विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अथर्ववेद - या वेदासंबंधीं सामान्य माहिती वेदविद्या या विभागांत तिसर्या प्रकरणांत दिली आहे. त्यावरुन या वेदाचें सामान्य स्वरूप लक्षांत येईलच. यज्ञांतील चार मुख्य ॠत्विजांपैकीं ब्रह्मा अथर्ववेदी असावा या कल्पनेचा उदय कसा झाला, अथर्व्यांचें पौरोहित्य त्रैविद्यांनीं कसें हिसकावून घेतलें वगैरे माहिती दुसर्या व तिसर्या विभागांत प्रसंगोपात दिलीच आहे. अथर्ववेदांगभूत जें सूत्र वाङमय आहे त्यासंबंधीं विवेचन येथे देण्याचें योजिलें आहे.
१ वैतानसूत्र
अ थ र्व वा ङ म या त स्था न – अथर्ववेदाचे धर्मविधि किंवा संस्कार ज्यांत सांगितले आहेत असे पांच ग्रंथ आहेत; यांना श्रुति इतके महत्वाचे ग्रंथ मानतात. ते पुढें दिले आहेत:- (१) कौशिकसूत्र किंवा संहिताकल्प किंवा संहिता विधि. (२) वैतानकल्प किंवा वैतानसूत्र. (३) नक्षत्रकल्प. (४) शान्ति कल्प (५) अंगिरसकल्प किंवा अभिचारकल्प किंवा विधानकल्प.
अथर्ववेदाच्या नऊ शाखा किंवा भेद फार पुरातन कालापासून करण्यांत आलेले आहेत; पैकीं चार शाखांचे वरील पांच ग्रंथ आहेत. त्या चार शाखा येणेंप्रमाणें–
१ शौनकीय २ अक्षल ३ जलद ४ ब्रह्मवद. अथर्व-वेदस्य नवभेदा भवन्ति। तत्र चतसृषु शाखासु शौनकादिपु किशकोऽयं संहिता विधि:। (अथर्ववेद पद्धति- उपोद्धात).
पैप्पलाद ह्या नांवाच्या एका अथर्ववेदाच्या शाखेचें नांव सर्वांमध्यें अधिक परिचित आहे. कौशिक व वैतान सूत्रें ह्या शाखेचीं नाहींत; कारण त्या सूत्रांत प्रतीकांची अवतरणें न घेतां पैप्पलादाचे मंत्र सबंधच्या सबंध घेतलेले आहेत. शौनक व देवर्शी यांच्या मापनाविषयीं मतांना विरोध करण्यांत आला आहे; व कौशिकसूत्र ८५-६-७ येथें कौशिकसूत्र शौनकीय शाखेचें आहें असें स्पष्टपणें सांगितलें आहे. शौनकीनांचें मत शेवटीं दिलें आहे; आणि कौशिकाच्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें तें ग्राह्य समजलें पाहिजे.
वर जीं पांच श्रौतसूत्रें ( किंवा ५ कल्प ) दिली आहेत त्यापैकीं आंगिरस किंवा अभिचारकल्प हे अथर्ववेदाचें परिशिष्ट आहे; त्यांत अभिचार किंवा जादुटोणा या विषयासंबंधीं लिहिलें आहे. कौशिक सूत्राच्या ६ व्या अध्यायाच्या स्पष्टीकरणास अभिचार कल्पाचा थोडासा उपयोग होण्यासारखा आहे.
नक्षत्रकल्प व शान्तिकल्प हीं दोन्ही सुद्धां अथर्ववेदाचीं परिशिष्टेंच आहेत. हें त्यांच्या नांवावरून समजण्यासारखें आहे. ब्रह्मवेदपरिशिष्टं-नक्षत्रकल्पाभिधानन् । एके ठिकाणीं नक्षत्रकल्पाला पहिलें परिशिष्ट म्हटलें आहे; व परिशिष्टांच्या यादींत त्याचें नांव प्रथम घातले आहे.
कौ शि क वै ता न सू त्रा चा प र स्प र सं बं ध :- कौशिक व वैतानसूत्रें यांत संस्कार सांगितलें आहेत; परंतु इतर वेदांच्या शाखांतील ज्या सूत्रांत संस्कार सांगितले आहेत त्या सूत्रांच्या संबंधाहून कौशिक व वैतान सूत्रांचा परस्पर संबंध व त्यांचा अथर्व संहितेशीं संबंध अनेक बाबतींत निराळा आहे. त्रैविद्यम किंवा त्रयी विद्या असें इतर तीन वेदांना म्हटलें आहे; व त्यायोगें अथर्ववेदांतील सूत्रें वेंद संज्ञेस पात्र असण्याबद्दल संशय दर्शविला आहे. श्रौत संस्कारांत अथर्व वेदांतील सूक्तांचा उपयोग करण्यास तीं अपात्र आहेत अशी समजूतहि व्यक्त झाली आहे. ब्राह्मणांत गोपथ ब्राह्मण व श्रौत सूत्रांत वैतानसूत्र हीं अनुक्रमें ब्राह्मणवाङमय व श्रौत-वाङमय यांतील अगदी अलीकडील रचलेले ग्रंथ आहेत. अथर्ववेदांत गोपथ ब्राह्मण आहे इतर वेदांतील चरणांत वाङमय लिहिण्याची जी पद्धत प्रचारांत होती तिचें अनुकरण गोपथ ब्राह्मण व वैतानसूत्र यांत केलेलें आहे. वैतानसूत्रासंबंधी ही हकीकत झाली. पण मान्त्रिकविद्या, भूत काढणें वगैरे ज्या वेदांत आढळतात, त्या वेदाला चिकटून राहणार्या मनुष्याला वितक्रमाविषयीं व त्याच्या भूत काढण्याच्या वगैरे क्रियासंबंधीं प्रत्यक्ष व्यवहारांत अनेक गोष्टी प्रचलित होत्या व इतर वेदांना माहीत नसणार्या अनेक गोष्टी या अथर्ववेदानुयायांकडून जगापुढें मांडल्या गेल्या. अथर्वण ग्रंथांत अथर्ववेदांतील सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या कौशिक सूत्राला जी उच्च स्थिति प्राप्त झाली आहे ती वरील कारणामुळेंच होय.
गृह्यसूत्रें श्रौतसूत्रांवर अवलंबून आहेत. गृह्यसूत्रांत श्रौतसूत्रांचा उल्लेख अनेक ठिकाणीं स्पष्टपणें केलेला आहे.
श्रौतसूत्रांत ज्या विधीचें एकदां वर्णन आलें आहे त्यांचें पुन्हा वर्णन गृह्यसूत्रांत केलेलें नाही.
आपस्तंबांत धर्मविषयक सर्व सूत्रें एके ठिकाणीं केलीं आहेत; आपस्तंबाच्या सूत्रग्रंथांत श्रौतसूत्र गृह्यसूत्राच्या अगोदर आलें आहे.
गृह्यसूत्रें बरोबर रीतीने कळण्यास मुख्य अडचण ही येते कीं तीं श्रौतसूत्रांवर सर्वस्वी अवलंबून असून जणू काय त्यांचीं परिशिष्टें आहेत असें दिसतें व श्रौतविधींची माहिती पूर्णपणें आपणांस आहे असें तीं सूत्रें गृहीत धरतात.
कौशिक व वैतानसूत्रें यांतील परस्पर संबंध वर दिलेल्या गृह्य व श्रौतसूत्रांतील संबंधासारखा नाहीं. कौशिकसूत्र वैतानसूत्रावर कोणत्याहि रितीनें अवलंबून नाहीं; उलट वैतानसूत्र कौसिकसूत्रावर अवलंबून आहे ही गोष्ट ज्या ठिकाणीं दोन्ही सूत्रांतील विषयांत फरक असेल व श्रौतविधि व गृह्यविधि यांत फरक असेल तेथें द्दष्टोत्पतीस येते. म्हणून वैतानसूत्रासंबंधीं बहुतकरून असें म्हणतां येईल कीं, अमुक एका शाखेंत ज्यांची सावकाश व धिम्मेपणानें वाढ झाली आहे अशा श्रौतसंस्कारांतील विधींपासून वैतानसूत्र आपोआप सहज बनलेलें नाहीं; तर तें सूत्र मुद्दाम तयार करण्यांत आलें; व तें ज्या वेळेस अथर्ववेदानुयायांना त्यांचे इतर वेदांच्या पुरोहितांबरोबर वादविवाद चालू असते त्यावेळीं वेदांतील संस्कार व विधी करण्याकरितां आपला स्वत:चा एक सूत्रग्रन्थ असावा असें वाटावयास लागलें त्या वेळेस तयार करण्यांत आलें. वैतान सूत्रास अथर्व वेदांतील संस्कारांचा पाया असें म्हणतां येणार नाहीं; कारण त्यांत दुसरीकडून उसना घेतला नाहीं असा किंवा कौशिक सूत्रांत आढळत नाहीं असा फारच थोडा भाग आहे. वैतानसूत्रांत यजु:संहितेंतील अनेक ॠचा व पाठ आढळतात; व संस्कारांचें वर्णन करितांना त्यांत कात्यायनाच्या श्रौतसूत्राचे अनुकरण केलेलें स्पष्ट दिसतें. वैतानसूत्र १.१.८. देवता हर्विदक्षिणा यजुर्वेदात ! ह्या वाक्यावरून ही गोष्ट आपोआपच उघड दिसते. याच वरून दुसरी गोष्ट अशी दिसून येते कीं वैतान व कात्यायन ह्यांचा परस्परसंबंध असावा. कारण कात्यायनावर लिहिलेल्या भाष्यांत वैतानसूत्र, आथर्वण किंवा अथर्व सूत्र या नांवांखालीं वैतान सूत्रांतील अनेक वार अवतरणें घेतलीं आहेत. वैतानसूत्र व कौशिकसूत्र यांच्या परस्परसंबंधाविषयीं असें म्हणतां येईल कीं कौशिक सूत्र ही दुसरी एक स्वतंत्र संहिता आहे असें समजून अशी गोष्ट गृहीत धरली आहे कीं कौशिकांतील संस्कार व अथर्व वेदांतील मन्त्राहून निराळया ठिकाणाहून घेतलेले मंत्र हे वाचकांना माहीत आहेत व त्यांचा त्यांना अर्थहि समजला आहे. वैतान सूत्राची उत्तमप्रत व त्याचें उत्तम भाषांतर गावें साहेबांनीं संपादिलेल्या वैतान सूत्र ग्रन्थांत आढळतें.
