विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकियाब - जिल्हा- खालचा ब्रम्हदेश अराकान विभागांतील एक जिल्हा. उ.अ. १९०.४७' ते २१०.२७' व पू.रे. ९२०.११' ते ९३०, ५८', क्षेत्रफळ ५१३७ चौरस मैल. उत्तरेस चितागांग जिल्हा आणि उत्तर आराकान. पूर्वेस उत्तर आराकान आणि आराकान योमा. दक्षिणेस आणि पश्चिमेस बंगालचा उपसागर.
बंगालचा उपासागर आणि आराकान योमा यांमधील प्रदेश सपाट असून लेम्रो नदीच्या पूर्वेकडील प्रदेश डोंगराळ आहे. वरचा किंवा उत्तर ब्रम्हदेश आणि हा जिल्हा यामध्यें या डोंगरातून वाट आहे. परंतु ती अति बिकट असल्यामुळें तिचा कोणी उपयोग करीत नाहीं. उत्तरेकडचा प्रदेश देखाली डोंगराळ आहे. या भागांतील नद्या मुख्यत्वेंकरुन तीन आहेत. मयूकलहून आणि लेम्रो या उत्तरेकडून दक्षिणेकडे वहातात. शेल्स (Shales) सँडस्टोन्स नांवाच्या वाळूच्या दगडाच्या खडकांनीं हा प्रदेश व्यापलेला आहे. येथें हत्ती, गवा, वाघ, सांबर, रानटी डुकर इ. रानटी पशू आढळतात. समुद्राजवळ असल्या कारणानें हवा समशीतोष्ण आहे. येथील हिंवाळा फार आल्हाददायक असतो. पाऊस सुमारें १८० इंच पडतो. वावटळी पासून या भागास वारंवार फार त्रास होतो. इ.स. १८६८, १८८४, १८९५ सालीं मोठें वादळ झालें होतें. त्यावेळीं मालमत्तेची बरीच खराबी होते.
इ ति हा स - पूर्वी आराकानच्या राज्यांत हा भाग मोडत असल्यामुळें या भागाचा इतिहास आराकानच्या इतिहासांत दिला आहे. (आराकान पहा ). इ.स. १८२६ सालीं पहिलें ब्रह्मी युद्ध संपल्यावर आराकानबरोबर हा जिल्हा ब्रिटिशांकडे आला. म्योहंग येथे पंधराव्या सोळाच्या शतकांतील कांहीं अवशेष अद्यापि सांपडतात. महामुनी येथें एक देऊळ आहे त्यांत गौतमाची मूर्ति होती. परंतु १७८४ सालीं ब्रह्मी लोकांनीं ज्या वेळीं हा भाग जिंकला त्यावेळी ही मूर्ति त्या देवळांतून अमरपुर येथें नेण्यांत येऊन तेथें तिची स्थापना करण्यांत आली. हल्लीं ती मंडाले येथील आराकान देवालयांत आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे पांच लक्ष तीस हजार आहे.
१९०३-४ मध्यें या जिल्ह्याची विभागणी खालीलप्रमाणें होती. | ||||||
टाउनशीप अथवा पोट विभाग |
क्षेत्रफळ | लागवडी खाली क्षेत्रफळ |
संख्या | लोकसंख्या | दर चौरस मैली लोकवस्तीचे प्रमाण |
|
अकियाब | ६२ | ३० | १ | ६० | ४७४२५ | ७६५ |
राठेडाँग | १२६९ | २३७ | ० | ५४५ | ११३०९८ | ८८ |
पोन्नाजियन | ७०४ | १०६ | ० | २९० | ४९५५५ | ७० |
पॉक्टॉ | ४९६ | १२७ | ० | १९० | ४३३९५ | ८७ |
मिन्बिया | ४८० | १०४ | ० | २९५ | ४१६६१ | ८७ |
कियाक्टाव | ३७० | ११६ | ० | ३१२ | ५३३०६ | १४४ |
मीओहंग | १३२९ | १५२ | ० | २८२ | ४९९७८ | ९७ |
मांगडा | ४२६ | १२८ | ० | ३७७ | ८३२४७ | १९५ |
बरेज भाग डोंगराळ असून तेथें वसती विरळ आहे. जिल्ह्याचें मुख्य ठिकाण अकियाव गांव आहे. वस्ती पुष्कळशी बौद्ध (२८००००) व मुसलमान (१५५२००) लोकांची आहे. या प्रांतांतील मुसलमान वस्तीच्या निम्मे वस्ती या एका जिल्ह्यांत आहे.
