विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अझोटस :- अझोटस हें नांव ग्रीक व रोमन लेखकांनीं पॅलेस्टाईन मधील अशदाद नांवाच्या प्राचीन शहराला दिलें होतें. एकर जिल्ह्यांतील एसदुदगांवीं असलेल्या पडक्या इमारती अझोटसच्या आहेत असें दाखविण्यांत येतें. सीरिया व इजिप्‍त यांमध्यें असलेल्या प्रसिद्ध लष्करी मार्गावर व भूमध्य समुद्र किनार्‍याच्या आंत ३ मैलांवर हें शहर होतें. हें प्रसिद्ध पांच फिलिस्टाईन शहरांपैकीं एक होतें. येथें ड्रेगन पूजा संप्रदाय चालू होता. इस्त्रायली सत्तेचा प्रतिकार करून अझोटस मॅकाबीसचे वेळेपर्यंत स्वतंत्र होतें असे म्हटलें तरी चालेल. इ. स. पूर्वी ७२१ त, असुरियन लोकांनीं हें शहर घेतलें. परंतु लगेच स्वतंत्र होऊन यानें पुढील शतकांत ईजिप्‍तचा राजा सामेटिकस ह्याच्या विरुद्ध २९ वर्षे टक्कर दिली. ख्रिस्ती शकारंभाचे सुमारास येथें एका बिशपचीं योजना झाली परंतु शहर या दृष्टीनें अझोटसचा दर्जा कधींच वाढला नाहीं. एसदुद येथें प्राचीन मुख्य अवशेष म्हणजे एक सारासन पद्धतीचा खान ( धर्मशाळा ) आहे.