विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अदिलाबाद जिल्हा : हैद्राबाद संस्थानांतील वारंगळ भागाच्या उत्तरेकडील एक जिल्हा. इ. स. १९०५ च्या फेरबदलापूर्वीं हा सिरपुर व तांदूर यांचा बनलेला एक पोटभाग होता. याच्या उत्तरेस वर्हाड व मध्यप्रांतांतील चांदा जिल्हा; आग्नेयीस वर्हाडपैकीं नांदेड व वाशिम जिल्हे; आणि दक्षिणेस करिमनगर आणि निझामाबाद जिल्हे आहेत. पैनगंगा नदीमुळें हा जिल्हा वर्हाडपासून विभक्त झाला आहे. तसेंच वर्धा व प्राणहिता नद्यांच्या मुळें चांदा जिल्हा यापासून निराळा झाला आहे. याचें क्षेत्रफळ ७४०३ चौ. मै. आहे. यांत सह्याद्री पर्वत किंवा सातमाळ डोंगर वायव्य ते आग्नेय दिशेने १८५ मैल पसरलेला आहे. गोदावरी नदी याच्या दक्षिण भागास पाण्याचा पुरवठा करते. दुसरी महत्त्वाची नदी पैनगंगा. येथें मोठालीं अरण्यें आहेत व त्यांत सागवान, अबनूस, बिलगू, जिट्टिगी, आंबा, चिंच व बिजासाल वगैरे झाडें मोठालीं वाढतात.
डोंगराळ प्रदेशांत मोठी शिकार पुष्कळ सांपडते, ती येणेंप्रमाणें – वाघ, चित्ता, अस्वल, तरस, लांडगा, आणि रानटी कुत्रा. तसेंच मैदानांत नीलगाय, सांबर आणि भेकर ( ठिपक्यांचे हरीण ) हीं मिळतात. मोठाल्या अरण्यांमुळें सर्व संस्थानांत हा भाग अतिशय रोगट झाला आहे. मे महिन्यांत उष्णतामान १०५० वर येतें तें डिसेबर महिन्यांत ५६० खालीं उतरतें. पावसाचें सरासरी मान ४१ इंच आहे.
इ. स. १९०१ च्या खानेसुमारीप्रमाणें येथील लोकसंख्या ४,७७,८४८ होती. सध्यां या जिल्ह्याचे पुढीलप्रमाणें आठ तालुके केले आहेत; सिरपुर, राजुर, निरमल, चिन्नुर, एदलाबाद, लक्षेटिपेट, किनवट आणि जानगांव. शेंकडा ८० हिंदु लोकांची वस्ती आहे व शेंकडा १० गोंड लोक आहेत. येथील वसूल सुमारें ६॥ लाख आहे. राज्यव्यवस्था तीन तालुकेदारांच्या हातीं असून त्यांतील पहिल्या वर्गाचा तालुकेदार दिवाणी व फौजदारी काम पाहतो. व तिसरा तालुकेदार २ व ३ वर्गांचे मॅजिस्ट्रेटचे अधिकार चालवतात. या भागांत लोकलबोर्डांची स्थापना झाली आहे. [ इं. गॅ. ५ ]