अं त र्र च ना – वैतान सूत्रांतील कांहीं मजकूर अथर्व वेदांतील कांहीं भागाशीं शब्दश: जुळतो. वैतान सूत्रांतला कोणता भाग अथर्व वेदाच्या कोणच्या भागाशीं जुळतो तें पुढें दिलें आहे.
वैतान सूत्रांतील १. १९; १०. ५; ३७. २३; ३. १७; ९. ४; २८. ३२ – इत्यादि सूत्रें अनुक्रमें अथर्ववेदांतील १९. ६९, १-४; १२. १, २३-२५; १८. ३, ८; ९; २, ४८; १, ६१; २, ५३; ४, ४४; ७. ११०, ३; ३; १०, ७; ३. १७, २ या सूक्तांशी जुळतात. अथर्ववेदांतच फक्त आढळणारा असा वैतान सूत्रांतला मजकूर कौशिकांत येणारा मजकूर वगळल्यास फारच थोडा आहे.
वैतान सूत्रांत ब्राह्मण ब्रह्मवेदविद् असला पाहिजे असें म्हटलें आहे. ( वै. सू. १. १. ) ब्रह्मवेद हा शब्द कौशिकांत आढळत नाहीं; पण त्याचे ऐवजीं कौशिकांत व वैतान सूत्रांत एके ठिकाणीं भृग्वंगिरोविदू हा पुराण शब्द आढळतो ( कौशिक ६३-३ व ९४-३ आणि वैतान १. ५). अथर्वा-द्गिरोविदं ब्रह्माणम् । गोपथ ब्राह्मण व परिशिष्टें यांतहि भृग्वंगि-रोविद् शब्द आढळतो. ब्रह्मवेदविद् हा शब्द अलीकडचा दिसतो. अथर्ववेद व त्याचे पुरोहित यांचे श्रेष्ठत्व कोठें कोठें वैतानांत दर्शविण्यात आलें आहे. उदाहरणार्थ वै. सू. ११. २ यांत सांगितलें आहे कीं, उद्गातर्, होतर् व अध्वर्यु यांच्या ऐवजीं अथर्वाङ्गिरोविद् ब्राह्मण पसंत करावा. अथर्वण वर्गांतील पुरोहित सर्वांत श्रेष्ठ आहे हें दाखविण्याचा प्रयत्न वै. सू. ६०. १ व ३७. २ यांत स्पष्टपणें केलेला दिसतो. ब्राह्मण पुरोहित व त्याचा वेद यांचा मोठेपणा दर्शविण्याकरितां अथर्व परिशिष्टांत शक्य तो प्रयत्न इतरांकरितां अपशब्द योजना करूनहि करण्यांत आला आहे.
अशा प्रकारचा प्रयत्न अथर्ववाङयांतच केवळ करण्यांत आलेला आहे असें नाही. तर महाभाष्यांत अथर्ववेदाला वेदांमध्यें प्रथमस्थान देण्यांत आलें आहे. अथर्वाङ्गिरसाशीं पुरोहित परिचित असला पाहिजे असे याज्ञवल्क्यानें ( १.३१२ ) म्हटलें आहे. ॠग्वेदाच्या गृह्यसूत्रांत तर्पणसमयी अथर्वॠषि सुमन्तु याला ॠषींच्या यादींत प्रमुख स्थान देण्यांत आलें आहे ( शाखा ४. १०, ३ ).
अथर्वण वाङमयांत वैतान सूत्राखेरीज इतरत्र कोठेंहि न आढळणारा असा वैतान सूत्रांत फारसा मजकूर नाहीं; मात्र वै. सू. २-१० व ४३-२५ यांत अभिचार स्वतंत्र रीतीनें आणला आहे. शौनक यज्ञाविषयीं इतरत्र आढळत नाहीं. शान्त्युदकाचें वर्णन वै. सूत्रांत ज्या उतार्यांत आलें आहे त्या उतार्यांतील संस्कारानें अथर्वण वाङमयांत एका संस्काराची भर पडली आहे.
कौशिकसूत्र व गोपथ ब्राह्मण यांत ज्याप्रमाणें पैप्पलाद शाखेंतील सूक्तें घेतलीं आहेत त्याप्रमाणें वैतानसूत्रांतहि स्वतंत्रपणें पैप्पलादांतील ३ सबंध सूक्तें घेण्यांत आलीं आहेत. (पैप्पलाद शाखा १०.१७; १४.१; २४.१).
वैतानसूत्र व कौशिक सूत्र यांचा परस्पर संबंध अनेक प्रकारचा आहे. वैतानसूत्राचें मुख्य आठ अध्याय आहेत; परंतु त्यांना प्रायश्चित सूत्रें जोडून वैतान सूत्राचे एकंदर १४ अध्याय करण्यांत आले आहेत.
कौशिक सूत्राचे १४ अध्याय आहेत तेव्हां वैतानाचेहि १४ च असावेत म्हणून वैतानाचे १४ करण्यांत आले असावेत. दोन्ही सूत्रांतील साम्याची आणखी कांहीं उदाहरणें पुढें दिली आहेत :- (१) दोन्ही सूत्रांत अध्यायाच्या प्रारंभीं फार ठिकाणीं एक लांबलचक मन्त्र आढळतो. (२) अयस् या स्वरूपांत ज्यांचें प्रथमेचें अनेकवचन असतें असे शब्द द्वितीयेप्रमाणें योजले आहेत. वै. सू. ११.२४ व कौ.सू. ८.१९. (३) दोन्ही सूत्रांत प्रसंगविशेषीं “ब्राह्मण” याचा उल्लेख ब्राह्मणोत्तच्म् । किंवा इतिब्राह्मणम् । या वाक्यानें करितात. ( वै. सू. ७.२५ व कौ. सू. ६.२२; ८०.२.). (४) मन्त्रोक्त हा शब्द दोन्ही सूत्रांत पुष्कळ वेळां आढळतो (वै. सू. १. १४; कौ. सू. २१. ११). (५) सरुपवत्सा । हा शब्द कौशिक व वै. सू. यांत आढळतो. (६) शान्त्युदक हा शब्द वैतान सूत्रांत एकदांच आढळतो पण कौशिक सूत्रांत तो अनेकदां आढळतो ( वै. सू. ५. १० कौ. सू. अध्याय ९ ).
वैतान सूत्रांत सांगितलेले ॠषि किंवा गुरु कौशिक सूत्रांत आढळतात. दोन्ही सूत्रांत जेथें अगदी एक स्वरूपाचीं सूत्रें आढळतात अशींहि कांहीं उदाहरणें आहेत. उदा. वै. १.१-५. कौ. ६४. ३; ९४. ३; वै. २. २. कौ. २. ६; वै. ३. २०. कौ. ६. २३; वै. ७. २०, कौ. ६. २०; वै. १२. ७. कौ. ५७. ५; वै. ३४. १२. कौ. १६. ७; वै. ४३. ७; कौ. ४. १८.
दोन्ही सूत्रांत वरील प्रकारचें साम्य आढळतें. तेव्हां कौशिक सूत्रांतून वैतान सूत्रांत साम्यदर्शक सर्वच उतारे घेतला आहेत अशी कल्पना करणें बरोबर होणार नाहीं. अथर्वणांतच आढळणारा असा अथर्वणांचा जो विशिष्ठ मजकूर असेल तो कदाचित अथर्ववेदानुयायांपुरताच कांहीं कालपर्यंत मर्यादित असेल; म्हणजे धर्मविषयक ग्रन्थ लिहिणार्यांच्या उपयोगीं तो सर्वांस सारखाच पडावा; व यामुळें वैतान सूत्रांत कौशिकांतून किती भाग घेतला हें नक्की सांगतां येत नाही. वैतान सूत्र व गोपथ ब्राह्मण यांतील कांहीं उतारे अगदी तंतोतंत जुळतात; पण तेवढयावरून गोपथ ब्राह्मण वैतान सूत्रापूर्वी रचलें गेलें किंवा काय हें अजमावतां येत नाहीं. उदा. वै. सू. २. १५= गो. ब्रा. १. ५. २१; वै. सू. ३. १०= गो. ब्रा. २. १. २.
तथापि वैतान व कौशिकसूत्रें यांतील एकाच विषयासंबंधीं विवेचनाकडे पाहिल्यास असें आढळून येते कीं, कौशिकसूत्रांत कोणत्याहि गोष्टीविषयीं येणारें विवेचन पूर्ण असतें व वैतानांत तीच गोष्ट किंवा त्यांची मालिका ह्याविषयीं विवेचन संक्षिप्त दिलेलें असतें; एखाद्या गोष्टीच्या समुदायाची हकीकत संक्षिप्त व तांत्रिक दिलेली असते. हा प्रकार इतक्या स्पष्टपणे द्दष्टीस पडतो कीं लहानशा वैतानसूत्रांतील मजकुरांवरून असें असण्याचें कारण काय ह्याचा उलगडा होत नाहीं. वैतानांत मधून मधून ॠषींचीं नांवें दिलीं आहेत. उदाहरणार्थ कौशिक, युवन कौशिक, भागली, माठर, शौनक. परंतु कौशिकसूत्रात हीं नावें आलीं असून अधिक विस्तृत यादी दिली आहे; कौशिकसूत्रांत आणखी आढळणारीं नांवें पुढें दिली आहेत: - र्ग्य, पार्थश्रवस्, कांकायन, परिबभ्रव, जातिकायन, कौरुपथि, इषुफालि व देवदर्श.
कौशिकसूत्राच्या ७ व्या व ८ व्या अध्यायांत परिभाषासूत्रें आहेत; पहिल्या ६ अध्यायांत दर्शपूर्णमास विधीचें वर्णन
आहे; पण हे अध्याय मागाहूनचे आहेत हें सिद्ध करितां येतें.
