतात. बाहेर गांवच्या मनुष्याची पत मुंबईच्या व्यापार्‍यास अपरिचित असते, त्यामुळें अडत्याच्या अस्तित्वाची आवश्यकता असते, हाअडत्या आपल्या इभ्रतीवर माल खरेदी करून बाहेर गांवच्या व्यापार्‍यास पाठवतो. हा अडतीचा धंदा मुंबईस मोठया प्रमाणावर चालतो. हे अडते कमिशन १ रुपया शेंकडा कापून घेतात; याशिवाय रकमेवर व्याजाची आकारणी करतात. ते  धर्मादाय म्हणूनहि दर शेंकडा चार आणेपासून आठ आणे कापून घेतात, या तर्‍हेनें धर्मादाय म्हणून कापून घेतलेल्या रकमेवर कोणत्याहि प्रकारची देखरेख नाहीं. या अडत्यांपैकीं जे महाराष्ट्रीय अडते आहेत त्यांची असोसिएशन झाली आहे पण त्यांत सर्व पेढया आल्या नाहींत. परदेशाशीं व्यापार करणारे जे अडते आहेत त्यांचें वर्णन परदेशी व्यापाराच्या वर्णनाबरोबर दिलें आहे.