विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकरमासे - ( महाराष्ट्रीय ) अकरमासे म्हणजे जे पूर्ण बारामासे नाहींत ते, म्हणजे ज्यांत कांहीं तरी कमीपणा असलेले. आज हा शब्द कोणच्याही तर्हेच्या ब्राम्हणेतरांपासून झालेल्या अधर्मसंततीस लावतात. पूर्वी श्रीमान मराठे लोक आपल्या जावयांना लग्नप्रसंगी, एकादी सुंदर स्त्री नजर करीत असत. अशा स्त्रीपासून झालेल्या संततीला 'अकरमासे' असें म्हणतात. ही जात ठाणें जिल्हयांत व कांहींशी पश्चिम खानदेशांत आढळते. इतर जिल्ह्यांत यांची वेगळी जात आढळत नाहीं. यांना ''कडू'' व औरससंततीला ''गोड'' अशी संज्ञा आहे. शिंदळे, लेकावळे वगैरेहि म्हणतात. पूर्वी यांचा दर्जा अगदीं कनिष्ठ प्रतीचा असल्यामुळें यांना गुलामांप्रमाणे राबावें लागे. यांच्यांतहि दोन वर्ग आहेत. एक अस्सल व दुसरा कमअस्सल. मराठा स्त्रीला ब्राम्हण किंवा मराठा पुरुषापासून झालेली संतति अस्सल; व खालच्या दर्जाच्या यजमानापासून झालेली कम अस्सल. ( मुं.गॅ. ठाणें १३ पृ.१४२) सध्या यांचा व्यवसाय दुकानदारी, शेतकी, सुतारकी, लोहारी वगैरे असतो. हे मराठी बोलतात. रहाणी स्वच्छ असते परंतु स्वभावतः आळशी असून डामडौली असतात. हे मद्य व मांस सेवितात. पेहेराव बहुतेक मराठीधाटणीचा असतो. हे स्मार्त किंवा भागवतपंथी असून ब्राम्हण उपाध्यायांना पूज्य मानतात. व्रतें उपोषणें पाळतात. जातिसभा तंट्यांचा निवाडा करते. सांपत्तिकदृष्ट्या यांची स्थिती खालावलेली आहे. मुलांना शिक्षण देत नाहींत. विधवाविवाह संमत आहे. मृतांना जाळतात किंवा पुरतात. (''अधर्म संतति '' पहा)