परिभाषासूत्रें वैतानांत लागू पडत नाहींत तथापि वैतानसूत्र १०.२.३ यांत कौशिकसूत्र ८-१२ व ८-१३ ह्यांचा उपयोग केला आहे.
वैतानसूत्र कौशिकसूत्रावर अवलंबून आहे हें दर्शविण्यास वर दिला आहे त्याहूनहि जास्त बळकट पुरावा दाखवितां येईल. कौशिकसूत्रांत विस्तृतपणें वर्णिलेल्या विधींचा किंवा संस्कारांचा उल्लेख वैतानसूत्रांत आढळतो; पण वैतानांत संपूर्ण वर्णन न देतां त्या संस्काराच्या प्रारंभींच्या व शेवटच्या कार्यांचा उल्लेख दिलेला असतो; उदाहरणार्थ, वै. सू. १. १९ व कौ. सू. ३. ४. वै. सू. ११. १४ व कौ. सू. २४. २६-३१. वै.सू. २४. ३. व कौ. सू. ७. १४; १४०. १७. वै. सू. २४. ७ व कौ. सू. ६. ११-१३.
वरील पुरावा जरी भक्कम आहे तथापि वरील सारख्या बाबतींत वैतानानें कौशिकांतून उतारे उसने घेतले ही गोष्ट कायमची सिद्ध झाली असे याकोबी साहेबाप्रमाणेंच आम्हांसहि वाटत नाहीं. अथर्ववेदानुयायांत जे धर्मविधि किंवा संस्कार प्रचारांत होते ते कौशिक सूत्रें व वैतानसूत्रें या दोन ग्रंथांत स्वतंत्रपणें दिले असणें संभावनीय आहे; लेखनाच्या पद्धतीतील फरकामुळें व लेखनाच्या धाटणींतील फरकामुळें कौशिकसूत्रांत संस्कारांचें पूर्ण वर्णन आलें आहे व वैतानांत फक्त त्यांची रुपरेखा दिलेली आहे; यापेक्षां जास्त कांहीं म्हणतां येत नाहीं. वैतानांत संस्कारासंबंधीं जी अर्धवट हकीकत देण्यांत आली आहे, ती पूर्ण करावयाची असल्यास कौशिकसूत्रांच्या मदतीनें तें कार्य होण्यासारखें आहे असें वैतानसूत्रांत कोठेंहि सांगितलेलें नाहीं. असें जरी आहे तथापि हा पुरावा अगदीच पोचट आहे; व म्हणून वैतानसूत्र ५.१० हाच पुरावा आपण पत्करूं. घार्बेसाहेबांना ५.१० चें भाषांतर करितां येईना; अशी त्यांनीं कबुली दिली आहे; याचें कारण असें दिसतें कीं, चित्यादिभिराथर्वणीभि: । हे शब्द सूत्रदर्शक आहेत अशी गार्बेसाहेबांची चुकीची समजूत झाली आहे. परिभाषासूत्र कौशिक ८.१६ च्या आधारें वै. सू. ५.१० याचें उत्तम रीतीनें स्पष्टीकरण करितां येतें. वैतानसूत्र ५.१० यांत शान्त्युदक बनविण्याकरितां उपयोगांत आणल्या जाणार्या पवित्र वस्तूंची (विशेषेंकरून या वस्तु वनस्पतीच आहेत) यादी दिलेली आहे. वै. सू. त यांना आथर्वण म्हटलें आहे व त्यानंतर दुसरी जी यादी दिली आहे तिला आड्गिरस म्हटलें आहे. कौशिकसूत्रांत ही दुसरी याद दिलेली नाहीं. शिकसूत्रांत
पहिली यादी पूर्ण दिली असल्यामुळे वैतानसूत्रांत ती त्रोटकरुपानें दिली आहे; व कौशिकांत दुसरी यादी दिलेली नाहीं म्हणून वैतानांत दुसरी यादी संपूर्ण दिलेली आढळते व ह्याच एका गोष्टीवरुन असें म्हणतां येईल कीं वैतानसूत्र कौशिक-सूत्रावर स्पष्टपणें अवलंबून आहे; व कौशिकसूत्रानंतर तें रचलें गेलें. हीच गोष्ट आणखी एका रीतीने पारिभाषिक शब्दांसंबंधी पुराव्यानें सिद्ध होते. दोन्ही सूत्रांत त्या त्या सूत्रांतील एखाद्या सूत्राचें अवतरण घेतांना त्या सूत्रांचीं प्रतीकें दिलेलीं
आढळतात हीं नेहमींचीच पद्धत आहे.
कौशिकसूत्रांत तर चालू पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ती पद्धत अशी कीं, त्याच वेदांतील दुसर्या शाखेंतील सूक्तें किंवा पाठ देतांना व इतर वेदांतील शाखेंतील सूक्तें किंवा पाठ देतांना तीं संपूर्ण द्यावयाचीं. वैतान सूत्रांतहि ह्याच रीतीचा अवलंब केलेला आहे; पण याला विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखा एक अपवाद आहे; तो असा :-
जें सूक्त किंवा जो पाठ कौशिकसूत्रांत व वैतानसूत्रांतहि आला असेल त्या सूक्तांचें किंवा पाठाचें अवतरण देतांना वैतानांत प्रतीकेंच फक्त दिलेलीं आहेत. हेंच सूक्त जरी इतर संहितेंत आढळत असलें किंवा अस्तित्वांत असणार्या कोण- त्याहि संहितेंत तें आढळत नसून फक्त कौशिक सूत्रांतच तें जरी आढळत असलें तथापि वैतान सूत्रांत ह्या गोष्टीला महत्त्व दिलेलें नाहीं. त्यांत फक्त प्रतीकेंच दिलीं आहेत. एक दोन उदाहरणें देऊन हें जास्त चांगले समजण्यासारखें आहे:-
(१) तैत्तिरीय संहिता ३. २. ४. ४ यांत जो पाठ आहे तो शुक्लयजुर्वेदांत श्रौतसूत्रांत, कात्या २. १. २२ व कौ. सू. ३. ५ यांत संपूर्ण दिला आहे; पण वै. सू. १.२० येथें त्या पाठाचें `अहे दैधिषव्य’ असें फक्त प्रतीकच दिलेलें आहे.
(२) कौ. सू. ६. ११ यांत एक मन्त्र आहे. दारिलानें याला कल्पजा असें नांव दिलें आहे. याकोबीसाहेबांना हा मन्त्र कोणत्याहि संहितेंत आढळला नाहीं.
वैतान सूत्र २४.७ येथें या मन्त्राचें `विमुच्चामि’ असे फक्त प्रतीकच दिलें आहे.
आतां ज्या सूत्रावर वैतान सूत्र अवलंबून आहे अशी कल्पना व्यक्त झाली आहे त्या कौशिक सूत्राकडे वळूं.
कौशिकसूत्र
कौ शि क सू त्रा ची र च ना :- विधीच्या विस्ताराच्या द्दष्टीनें कौशिक सूत्र बाकीच्या माहित असलेल्या सूत्रांपेक्षां निराळें आहे. हें सूत्र ज्या शाखेचें आहे त्या शाखेंतील लोकांच्या उपयोगाकरितां या सूत्रांत विधींचें विस्तारपूर्वक विवेचन आहे. हे कांहीं श्रौतसूत्र नव्हे. अथर्ववेदाच्या शौनक शाखेचें श्रौतसूत्र, वैतानसूत्र (वितान कल्प ) हें आहे, ही गोष्ट कौशिक सूत्र १-६ वैतानसूत्र १-४ यांतील दर्शपूर्णमासीय यागासंबंधी विवेचनाच्या तुलनेवरून तेव्हांच लक्षांत येण्यासारखी आहे. श्रौतविधींना उपयुक्त असलेली परिभाषा या सूत्रांत नाहीं. होतर्, अध्वर्यु आणि उद्गातर् हे शब्द पारिभाषिक अर्थानें सगळ्या कौशिकसूत्रग्रंथांत कोठेंहि आढळत नाहींत व श्रौताग्नीचा उपयोग केवळ क्वचित् व गौणत्वानें केला आहे. जसें:- २२,१४;६७,६;७०,९-१२;७१,१ – ६;७७,२३;८०, १८–२३;८१,३१-२;८८.२०;८९,१५, अग्निहोत्राचा दोनदां उल्लेख केला आहे. ७२,४३;८०,२५.
हा ग्रंथ गृह्यसूत्र शब्दाच्या नेहमींच्या अर्थाच्या द्दष्टीनें, गृह्यसूत्रहि नव्हे. असल्या ग्रंथांत नेहेमी येणारे सर्व महत्त्वाचे विधि, म्हणजे गर्भाधानापासून विवाह धरून अंत्येष्टिपर्यंत सर्व संस्कार, तसेच मधुपर्क, आज्यतन्त्र इत्यादि, हे या ग्रंथात आले आहेत. परंतु यांना ग्रंथांत प्राधान्य दिलें नाहीं. ब्लूमफिल्डच्या मतें ग्रंथाच्या मुख्य भागांत, नंतर केव्हांतरी, गृह्य विषयांना कांहीं तरी गौणस्वरूप देऊन, ते ग्रंथांत बरोबर खपवून दिले असावेत. अथर्वांतील सूक्तें म्हणतांना त्याबरोबर जे विधि करावयाचे असतात त्याचें हें सूत्रमय वर्णन
होय. प्राचीन काळापासून सूत्राचा पाठ व कांहीं विधियुक्त आचार हीं एकदम करावयाचा परिपाठ आहे. याच आचारांचें सुधारलेलें स्वरूप सूत्रांत दिलें आहे. तथापि या ग्रंथाचें अथर्व सूत्र हें बीज असून दुसरे भाग मागाहून गोळा केले गेले, असें मानणें जरी यांतील विषयांचा अर्ध्याहून जास्त भाग गृह्य सूत्रांनीं व्यापला आहे, तरी बरेंच धाडसाचें होईल. तथापि तें कसेंहि असलें तरी कौशिक सूत्र हें अथर्व सूत्र व गृह्य सूत्र ह्या दोन स्वतंत्र सूत्रांचें मिश्रण आहे असें मानण्यास हरकत नाही. पुढें दिलेलें विवेचन ह्या दोन स्वतंत्र सूत्रांच्या मिश्रणाची गोष्ट लक्षांत घेऊन केलें आहे.
