विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्कादेवी - कल्याणीच्या पश्चिम चालुक्य राजघराण्यांतील दुसर्या जयसिंहाची वडील बहीण. हिचा उल्लेख बर्याच कागदपत्रांतून व अंकित लेखांतून सांपडतो, त्यावरुन ही सुप्रसिद्ध व्यक्ति असावी असें साहजिक अनुमान निघतें. तिला ''गुणद – बेडंगी '' (सद्गुणांची नवलाई ) व ''एकवाक्ये '' (एकवचनी) अशीं विशेषणें लावलेलीं आहेत व ''लढाईंत आणि शत्रुपक्षीय राजांना मारण्यांत प्रतिभैरवी '' असें तिचें वर्णन केलें आहे. इ.स. १०२१ किंवा १०२२ मध्यें दुसर्या जयसिंहाच्या सार्वभौमत्वाखालीं किसुकाड (सप्तती ) वर ती राज्य करीत होती (इं. अँ. पु. १८. पा. २७५), पुढें पहिल्या सोमेश्वराच्या अमदानींत सुद्धां ती अधिकारारुढ असलेली दिसते. कारण इ.स. १०४७ च्या एका लेखांत बेळगांव जिल्ह्यांतील गोकागे (गोकाक) च्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेली आपण तिला पाहतों (विजापुर जिल्ह्यांतील अरसीबीडी येथील शिलालेख). इ.स. १०५० किसुकाड (सप्तति), तोरगरे ( पद ) आणि मासवाडि ( एकशतचत्वारिंशत् ) या मुलुखांवर तिचें राज्य होतें (धारवड जिल्ह्यांतील सूडि गांवचा शिलालेख). पुन्हां इ.स. १०५३ किसुकाड (सप्तति ) वर तिच्या वर्चस्वाचा उल्लेख आढळतो (अरसीबीडी येथील दुसरा एक शिलालेख ) व त्याच लेखांत विक्रमपुर (हल्लींचें अरसीबीडी गांव, हुनगुंद तालुका, बिजापुर जिल्हा) ही तिची राजधानी असल्याचें ध्वनित होतें. इ. स. १०६६ तली जी एक नोंद आहे तींत बनवासी (द्वादश- सहस्त्र) आणि पानुंगल (पंचशत) यांचा अधिपति, कादंब महामंडलेश्वर तोयिमदेव याची मातोश्री म्हणून अक्कादेवीचें नांव आहे (धारवाड जिल्ह्यांतील होत्तुर गांवचा शिलालेख). त्यावरुन तिचा नवरा हानगलच्या कादंबांपैकीं असावा असें दिसतें; पण त्याचें नांव मात्र सांपडत नाहीं.
(बाम्बे ग्या.- दि डिनॅस्टीज ऑफ दि कॅनॅरीज् डिस्ट्रिक्स ऑफ बाँबे - पु. १ भा. २ पा. ४९५)