विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकोला तालुका - मुंबई इलाखा.  अहमदनगर जिल्ह्यांतील एक तालुका. उ.अ. १९ १६' ते १९ ४५' व पू.रे. ७३ ३७' ते ७४.

क्षेत्रफळ ५७२ चौरस मैल.  लोकसंख्या सुमारें पाऊण लाख.

सन जमीन उत्पन्न  इतर कर
 १९०३-४  १ लाख रुपये ७०००

प्रवरा मुळा नद्याभोंवतालचा प्रदेश या तालुक्यांत येतो.  जमीन रुक्ष व उंचसखल आहे.  पश्चिमेकडच्या भागांत सह्याद्रि पर्वत आल्यामुळें २००-२५० इंच पर्यंत पाऊस पडतो.  परंतु पूर्वेकडच्या भागांत २२ इंच पाऊस पडतो.

१९१८ सालीं या तालुक्याच्या मुसलमान मामलेदाराला त्यानें सैन्यभरतीच्या कामी लोकांवर जुलुम केल्यामुळें जिवंत जाळण्यात आलें. या दंग्यामुळें हा तालुका थोडा प्रसिद्धीस आला.  एरवी त्याचें नांवहि स्थानिकपत्रांत फारसें ऐकूं येत नसे.

मराठी रियासतींत या परगण्यांतील ढोकरी नांवाचा गांव चिंतो विट्ठल यास इनाम दिल्याचा उल्लेख कागदपत्रांत आढळून येतो.  (राजवाडे १२, ३३० व २०८ )