कौ शि क सू त्रा च्या र च ने चा का ल नि र्ण य.- या सूत्राच्या रचनेच्या कालस्थलाबद्दल सांप्रदायिक माहिती उपलब्ध नाहीं. अथर्वाच्या वाङ्मयांतच सापेक्षकालानुक्रमा-संबंधी दोन कालांचा उल्लेख आला आहे. प्रथमत:, मंत्रांचा किंवा सूक्तांचा काल संपून गेला होता. ग्रंथकार शौनक शाखेची संहिता गृहीत धरितों, हें पुढें पूर्णपणें सिद्ध केलें आहे. त्याचप्रमाणें त्याला काश्मीर शाखेपासून आलेल्या पुष्कळशा अथर्ववेदाच्या ज्ञानाची माहिती होती. या सूत्रांत शौनक इत्यादि अथर्ववेदाच्या चारी शाखांचे रूढ आचार दिले आहेत, हें केशव आणि अथर्वणीय पद्धतींचें म्हणणें खरें असेल तर या सूत्रात सांगितलेल्या आचारांना सूत्रांत गोंवावयाची स्थिति येण्याच्यावेळीं, सगळया नसल्या तरी बहुतेक शाखांच्या अथर्व संहिता मुख्यत्वेंकरून पुर्या झाल्या असाव्या असें आपणास म्हणतां येईल. दुसरी गोष्ट म्हणजे हें सूत्र वैतान सूत्र इत्यादींच्या पूर्वीचें असून त्यांनीं त्यांतील गोष्टी गृहीत धरल्या आहेत. वैतान हें अथर्ववेदी लोकांचें श्रौताचें छोटें पुस्तक असून तें अशा वेळीं रचिलें गेलें कीं, त्यावेळीं या वेदांच्या लोकांना आपला, सर्वमान्य वेदांच्या प्रान्तांत प्रवेश करून घ्यावयाचा होता म्हणून त्यांना वेदांतील यज्ञाची विवेचना करणारा त्यांचा असा स्वतंत्र ग्रंथ असणें जरूर होतें. कौशिक सूत्राचें संस्करण व वैतान सूत्राचें संस्करण यामध्यें किती काळ लोटला हे सांगणें अशक्य आहे. अथर्ववेदांतील सांप्रदायिक आचारांची व्यवस्थित व सूत्ररूपांत घालण्याची खटपट म्हणजेच जें कौशिक सूत्र तें बर्याच नंतरच्या काळात झालें असलें पाहिजे, असे ब्लूमफील्डचें म्हणणें आहे. यावरून त्यांत सांगितलेले आचारहि अर्वाचीन आहेत अशी कोणी चुकीची कल्पना करून घेऊं नये. या वेदांतील विधींचें स्वरूपच असें दिसतें कीं, मंत्रांचें पठण व कृति हीं एकदम व्हावींत. अथर्ववेदांत अशीं पुष्कळ सूक्तें आहेत कीं, त्यांत सांगितलेल्या पदार्थांचें इकडे तिकडे हलवणें वगैरे क्रिया केल्याशिवाय तीं म्हणतांच येत नाहींत.
कौशिक सूत्रांचें ग्रथन किंवा संस्करण एकदांच झालें असावें. म्हणजे आज जो ग्रंथ आपल्यापुढें आहे त्याचा मालमसाला एकावेळी प्रथम एकेठिकाणी जमा केला असावा; व नंतर त्याचा सर्वांगसिद्ध ग्रंथ बनविला असावा. अशाच तर्हेच्या धोरणाचा दुसरा ग्रंथ एकाकाळीं होता, म्हणजे ग्रंथाचें एक प्राचीन स्वरूप होतें, व शेवटल्या संस्करणांतून ग्रंथ बाहेर पडल्यावर अमुक अमुक भाग मागाहून घातले गेले, असें ब्लूमफील्ड मानीत नाहीं. परंतु, या सूत्रांत संगृहीत केलेला विषय, स्वतंत्र स्वरूपाच्या अशा निरनिराळया मूलस्थानापासून आला असला पाहिजे, व संस्करणकारानें कांहीं इतका बेमालूम मिलाफ केला नाहीं कीं, त्यांत निरनिराळया कालास्थलांचे व कर्त्यांचे परिणाम दिसू नयेत, ही गोष्ट स्पष्ट दिसते.
शकुनापशकुनाबद्दलचा तेरावा अध्याय हा एकदंर संहितेच्या विषयापेक्षां अगदींच निराळ्या विषयाचा असल्यामुळें, तो स्वतंत्र आहे असें तेव्हांच लक्षांत येतें. या अध्यायाचीं स्वत:ची सूक्तें आहेत व ही गोष्ट खालीं व्याख्या दिलेल्या अथर्ववेदाच्या दुसर्या भागांशीं विपरीत दिसते. प्रत्येक अपशकुनाचा परिणाम घालविण्याकरितां म्हणून त्यांच्या प्रतीकांनीं दर्शविलेले अथर्ववेदाचे मंत्र सामान्यत: अप्रधान म्हणून गणलेले दिसतात. या अध्यायाची भाषा इतकी पाल्हाळिक आहे कीं सूत्रग्रंथात ती बिलकूल शोभण्यासारखी नाहीं. गद्य परिशिष्टांच्या लिहिण्याच्या धाटणीच्या जवळ जवळ सारखींच यांतील भाषेची पद्धत आहे.
कपालेनांगारा भवंति –अंगारकल्प, १३५, १ किंवा चतस्त्रोधेन्वा उपक्लप्ता भवंति श्वेता कृष्णा रोहिणीसुरूपा चतुर्थी १२०, १; १२६, ५ अशातर्हेचीं वाक्यें अथर्वसूत्रांत सांपडणार नाहींत. ९७. ७ मध्यें `अपेत एतु निर्ॠतिर् इत्यतेन सूक्तेन,’ हें वाक्य व त्या पुढच्या वाक्यांत दिलेलें सकलपाठांतलें सूक्त, हें फार अघळपघळ दिलेलें असून सूत्राच्या भाषेला शोभण्यासारखें नाहीं. १०४, ३; ११३, ३; १२३, १; १३३, २ यांतील `एताभ्याम् सूक्ताभ्याम्’ १३३, १ मधील `एतै: त्रिभि: सूक्तै:’ १३६, ६ मधील इति एताभ्याम् ( ॠग्भ्याम् ); ११२, १ मधील `इति एताभि: चतसृभि: (ॠग्भि: ) यांबद्दल वरीलप्रमाणेंच म्हणतां येईल. भाषेचा अघळपघळपणा हा तेराव्या अध्यायांत विशेष द्दष्टोत्पत्तींस येतो. ९३ व्या कंडिकेमध्यें विषयांची निराळी अनुक्रमणिका देऊन या अद्भतविषयक अध्यायास सुरुवात केली आहे यावरून हा अध्याय स्वतंत्रपणें तयार झाला असावा असें सप्रमाण दिसतें. असें असल्यास कौशिक सूत्राच्या संस्करणकारांनीं हा अध्याय होता तसाच आपल्या ग्रंथात समाविष्ट करून घेतला असावा. प्रो. वेबरचें मतहि असेंच आहे.
हें मत चुकीचें असावें असें समजण्यास कांहीं कारण आहे असें ब्लूमफील्डलाहि वाटत नाहीं. कौशिकसूत्राच्या अंतभार्गात निरनिराळे थर आहेत व शिकसूत्राच्या संस्करणकारांनीं बेमालूम मिलाफ न केल्यामुळें निरनिराळ्या ग्रंथकारांचें निरनिराळे भाग द्दग्गोचर होतात तथापि निरनिराळया मूलस्थानांतून आलेल्या लिखाणांत व माहितींत पुष्कळ गोष्टी समान आहेत व सूत्रकारानेंहि कांहीं कांहीं स्थलीं आपल्याकडून होईल तितक्या उत्तम तर्हेनें ग्रंथांत घातलेल्या माहितीचा मिलाफ करण्याची खटपट केली आहे. अध्याय १३ मध्यें, चातनगण ( १६६, ९), मातृनामानि सूक्तानि ( ९४, १५; ९५१ ४; ९६, ३; १०१, ३; ११४, ३; १३६, ९; ) व वास्तोष्पतीयानि सूक्तानि ( १२०, ९) आलेलीं आहेत त्यांवरून असें सिद्ध होतें कीं, त्या अध्यायकर्त्यांला बाकीच्या ग्रंथाची, निदान त्या शाखेच्या पारिभाषिक शब्दांची माहिती होती. ११८, १ मध्ये शौनक संहितेंतून आलेला एक मंत्र-संग्रह, त्याच्या प्रतीकासह दिलेला आहे; तेराव्या अध्यायाच्या पूर्वी म्हणजे सकलपाठ ९१-१ मध्यें पूर्वीं याचें अवतरण घेतलें असें म्हणून याबद्दल उलगडा करितां येईल. अशा तर्हेचें दुसरें उदाहरण म्हणजे `भवन्तम् न: समनसौ समोकसौ’ हें १३३, ७ मध्यें आलेलें प्रतीक सकलपाठ १०८, २ च्या आधारावर घेतलें आहे, किंवा ६८, ३५ मधील `इदावत्सराय’ हें प्रतीक सकल पाठ ४२, १७ च्या आधारावर आहे. या ग्रंथांत हेंच एक उदाहरण दिसतें कीं जेथे संस्करणकारानें सर्व माहितीच्या व ज्ञानाच्या मालमसाल्याचें उत्तम मिश्रण तयार केलें आहे. शेवटल्या संस्करणाचे वेळीं, सकलपाठ ४२, १६ मधील
`व्रतानिव्रतपतये’ हा मंत्र सोडून देऊन सूत्रपद्धतीचा उपयोग करण्यांत सूत्रकार चुकला आहे. पण प्रतीक पूर्वीच ६, १९ मध्ये येऊन गेलें आहे. सूत्र ग्रंथांत पूर्वापर संबंध बरोबर रहावा म्हणून याच्या विरुद्ध क्रम आला असता. १३७, ३० मध्यें पुढें येणार्या तीन श्लोकांचीं प्रतीकें दिली आहेत व हें सफाईदारपणें रचना न झाल्याचें आणखी उदाहरण आहे. २, ४१ मध्यें यांतील पहिल्याचें प्रतीक `इतितिसृभि:’असें म्हणून अगदीं तशाच तर्हेनें दिलें आहे.