निम्मेपेक्षां अधिक लोक आराकानी भाषा बोलतात व सुमारें १/३ लोक बंगाली बोलतात.
शे त की - जमीन वाळुमिश्रित लापण असून तींत उत्पन्न चांगलें येतें. पाऊसहि पुष्कळ पडतो. सपाट असलेल्या भागांत भात व इतर ठिकाणीं इतर बागाइती पिकें होतात. गुरचरणाकडेहि पुष्कळ जमिनीचा उपयोग होतो. डोंगरावर उचली (शिफ्टिंग लागवड) होते. ज्या जमिनीवर उथवाचें पाणी येतें त्या नांगरण्याची देखील जरुरी नसते. पाऊस पुष्कळ पडत असल्यामुळें पाटाच्या पाण्याची मुळींच जरुर नसते. इकडे भात लावण्याची पद्धत नाहीं. फक्त मळी आलेल्या चिखलांत इतस्ततः भाताचें बीं पेरतात म्हणजे झालें. येथील शेतकरी वर्ग आळशी आहे. तसेच येथील गुरांत फार रोग होतात. या दोन कारणांमुळें शेतीची वाढ योग्य होत नाहीं. मजुरीनें काम करण्याची पद्धति येथें फार आहे. उचली लागवड करण्याच्या पद्धतीमुळें मोठमोठी जंगलें नाहींशीं झालीं आहेत. इ.स. १९०३-४ सालीं एकंदर एक हजार एकर जमीन लागवडीखालीं होती पैकीं ९३१ एकर जमिनींत भाताचें पीक होतें.
इतर पिकें - तंबाखु, ऊंस, मिरची, मोहरी इत्यादि. हल्ली १९०३-४ सालापासून लागवडीचें क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललें आहे. चितागांग जिल्ह्यांतील लोक इकडे फार त्वरेनें वसाहत करूं लागले असून त्यांपैकी पुष्कळ जमिनीचे मालकहि बनले आहेत. म्हशींची पैदास येथें होत असते. मेंढ्या कोणी पाळीत नाहीं.
जंगल - सागवान फार थोडें आहे. सन १९०३-४ सालीं जंगलचें उत्पन्न रु. ८८०० होतें.
ख नि ज प दा र्थ - अद्यापि फारसा याविषयीं शोध झालेला नाहीं. दगडी कोळसा खालच्या दर्जाचा असल्यामुळे कोणी तो काढीत नाहीं. सोनें व चांदी या धातूंच्या खाणी येथे असाव्यात असें म्हणतात. पण त्या अद्याप सांपडल्या नाहींत. राकेल तेलाच्या विहिरी येथें आज तीस वर्षे अस्तित्वांत आहेत. दरसाल ५०००० ग्यालन तेल यांतून बाहेर काढतात. हें तेल आसपासच विकलें जातें. विहिरींची खोली सुमारें ३०० फूट पासून ७०० फूटपर्यंत खोल असते.
व्या पा र - हातमागावरील सुती व रेशमी कापड, सान्या चांदीचें काम, सुतार काम, कुंभार काम, घिसाड काम येथें होतें. अराकानी स्त्रिया विणकाम करतात.
भात व तांदुळ हे फक्त व्यापारी जिन्नस येथें आहेत. रस्ते अकियाब गांवाबाहेर मुळींच नाहींत असें म्हटलें तरी चालेल. मुख्य रहदारी पाण्यावरुन होतें. अकियाब बंदरास पुष्कळ ठिकाणच्या बोटी लागतात. इ.स.१८४२ सालीं बंदरांत दीपगृह बांधलें आहे.
या जिल्ह्याचे चार विभग व आठ पोटविभग (टाऊनशिप्स ) आहेत.
विभाग - अकियाब, मिन्विया, कियाक्ता, बुथिडाँग. टाऊन शिप्सचीं नांवें वरील कोष्टकांत दिलींच आहेत. प्रत्येक विभागावर एक्स्ट्रा कमिशनर मुख्य असतो. आराकानचा कमिशनर सेशन्स जज्ज असतो.
