विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडुर  - मुंबई, धारवाडजिल्हा, हनगलच्या पूर्वेस दहा मैलांवर असलेलें खेडें. लोकसंख्या सुमारें दीड हजार. बाराव्या शतकांतील एका शिलालेखांत पांदीपुर ( Pandipur ) या नांवाखालीं या गांवाचा उल्लेख असून इ. स. १८६२ पर्यंत हें एका लहानशा भागाचें मुख्य ठिकाण होतें. पूर्वेस कालेश्वर महादेवाचें देऊळ असून तेथें (Fleets Kanarese Dynasties 36,85,47) सन १०४४ सालचा एक शिलालेख आहे. या गांवांत आणखी दोन शिलालेख सांपडले आहेत. एक सन १०३४ चा असून दुसर्‍यावर तारीख नाहीं. ज्यावर तारीख नाहीं त्या शिलालेखाच्या आंतील मजकुरावरून तो पूर्वींचे चालुक्य राजे यांच्यांतील सहावा राजा कृत्तिवर्मा (इ. स. ५६७) याच्या वेळचा आहे असें स्पष्ट दिसतें. आणखी एक शिलालेख तेरावा राष्ट्रकूट राजा कृष्ण दुसरा याच्या वेळचा (८७५ ते ९११) इ. स. ९०४ मधील आहे. इ. स. १०४४ तील शिलालेख पश्चिमेकडचे चालुक्य वंशांतील राजांपैकीं सहावा राजा सोमश्वर पहिला (इ. स. १०४२-१०६८) याचे वेळचा आहे. याच्या वेळचे एकंदर ४० शिलालेख सांपडले आहेत. (मुं. गॅ.)