एका काळी बहुतकरुन अद्भतविषयक ( शकुन अपशकुन विषयक ) ग्रंथ अथर्ववेदाच्या विषयाच्या प्रान्तांत कोठेंतरी स्वतंत्रपणें असावा व अशा संग्रहांत घालण्यास त्यांतील विषय योग्य असल्यामुळें तो अंतर्भूत केला असावा. त्याचप्रमाणें पारस्कर गृह्यसूत्रांमध्यें अद्भुतासंबंधीं तीन अध्यायांचा अंतर्भाव केला होता. पण प्रो. स्टेन्झ्लर या संपादकानें उगीच ते अध्याय गाळून टाकले. एकंदर ग्रंथांत हा तेरावा अध्याय समाविष्ट करण्याचें काम जरी बर्याच चांगल्या तर्हेनें केलें गेलें आहे तथापि तो अध्याय निराळा ग्रंथ असावा याबद्दलच्या खुणा लुप्त झाल्या नाहींत.
वरवर अवलोकन करतांना जरी स्पष्ट दिसत नाहीं, तथापि हें फार संभवनीय दिसतें कीं, अध्याय १४ वा हाहि कौशिकसूत्रामधील नंतरचा थर असावा, किंवा निदान मुख्य ग्रंथ पुरा झाल्यावर या ग्रंथांत सांपडणारे, यांतील विषयांशीं विजातीय असलेल्या विषयावरील पांच अध्याय पहिल्या संस्करणकारांनीं स्वत: घातले असावेत. प्रथमत: बाराव्या व चवदाव्या अध्यायांच्यामध्यें तेरावा अध्याय घालण्याचें कांहीं संभवनीय कारण दिसत नाहीं. जर तेरावा अध्याय एक तर्हेच्या परिशिष्टासारखा आहे तर चौदावा अध्याय तेरावा घातला त्यावेळी किंवा पुष्कळ मागाहूनहि घातलेला असला पाहिजे. या अध्यायांतील अंतस्थ पुराव्यावरून वरील गोष्टीस पुष्टि मिळते. कंडिका १४१ मध्यें वेदपठणाचे नियम अगदीं अपभ्रष्ट स्वरूपांत दिले आहेत व त्यांतील मधल्या मधल्या भागांत गद्य व पद्य यांचें मिश्रण आहे. तें नंतरच्या स्मृतीसारख्या स्वरूपाचें आहे हें वाचकांचे लक्ष्यांत आल्याशिवाय रहात नाहीं. ग्रंथांत ही कंडिका लण्याची इच्छा संस्करणकाराच्या मनांत मागाहून आलेली दिसते. कारण १३९ व्या कंडिकेमध्यें वेदपठणाला विद्यार्थ्यांनीं कशी सुरुवात करावी याबद्दल चांगल्या सूत्रभाषेंत विवेचन केलें आहे व या दोन भागांच्या मध्यें इंद्रमहोत्सव नांवाचें राजकर्मं याचें विवेचन घुसडून देणें अगदी निरर्थक आहे. कंडिका १३९ ची भाषा जरी सामान्यत: बाकीच्या ग्रंथांतील गृह्याविधीवर्णनाच्या भाषेपेक्षां निराळी नाहीं, तथापि तींत आलेल्या विषयाचें विवेचन पूर्वी ५६।८ मध्यें आल्यामुळें, या कंडिकेबद्दल संशय येतो. ५६,८ मध्यें विद्यार्थ्यांस सावित्रीचें पठण करण्यास सांगितलें आहे पण १३९,१० मध्यें सावित्री व त्याबरोबर आणखी दोन अथर्वण मंत्र ४,१,१ व १.१. यांचें पठण सांगितलेंआहे. दोन मंत्र जास्त सांगावयाची कल्पना मागाहून सुचलेली असून ती अगदी परिशिष्टाच्या स्वरूपांत आलेली आहे व तिचें कारण म्हणजे कोणती तरी युक्ति करून या वेदाला बाकीच्या वेदांच्या पंक्तीला बसवून, धर्मग्रंथांत याचें स्थान महत्त्वाचें व अभेद्य करावयाचें होतें. १३९, १० मध्यें आलेल्या `त्रिषप्तीय’ शब्दांवरून ही कंडिका मुख्यग्रंथाच्या अंतर्भागांतील नाहीं अशाबद्दल पारिभाषिक पुरावा मिळतो. कौशिक ७, ८ हें एक परिभाषा सूक्त आहे. त्यांत सांगितलें आहे कीं, ग्रंथाच्या पुढच्या भागांत `पूर्वम्' म्हणजे ( सूक्तम् ) हा शब्द षप्तीयसूक्ताबद्दल सुटसुटीत म्हणून वापरला आहे. जेथें जेथें या सूक्ताचा उल्लेख आहे तेथें तेथें सर्व ग्रंथभर ही परिभाषा बिनचूकपणें वापरली आहे. पहा; १०,१;११, १;१२,१०; १४,१;१६,५;१८,१;१९;३२,२८ हा अधिकार येथें लागू पडत नाहीं. एवढ्यावरून निदान इतकें म्हणतां येईल कीं, बाकीच्या ग्रंथाशीं या अध्यायाचा मिलाफ बरोबर झालेला नाहीं व यावरून आणि मागें दिलेल्या बाकीच्या पुराव्यावरून हा अध्याय नंतरचा आहे हें पुष्कळ सबळपणें सिद्ध होतें.
हीच स्थिति कंडिका १३८ ची आहे. यांत्र अष्टका विधीचें लांबच लांब वर्णन आहे. पण ह्याच विधीचें वर्णन पूर्वी १९,२८ मध्यें चांगल्या सूत्रभाषेंत आलेलें आहे. केशवाच्या लक्षांत, हीं दोन्हीं वर्णनें तत्त्वत: एकाच विधीचीं आहेत, ही गोष्ट आलेली आहे व त्यानें दोहोंचें विवेचन एके ठिकाणीं कंडिका १९ मध्यें केलें आहे. कंडिका १३८ मागून घातलेलीं आहे याबद्दल शंका येण्याचें, कांहीं करण नाहीं. कंडिका १४० चा विषय इंद्रमहोत्सव आहे व त्यांतील भाषापद्धतीचा विचार करितां वरीलच सिद्धातांस पुष्टि मिळते. हें एकंदरीनें परिशिष्ट असून, थोडया विस्तारानें अथर्व परिशिष्टांत १९ वें म्हणून आलेलें आहे ह्यावरून निदान इतकें सिद्ध होतें कीं, यांतील भाषेंत व शब्दरचनेंत या संग्रहास न शोभणारें असें काहीं नव्हतें. कण्डिका १३७ मधील आज्यतंत्र हें दर्शपूर्णमासविधीच्या एका भागाचें विस्तृत वर्णन असून, त्यामध्यें वेदी करण्याचे नियम व लक्षण हे विषय मात्र जास्त घातले आहेत. ६, २९-३० मध्यें, इमौ दर्शपूर्णमासौ व्याख्यातौ । दर्शपूर्णमासाभ्याम् पाकयज्ञा: । असें लिहिलें आहे. या वरून १३७,४३ मधील `व्याख्यातं सर्व यज्ञियं तन्त्रम्’ याची जरूरी नाहीं. केवळ सूत्रभाषेच्या द्दष्टीनें पाहता कण्डिका १३७, ही कण्डिका १-६ च्या नंतरची आहे हें १३७, ३० ची २,४१ मधील `अग्निर्भूम्याम् इति
तिसृभि:’याच्याशीं तुलना केली असतांना लक्षांत येईल. १३७, ३० मध्यें तीन्ही ॠचांचीं प्रतीकें अथपासून इतिपर्यंत दिलीं आहेत. दर्शपूर्णमासौ व आज्यतंत्र यांचें वर्णन देतांना पद्धतींत ( केशव, दशकर्माणि अथर्वणपद्धति आणि अन्त्येष्टि) निरनिराळया ठिकाणच्या उतार्याचीं एकमेकांत अगदीं निबिड गुंतागुंत केली आहे हें येथें नमूद करणें जरूर आहे.
यावरून १३ व १४ वा अध्याय हे या ग्रंथाचे नंतरचे थर दिसतात.
पहिल्या अध्यायाच्या पहिल्या सहा कंडिकांची गोष्ट अगदीं निराळी आहे. १-८ पर्यंत कांहीं अगदीं सामान्य परिभाषा सूत्रें दिल्यावर, या परिभाषांत या ग्रंथाचे मूल आधार दिले आहेत, ९-२१ पर्यंत विशेष परिभाषा आहेत. यामध्यें देव व पितर यांच्या पूजांमधील भेद दिलेला आहे, व ही सूत्रग्रंथांची पद्धति आहे. पहिल्या सहा कंडिकांमध्यें केवळ दर्शपूर्णमासविधींचेंच वर्णन आहे. परंतु ९-२१ या परिभाषांचें धोरण पहिल्या सहा कंडिकापेक्षां जास्त विस्तृत स्वरुपाचें असलें पाहिजे कारण त्यामध्यें पितरांच्या कसल्याहि पूजेचा उल्लेख आलेला नाहीं, ह्या परिभाषांचा संबंध ग्रंथाच्या नंतरच्या भागांना उद्देशून असण्याचा संभव आहे व वस्तुस्थितिहि नि:संशय अशीच आहे. विशेषत: अध्याय ११ पहा.