ज मी न म ह सू ल - इ.स. १८३२ सालीं हा वसूल २.५ लाख होता. इ.स. १८३७ सालीं जंगलांतील माल, झोंपड्या, होड्या, कारागीर (हातांनी काम करणारे) यांजवरील सर्व कर उठविण्यांत आले. इ.स. १८६४-६५ सालीं मासे धरणार्या कोळ्यांवर कर बसविण्यांत आला. इ.स. १८६६-६७ सालीं उत्पन्न पांच लाखांचें होतें. इ.स. १८७९-८० सालीं नवीन धारापद्धति अंमलांत आल्यावर उत्पन्न ७.७ लाखांचें झाले. पुन्हा १८८५-८८ सालीं पाहणी झाल्यावर उत्पन्न ८.३ लाखांचें झालें. इ.स. १९०२-३ सालीं उत्पन्न १२ लाख होतें.
इ.स. १८८५-८८ सालीं झालेल्या पाहणींत दर एकरी आकार १-४-० ते ३-०-० रुपये पर्यंत होता.
उत्पन्न दाखविणारें कोष्टक (आंकडे हजाराचे आहेत.) | ||||
१८८०-८१ | १८९०-१ | १९००-१ | १९०३-४ | |
जमिनीपासून | ७०२ | ९८६ | ११८५ | १४२० |
एकंदर उत्पन्न | २३३६ | २६०२ | २६९७ | ३०९७ |
जिल्ह्यांत लोकसंख्येशीं स्त्रियांचें प्रमाण कमी आहे. फक्त अकियाब गांवांत देवी टोंचणें कायद्यानें सक्तीचें केलें आहे. (इं.ग्या. भाग ५)
अकियाब विभाग लोअर बर्मा. अकियाब जिल्ह्याचा एक विभाग.
अकियाब पोटविभाग - उ. अ. २०० ६' ते २०० १६' २०० ६' आणि २०० १६' उत्तर अक्षांक्ष. ९२० ४५' आणि ९२० ५६' पूर्व रेखांश. व पू. रे. ९२० ४५' ते ९२० ५६' या पोटविभागांत एक गांव असून ६० खेडीं आहेत. लोकसंख्या सुमारें अठेचाळीस हजार, इ.स. १९०३-४ जमीन महसूल ५०००० रुपये होता, लागवडीखालीं क्षेत्र ३० चौ. मैल होतें.
अकियाब गांव - अकियाब शहर. उ. अ. २०० ८' व पू. रे. ९२० ५५' हें गांव कलदन नदीच्या मुखाशीं आहे. लोकसंख्या सुमारें अडतीस हजार. यांत बंगाली लोक सुमारें अर्धे असून बाकीचे आराकानी, चिनी व ब्रम्ही लोक आहेत.
अकियाब नांवाची पूर्वपीठिका अद्यापि अज्ञात आहे. अक्यात् नांवाचा अपभ्रंश हा असावा असें कांहींचें म्हणणें आहे. अक्यात् हें बुद्धाच्या जबड्याच्या मंदिराचें नांव आहे. या गांवास सितत्वे हें आराकानी नांव असून त्याचा अर्थ (जेथे लढाई सुरु झाली ) असा आहे. याहि नांवाविषयीं कांही दंतकथा मिळत नाहीं. ब्रिटिश अंमल सुरु होण्यापूर्वी हें गांव मासे मारणारांचे एक खेडें असून त्यावेळी म्योहंग ही आराकानची राजधानी होती. परंतु ब्रिटिशांचा अंमल सुरु झाल्यापासून हा गांव आराकानची राजधानी आहे. बंदरांत भरतीवर मोठमोठीं गलबतें येऊं शकतात. येथील हवा अति रोगी असल्याकारणें कॉलरा वगैरे रोग नेहमीं उद्भवतात. येथे भाताचा व्यापार पुष्कळ चालतो. व तो बहुतेक हिंदी लोकांच्या ताब्यांत आहे. इ.स. १८७४ सालापासून येथें म्युनिसिपालिटी आहे. येथें तुरूंग, सरकारी कचेर्या सरकारी दवाखाने वगैरे सोयी आहेत.