विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजंठा डोंगर :- बुलढाणा जिल्ह्यांतील दक्षिणेकडील प्रदेश अजंठा डोंगरानें व्याप्त झालेला आहे. या डोंगरास चांदोर, सातमाळा, इनह्याद्रि डोंगर, सह्याद्रिपर्वत अशी निरनिराळीं नांवें आहेत. पश्चिमेकडील सह्याद्रिपर्वत ज्या फत्तराचा बनलेला आहे तोच फत्तर या डोंगरांत आहे. सह्याद्रिपासून हा डोंगर नाशिक जिल्ह्यांतील भनवाड जवळ काटकोनांत सुरू होत असून तो पूर्वेकडे सुमारें ५० मैल पर्यंत पसरलेला आहे. सरासरी उंची ४००० फूट किंवा कांहीं ठिकाणीं त्यापेक्षांहि अधिक आहे. या ठिकाणीं बरीच रूंद खिंड असून, या खिंडींतूनच मनमाडजवळून जी. आय. पी. रेल्वे जाते. मनमाडच्या दक्षिणेस अकईपासून पुन्हा हा डोंगर लागतो. पुढें कासारी येथें दुसरी खिंड लागते व सुमारें ५० मैलपर्यंत हा डोंगर ईशान्येकडे पसरलेला आहे. येथून हे डोंगर वर्हाडमध्यें शिरतात. निजामच्या राज्यांतील परभणी आणि निजामाबाद या जिल्ह्यांत हे डोंगर असून या ठिकाणीं या डोंगरास सह्याद्रि पर्वत असें स्थानिक नांव आहे. हे डोंगर दक्षिण पठराची उत्तरेकडील सीमा आहेत. पूर्वीं गुजराथ आणि माळवा याम धून व्यापार किंवा सैन्य दक्षिणेंत यावयाचें असल्यास तें मनमाड आणि कासारी खिंडींतून येत असे; आणि गावताला आणि अजंठा हे मार्ग असत. अजंठा हें हल्लीं निजामच्या राज्यांत असून येथें बौद्धांचीं कोरीवलेणीं आहेत. या डोंगरांत जिकडे तिकडे किल्ले आहेत.
उंच शिखरें - मारकिंद ( मार्कंडेय ) ( ४३८४ फूट ) हें इ. स. ८०८ सालीं राजे लोकांचे राहण्याचें ठिकाण असून बागलाणांत जाणार्या मार्गावर आहे; समोरच सप्तशृंग नांवाचें क्षेत्रस्थान आहे ( ४६५९ फूट ). रावळ्या-जावळ्या-हे दोन किल्ले इ. स. १६३५ सालीं मोगलांनीं घेतले.
धोडप - या डोंगरांतील सर्वात उंच शिखर (४७४१). तुद्रई ( ४५२६ फूट).
ऐन इ - अकबरीमध्यें या डोंगरांचा सहिया अथवा सहसा असा उल्लेख केलेला आहे.