परंतु असें मानण्यास एक अडचण आहे. ती अशी कीं, दर्शपूर्णमासानंतर लागलीच विशेष विस्तृत धोरणाच्या परिभाषा असलेल्या तीन कंडिका आलेल्या आहेत. ह्या त्याच हेतूनें तेथें घातल्या आहेत व पहिल्या कंडिकेंतील ९-२१ या अधिकारांचा उपयोग पुष्कळ अध्याय जाईंपर्यंत आलेला नाहीं. पहिल्या सहा कंडिका आज जेथें आहेत तेथें त्या प्रथम नव्हत्या आणि यजु:संहितेच्या श्रौतसूत्राच्या ग्रंथाचा आरंभ दर्शपूर्णमास देऊन करावयाचा, या नेहमींच्या रीतीस मान देऊन त्या तेथें घातल्या असाव्यात, असें ब्लूमफील्डचें मत आहे. या मतास पुष्टि देण्यास काही पारिभाषिक पुरावा नाहीं असें नाहीं. व्रतानिव्रतपतये’ ह्या ॠचेचें प्रतीक ६, १८ दिलें आहे व ती ॠचा सकल पाठ ४२,१६ मध्यें येते. यावरून असें दिसतें कीं, कौशिक व वैतानसूत्राच्या नेहेमींच्या रितीप्रमाणें ४२,१६ नंतर ६,१८ आलें पाहिजे. परंतु हेंहि सांगितलें पाहिजे कीं, अशाच तर्हेचे दुसरें एक उदाहरण आहे पण त्याचा अशा तर्हेनें अर्थ लावितां येत नाही. कौशि०`अच्युता द्यौरिति’ याचें प्रतीक ३५,१२ मध्यें आहे व सकल पाठ, ९८,२ मध्यें आहे. वस्तुत: तेराव्या अध्यायाच्या मंत्रांचा उपयोग केव्हां केव्हां ते एक स्वतंत्र संहिताच असावेत अशा तर्हेनें केला गेला आहे; जसें गणमाला, अथर्वपरिशिष्ट ३४,२९ मध्यें, कौशिकसूत्र १०४,२ हा मंत्र `या असूरा’(!) या त्याच्या प्रतीकानें, दुसर्या अथर्व ॠचांच्या प्रतीकांबरोबर दिला आहे. `प्रयच परशुं इति दर्भाहाराय दात्रम् प्रयच्छति’(५-२४) च्या नंतर ८,११ मध्यें थोडया निराळया भाषें अशाच अर्थांचें परिभाषासूत्र आलेलें आहे. यावरून निदान इतकें सिद्ध होते कीं, १-६ अध्याय हें पुढें येणार्या अध्यायांच्या धोरणानें व त्यांच्याशीं जुळून रचले गेले नाहींत. हे अध्याय दुसर्या एखाद्या ग्रंथांतील होते. किंवा याच ग्रंथाचा निराळा पाठ असून नंतरच्या काळीं कोणी निराळ्या ग्रंथकारानें ते रचिले हें ठरविणें बरेंच कठिण आहे. कंडिका ५२ व ५३ नंतर लागलीच, मुख्य अथर्वसूत्रें झाल्यानंतर व गृह्याच्या अध्यायापूर्वीं त्याचें योग्य स्थान होतें. एकंदरीत ह्या भागाच्या विशेष गोष्टी तेवढया देऊन, कांहीं सिद्धांत न काढणेंच बरें.
कौ शि क सू त्र अ थ र्व सू त्र व गृ ह्य सू त्रां चा सं बं ध.- वर नामनिर्देश केल्याप्रमाणें, मुख्य अथर्व सूत्रांना आरंभ ७ व्या कंडिकेपासून होतो, व तीं ५३ व्या कंडिकेपर्यंत आहेत. मात्र मध्यें ४२, ५ पासून ४५ च्या अखेरीपर्यंत दुसरा विषय असून हीं सूत्रें गृह्य सूत्राच्या तर्हेच्या भाषेंत आहेत. ग्रंथाच्या या भागांत म्हणजे अथर्व सूत्रांत मात्र अथर्व वेदाच्या कालांतील आयुष्यक्रमाच्या स्पष्ट दिसणार्या विशिष्ट गोष्टी आल्या आहेत. बाराव्या अध्यायाच्या अखेरीपर्यंतच्या उरलेल्या कंडिकांमध्यें अथर्व मंत्रांच्या आधारावर, अथर्वण वेदाच्या द्दष्टीनें
नेहमींच्या गृह्य आचारांचें वर्णन आलें आहे. अथर्व सूत्र हें अगदीं अल्पाक्षर, सूत्रमय भाषेंत लिहिलेलें असून त्यांतील आचार अगदीं जुने व स्वतंत्र आहेत. शब्दसंग्रह व शब्द-समृद्धीच्या द्दष्टीनें यांतील भाषा लक्षांत ठेवण्यासारखी आहे अथर्व संहितेच्या अर्थज्ञानाकरितां, तिची किंमत फार वरच्या दर्जाची आहे. बाकीच्या ग्रंथांपेक्षां यांत एक विशेष आहे तो हा कीं, अथर्वसंहितेच्या बाहेरच्या मंत्रांचें अवतरण यांत अगदींच क्वचित् आलेलें आहे. अथर्वसूत्राच्या भाषेपेक्षां गृह्यसूत्रांची भाषा पुष्कळ अघळपघळ आहे व या दोन भागांतील भेद दाखविणारे पुष्कळ पारिभाषिक मुद्देहि आहेत. दोन्हीहि वाचल्यानंतर वाचकांचें असें मत होतें कीं, शेवटल्या संस्करणाच्यावेळीं, जें संस्करण आज आपणांपुढें आहे त्यांत एका सामान्य गृह्यसूत्रांत अथर्वसूत्र मिसळलें गेलें असावें.
ह्या गृह्यसूत्रांतील एकदम लक्षांत येण्याजोगी विशेष गोष्ट म्हटली म्हणजे अथर्ववेदांत न आलेले व म्हणून सकलपाठांत दिलेले मंत्र फार वेळां आलेले आहेत ही होय. पुष्कळदां एकाच मंत्राचें प्रतीक व सकलपाठ एकदम येतात. ६.२ मध्यें प्रतीक, सकलपाठानंतर आलें आहे; ४२. १५, १७; ६२. २०, २१; ६८. ९, १०; ६८. २५, २६; ७२. १३, १४; ९०. २५; ९१. १; इत्यादि यांमध्ये प्रतीक सकलपाठापूर्वीं आलेलें आहे. केव्हां केव्हां सकलपाठांतील मंत्र व अथर्वणांतील प्रतीकें येतात; जसें ६, २; ७१, ६; ७२, १३; ७८, १०; १३३, २. अथर्ववेदांतून न घेतलेला मंत्रविषयहि पुष्कळच आहे. गृह्यसूत्रांतील प्रतीकें देण्याच्या रीतीवरून त्यांतील लांबलचक भाषासरणी तेव्हांच लक्ष्यांत येते. ६४, २७ मध्यें `इति सूक्तेन’ असे शब्द आले आहेत; ५३, १३ मध्यें `इति अनेन सूक्तेन’ ५४, ५ मध्यें, `इति एतेन सूक्तेन,’ ६७, १५ मध्यें`इति एतै त्रिभि: सूक्तै:;’ ६५, ९ मध्यें `इति सूक्तेन’ यानें एका सूक्ताच्या भागाचाच उल्लेख केला आहे. ८१, २० मध्यें दोन प्रतीकांच्यापूर्वी `उभयो:’ हा शब्द उगीच आलेला आहे. अथर्व सूत्रामध्यें अशा तर्हेचे शब्द बिलकुल आलेलें नाहींत. नाहीं म्हणावयास तीन उदाहरणें आढळतात. ९, १; ३५,१२ मध्यें `इति एक’(ॠक)चा अर्थ असा कीं तेथील प्रकृत सूक्तांतील एकच ॠचा म्हणावयाची; आणि ९,२८ मधील `इतिससर्वेण सूक्तेन’ जास्त घातलेलें आहे असें दिसतें. यावरून भाषेची निराळी पद्धत द्दष्टोत्पत्तीस येते. परंतु यद्यपि असें म्हणतां येईल कीं, गृह्यसूत्रामध्यें मोठया सूत्रांचा उल्लेख आल्यामुळें त्यांतील विशिष्ठ ॠचेचा उल्लेख करण्यास विस्तारानें लिहिणें जरूर आहे, तथापि वर दर्शविलेल्या स्थलांतील पुष्कळ स्थलीं असल्या मोठया सूक्ताचा उल्लेख नाहीं ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे.
अथर्व सूत्रामध्यें आ+चम् धातूचें `आचमयति’असें रूप आले आहे व अन्य ठिकाणीं `आचामयति’ आलेलें आहे. तसेंच हू या धातूचें वर्तमान कालवाचक कृदन्ताचें पुल्लि० प्रथ० एक वचनाचें रूप अथर्वसूत्रांत `जुह्यत्’ आलें आहे व गृह्यसूत्रांत `जुह्यन्' आलें आहे. या व दुसर्या पुराव्यावरूनहि अथर्व सूत्रें व गृह्य सूत्रें यांतील भाषेंत फरक आहे हें लक्षांत येईल. गृह्यसूत्रांची भाषा अघळ पघळ व सरळ असून अथर्व सूत्रांची भाषा जास्त संक्षिप्त व पारिभाषिक स्वरूपाची आहे. अथर्व सूत्रांची भाषा व तेराव्या अध्यायाची भाषा यांच्या मधल्या तर्हेची भाषा गृह्यसूत्रांची आहे. तेराव्या अध्यायाची भाषा जवळ जवळ परिशिष्टाच्या भाषेसारखी आहे हें पूर्वीं सांगितलेंच आहे.
अथर्वसूत्रामध्यें अथर्व वेदाच्या १९ व्या कांडांतील बिलकुल अवतरण घेतलें नाहीं ही गोष्ट नमूद करून ठेवण्यासारखी आहे; कारण कौशिकसूत्राचा व थर्ववेदाच्या १९ व्या कांडाचा विशिष्ठ तर्हेचा संबंध आहे.
वरील विवेचनांतील सर्व मुद्दे अबाधित रहाणें शक्य नाहीं. तथापि पुढें दिलेल्या गोष्टी स्पष्ट होतील असें ब्लूमफील्डचें मत आहे. कौशिकाच्या नांवावरचें सूत्र नंतरच्या सूत्रकालांतले आहे; त्यामध्यें निरनिराळया तर्हेचे थर असून त्यांचा मिलाफ विशेष चतुराईनें केला गेला नाहीं; त्या प्रत्येक थराचें विशिष्ट स्वरूप निरनिराळया लेखकाचे निरनिराळे भाग या करणानें आलेलें असो किंवा निरनिराळया काळीं निरनिराळा भाग लिहिला गेला या कारणानें आलेलें असो, विषय, भाषापद्धति व परिभाषा या तीन्ही गोष्टींत फरक दिसून आल्यामुळें अथर्वसूत्रें व गृह्यसूत्रें यांत भेद आहे ही गोष्ट सिद्ध झाली आहे; तेरावा व चौदावा अध्याय हे बाकीच्या ग्रंथाच्या मागाहून रचले गेले असावेत व शेवटल्या संस्करणाच्या वेळीं ही गोष्ट लपवितां आली नाहीं; व पहिल्या अध्यायाच्या पहिल्या सहा कंडिका प्रथमत: या ग्रंथाच्या नंतरच्या थरांतील असाव्यात.
कौ शि क सू त्रा चा त्या च्या सं हि ते शीं सं बं ध.– अथर्ववेदाच्या नऊ शाखा, चरण किंवा भेद होते या अढळ सांप्रदायिक समजुतीचा, अथर्ववेदाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्याला प्रथम विचार करावा लागतो. या सांप्रदायिक समजुतीस मुख्य मूलभूत आधार चार आहेत:- (१) दोन चरणव्यूह: पहिला चरणव्यूह हा शुक्ल यजुर्वेदाचें पांचवें परिशिष्ट असून त्यांतील पहिल्या अध्यायांत अथर्व वेदाच्या शाखा दिल्या आहेत. दुसरा चरणव्यूह हा अथर्व वेदाचें ४९ वें परिशिष्ट असून त्यांत या विषयाचा थोडक्यांत विचार केला आहे. (२) पाणि- नीच्या अष्टाध्यायींत, महाभाष्यांत व पाणिनीला माहित असलेल्या दुसर्या वाङमयांत या शाखांचा प्रसंगोपात्त आलेला उल्लेख. (३) पुराणांतील अथर्व वेदाच्या शाखांसंबंधीं अगदीं नंतरचीं पण वाजवीपेक्षां जास्त व्यवस्थित वर्णनें व नंतरच्या वाङमयांतील उदाहरणार्थ रामकृष्णाचा संस्कारगणपति हा ग्रंथ, अशांतील वर्णनें व (४) अथर्ववेदाच्या वाङमयांत प्रसंगोपात्त जागोजागीं आलेले उल्लेख. अथर्ववेदाच्या शाखांचा विचार पुष्कळ वेळां झालेला आहे. [ पहा :- वेबर इंडिश स्टूडिएन १,१५२,२९६;३,२७७-२७८;१३,४३४-४३५; आोमिना पोरटेंटा, पान ४१२-४१३; इंडिश लिटरेटूरगेशिष्टे पान १७०. मॅक्स मुल्लर `प्राचीन संस्कृत वाङमय’, पान ३७१.’ गोपथ ब्राह्मणाची राजेंद्रलाल मित्राची प्रस्तावना, पान, ६; शब्दकल्पद्रुम; वेद; रोट, काश्मीरांतील अथर्ववेद पान २४; अ. ओ. सो. नि. का. पु० ११ पान ३७७-३७८; सायमन, बैट्रागत्सूर केन्टनिस डेर वेडिशेन् शूलेन. पान ३१ ].
वर दिलेल्या रोटच्या ग्रंथांत त्यानें शाखा विषयाच्या सांप्रदायिक कल्पनेचें फारच व्यवस्थेनें व चिकित्सक बुद्धीनें परीक्षण केलें आहे. त्यानें असा सिद्धांत केला आहे कीं, शाखांच्या या नऊ नांवापैकीं पांच खरीं व विश्वसनीय म्हणून धरावींत व बाकीचीं चार हीं अविश्वसनीय म्हणून सोडावींत. ब्लूमफील्डच्या मतें अथर्वणवेदाच्या वाङमयांत त्याच्या शाखांसंबंधीं जे जागोजाग उल्लेख आलेले आहेत त्यांनाच जास्त चिकटून राहिल्यास याविषयींच्या सांप्रदायिक कल्पनेंतील चुकांची दुरुस्ती होऊन अथर्ववेदी लोक स्वत: कोणकोणत्या नऊ निराळया शाखा मानीत होते हें लक्षांत येईल. ज्याप्रमाणें अथर्ववेदाच्या पांच कल्पांसंबंधीं वाङमयांत आलेल्या परस्परविरुद्ध हकीकती एकत्र करून त्यापासून एक टिकाऊ सिद्धांत निघतो ( पहा अ. ओ. सो. का. पु. ११ पान ३७९ ). त्याप्रमाणें येथेंहि
परस्परविरुद्ध हकीकतींतून एक तत्त्वाची गोष्ट बाहेर काढणें शक्य आहे. याविषयाच्या माहितीबद्दल वर दिलेल्या मूलाधारापैकीं चवथा म्हणजे प्रत्यक्ष अथर्वणवेदाचें वाङमय हा सर्वांत महत्त्वाचा आहे याबद्दल संशय असणें शक्य नाहीं.
धाकटया चरणव्यूहाच्या चार हस्तलिखित प्रती ब्लूमफील्ड यास मिळाल्या. त्यामध्यें या विषयासंबंधी उल्लेख :- तत्र ब्रह्मवेदस्य नव भेदा भवन्ति तद्यथा । पैप्पलादा: तौदा: मौदा: शौनकीया जाजला जलदा ब्रह्मवदा देवदर्शा: चारणवैद्याश्र्च ) तेव्हां ह्याच्या मतें हींच अथर्ववेदाच्या शाखांचीं नांवें होत व याबद्दलच्या भाराभर चुकीच्या हकीकती असण्याचीं कारणें म्हणजे हस्तलिखित प्रतींचें चुकीचें वाचन, नंतरच्या लेखकांनीं मुद्दाम वेडीवांकडीं बनविलेलीं या शाखांचीं नांवें व अखेरीस मागून घातलेले भाग हीं होत. असें ब्लुमफील्ड मानतो.
(१) पैप्पलाद, किंवा पैप्पलादक, पैप्पलादी, पिप्पल्लाद, पैप्पल, पिप्पल, पैप्पलायन. ह्या सगळ्या शाखांच्या नांवाचें मूळ पिप्पलादी या आचार्यांच्या नांवावरून बनलेलीं आहेत.
(२) तौद किंवा तौदायन याच नांवाचीं बदललेलीं रूपें, तौत, तौत्तायन, तौत्तायनीय अशीं व इतर पुष्कळ निराळीं आहेत.
(३) मौद पैप्पलार्द गुरुं कुर्यात् श्रीराष्ट्रारोग्यय्डर्धनम् । तथा- शौनकिनांचाऽपि देवमंत्रविपश्चितम् । पुरोधा जलदो यस्य मौदो-वास्यात्कथंचन । अब्दात् दशभ्यो मासेभ्यो राषट्रभ्रंशम् सगच्छति । असें अथर्वपरिशिष्ट २,४ मध्यें लिहिलें आहे. या शाखेचें `मौदायन' असेंहि पैप्पलादायन, तौदायन, जलदायनाप्रमाणें नांव आहे.
(४) शौनकीय किंवा शौनकिन्. वैतानसूत्र ४३, २५ मध्यें ज्याला चेटकी विद्या जाणावयाची असेल त्यानें शौनक यज्ञ करावा म्हणून म्हटलें आहे. पाणिनीनें शौनक गणाबरोबर देवदर्शनीया: असें पद घातलें आहे.
(५) जाजल. महाभाष्यामध्यें जजलिनांवाच्या आचार्यांच्या नांवावरून ही शाखा दिली आहे. याबद्दल `जाबाल' अथर्व परिशिष्ट ४९ मध्यें आलें आहे. रोटचें मत असें आहे कीं या शाखेचा स्थापक कौशि० ९, १०; १७, २७; वैतान सू० १, ३; २२. १; २८, १२; मध्यें आलेला आचार्य भागली असावा. पण ब्लूमफील्ड म्हणतो कीं त्यास या मतांस पुष्टि देणारा पुरावा बिलकुल मिळाला नाहीं.
(६) जलद याचें जलदायन असेंहि रूप येतें. रा. शंकर पांडुरंग पंडित यांच्या म्हणण्याप्रमाणें कौशिक सूत्र ज्या शाखांचें आहे त्यांपैकीं जलद ही एक आहे.
(७) ब्रह्मवद. चरणक्यूहाबाहेर कोणत्याहि अथर्वण ग्रंथांत हें शाखेचें नांव म्हणून आढळलें नाहीं. याच नांवाची ब्रह्मवल, ब्रह्मवल, ब्रह्मदाबल, ब्रह्मपलाश व याहूनहि अपभ्रष्टरूपें गौण ग्रंथांत येतात.
(८) देवदर्श किंवा देवदर्शिन्, याची दिवदर्श, देवर्षि, वेद-दर्श इत्यादि दुसरी बदललेलीं रूपें येतात.
(९) चारण वैद्य (विद्या) हें नांव केशवाच्या कौशिक सूत्र ६, ३७ मध्यें आढळतें.
ब्लूमफील्डच्या मतें येथवर दिलेले अथर्वणवेदाच्या सांप्रदायिक शाखांचें वर्णन, निश्चित स्वरूपाचें आहे असें मानण्यास हरकत नाहीं. अनेक शाखांपैकीं शाखांचीं हींच नावें कां पसंत केलीं व भार्गवासारखीं चारण वैद्य, मौद, जलद यांच्या बरोबरच सांगितलेलीं कां गाळलीं ह्याबद्दल तर्क करणें सोपें नाहीं. तसेंच शांतिकल्पासारख्या य:कश्चित् परिशिष्टाला, त्याच्यापेक्षां योग्यतेनें वीस किंवा त्याहून अधिक परिशिष्टें जास्त चांगलीं असतांना, अथर्वण सूत्राच्या बरोबरीला पांच कल्पांत कां बसविलें ह्याबद्दलहि तर्क करणें सोपें नाहीं. आपणांस असें गृहीत धरितां येईल कीं, निरनिराळ्या तर्हेनें महत्त्वाच्या व पद्धतीच्या ग्रंथांचीं नांवें अगदी वरवर दिसणार्या कारणांकरितां एके ठिकाणीं आणिलीं गेलीं. कौशिक सूत्र चारशाखांचा संहिताविधि: आहे, हें वर सांगितलें आहे, या गोष्टीवरून या शाखाभेदाप्रमाणें संहितांतहि भेद आहे किंवा निदान एकाच संहितेच्या सूत्रांत तरी भेद असावा ही गोष्ट शक्य नाहीं हें सिद्ध होतें.
प्राचीन प्रत व काश्मीर प्रत यांच्याशिवाय दुसर्या संहिता शाखा असल्याचें आजतागाईत ऐकिवांत नाहीं. प्रो. रोटनें आपल्या अथर्ववेदाच्या पुस्तकांत काश्मीर प्रत पैप्पलाद आहे म्हणून सांगितलें आहे परंतु यास सर्व ठिकाणच्या पंडितांचें अनुमत नाहीं. ब्लूमफील्ड म्हणतो कीं या सिद्धांताबद्दल संशय घेण्यास कांहीं कारण दिसत नाही. पैप्पलाद हें नांव केव्हां केव्हां अथर्ववेदीय ग्रंथांना उगीच दिलेलें असतें व त्या ग्रंथांचा अर्थाअर्थी या शाखेशीं मुळींच संबंध नसतो पण ही स्थिति दुसर्या वेदांच्या ग्रंथांसंबधानेंहि अशीच असल्यामुळें त्याबद्दल विशेष स्पष्टीकरण करण्याचें कारण नाहीं. प्राचीन प्रत शौनक शाखेची आहे ही कल्पना जास्त निश्चित झाली आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. अथर्व पद्धतीमध्यें वैतानसूत्र शौनकसूत्र म्हणून दिलेलें आहे व ह्या अथर्व पद्धतीच्या विधानाबद्दल संशय मानण्याचें कारण नाहीं. शौनकसूत्र अथर्वसूत्रावर अवलंबून आहे हे तितकेंच निश्चित आहे. म्हणजे कौशिक हे शौनकिनांचे सूत्र आहे. कौशिक हें `चतसृषु शाखासु शौनका-दिषु संहिताविधि:’आहे या केशवकृत अथर्वणपद्धति व सायण यांच्या विधानावरून स्वतंत्रपणें वरीलच मुद्दा सिद्ध होतो. कौशिक ८५, ७, ८ मध्यें देवदर्शिन् व शौनकिन् यांच्यामधील मतभेद दाखविला आहे, त्यांत कौशिकानें शौनकिनचा पक्ष घेतला आहे. त्यावरूनहि वरीलच मुद्दा सिद्ध होतो ( अ. ओ.सो. नि. का. पु. ११, पान ३७७ ). कौशिक व वैतान हीं दोन्हीं सूत्रें शौनकीय आहेत याबद्दल संशय घेण्यास जागा नाहीं. हीं दोन्ही सूत्रें प्राचीन प्रतीच्या आधारावर रचिलीं आहेत म्हणजे प्राचीन प्रतहि याच्याच म्हणजे शौनकीय शाखेची आहे याबद्दल पुरावा भरभक्कम आहे.
अथर्वण वेदाच्या वाङमयांत नेहमीं येणारी एक सांप्रदायिक कल्पना अशी आहे कीं, प्राचीन प्रतींत १, १, १, मध्यें दिलेल्या `येत्रिषप्ता’च्या ऐवजीं अथर्वण संहितेचा आरंभ `शंनो दवीरभिष्टये’या मंत्राने झालेला आहे. `शंनो देवीरभिष्टय इति एवमादि कृत्वाऽथर्वणवेद अधीयेत’ असें गोपथ ब्रा० १, २९ मध्यें ह्मटलें आहे. ब्रह्मयज्ञामध्यें वेदाच्या आरंभींचे मंत्र दिले आहेत, त्यांत अथर्वण वेदाचा आरंभ `शंनोदेवीरभिष्टये’ या मंत्रानें दिला आहे. डॉ. हौगच्या म्हणण्याप्रमाणें कांहीं प्राचीन प्रतीच्या हस्तलिखितांत अथर्ववेदाचा आरंभ, `शंनोदेवीरभिष्टये’ या मंत्रानें झाला आहे. डॉ. हौग व भांडारकर यांच्या म्हणण्याप्रमाणें अथर्ववेदानुयायी प्रत्येक माणसानें आपलें तोंड धुतांना `ये त्रिषप्ता:’व `शंनोदवीरभिष्टये’हे मंत्र म्हटले पाहिजेत. महाभाष्याच्या प्रस्तावनेंत `शंनोदवीरभिष्टये’हा मंत्र अथर्ववेदाच्या आरंभींचा म्हणून दिला आहे. पैप्पलाद संहितेमध्यें, जिची यूरोपांत उपलब्ध असलेली एकच प्त प्रो. रोटच्या ताब्यांत आहे, तिच्यांत पहिलें पान गहाळ झालें आहे परंतु या पंडिताचें असें मत आहें कीं, संहितेचा पहिला मंत्र वर सांगितलेलाच असावा, कारण तो मंत्र त्या प्रतींत अन्य ठिकाणीं कोठें आलेला नाहीं व प्राचीन प्रतीच्या आरंभाचा `ये त्रिषप्ता:’हा मंत्र दुसर्या अनुवाकाच्या आरंभीं दिला आहे. ही गोष्ट आतां जवळ जवळ निश्चित आहे असें मानावयास हरकत नाहीं, कारण अथर्व परिशिष्ट ३४,२० मधील पैप्पलादि शान्तिगणाचा आरंभ `शंनीदेवी’या प्रतीकानेंच केला आहे.
शौनक संहितेचा आरंभ `ये त्रिषप्ता:’या मंत्रानें होतो. हौगच्या मताप्रमाणें अथर्ववेदाचा आरंभ `शंनोदेवी’या मंत्रानें होऊन तो मंत्र पुन: त्याच्या योग्य जागीं १,६,१ मध्यें आला आहे व म्हणून त्या हस्तलिखितांत हा मंत्र वर सांगितलेल्या संप्रदायानुसार मागाहून घातलेला असावा. अथर्व परिशिष्ट ४४,६, `वेदव्रतस्यादेशेन’ विधीमध्यें असें विधान केलें आहे कीं, `ये त्रिषप्ता:’हा अथर्वण वेदाचा आरंभाचा मंत्र आहे. वैतान सूत्रामध्यें `ये त्रिषप्ता:’व `शंनोदेवी’यांपैकीं एकाचाहि उल्लेख नाहीं. परंतु कौशिकामध्यें असा स्पष्ट पुरावा आहे कीं ज्या शाखेच्या संहितेच्या आधारावर हें सूत्र रचिलें त्याचा आरंभ `ये त्रिषप्ता:’या मंत्रानें झाला आहे. परिभाषा सूत्र ७,८ हें `पूर्वम् त्रिषप्तीयम्’ असें आहे. त्याचा अर्थ जेथें जेथें पूर्वम् शब्द प्रतीक म्हणून वापरला असेल, तेथें तेथें त्यानें त्रिषप्तीय सूक्त अभिप्रेत आहे असें समजावें या परिभाषेनुसार नेहमीं या सूक्ताला उद्देशून सूत्रामध्यें पूर्व शब्द आला आहे. यावरून असें ठाम दिसतें कीं कौशिक हें अथर्वाच्या प्राचीन प्रतीचें सूत्र आहे व प्राचीनप्रत शौनकीय आहे व ही कौशिक, वैतान, व प्रतिशाख्य या तीन सूत्रांची संहिता होय हें स्पष्टपणें सांगितलें आहे. या दोन संहितांमधील समान गोष्ट अशी कीं, संबोधनाच्या अखेरीस येणारा ओ व पुढील स्वर यांचा संधि केलेला नाहीं.
कौशिकसूत्राच्या अथर्वणसंहितेची प्राचीनप्रत अस्तित्वांत होती हें स्पष्ट आहे कारण त्यांत त्यांतील पुष्कळच सूक्तांचें अवतरण प्रतिकांनीं केलें आहे. यावरून ज्यानें यज्ञयागादि करावयाचें त्याला संहिता पाठ आलीच पाहिजे असें गृहीत धरलें आहे असें दिसतें. काण्ड १९ चा विचार पुढें केला आहे. तें सोडून दिल्यास बाकीच्या वेदांतील सूत्रात अथपासून इतिपर्यंत दिलेल्या ॠचा अतिशयच थोड्या आहेत. कौशिक ६.१७ मध्यें अथर्व ६.८५,२; कौ. १०६,७;७५,५ मध्यें अथर्व १४.१,१३ याच त्या होत. मध्यें अथर्व ७, ४८, २; कौ. ९७,६ मध्यें अथर्व ८,२९; शेवटल्या उदाहरणाखेरीज पहिल्या तीन उदाहरणांमध्यें मंत्र-सहितेपासून घेतलाच नाही हें स्पष्ट आहे. अथपासून इतिपर्यंत मंत्र अथर्ववेदांतील ॠचांशीं कांहींसे जुळते आहेत ही गोष्ट केवळ आकस्मित होय. अशी स्थिति निरनिराळया शाखांच्या मंत्रांची तुलना करतांना नेहमीं द्दष्टोत्पत्तीस येते. कौशिकसूत्रामध्यें १४ व २० हीं कांडें अजीबात गाळलीं आहेत. त्यांतील १५ वें अव्यवहार्य व रुपकमय स्वरुपाकरितां, तो व्रात्यग्रंथ म्हणून गाळलें असावें; व विसावें एकतर तें हीं सूत्रें रचलीं गेल्यानंतर संहितेंत घातलें असावें म्हणून किंवा त्याचा श्रौताशीं स्पष्टपणें संबंध होता म्हणून गाळलें असावे व हेंच जास्त संभवनीय दिसतें, सोमयज्ञाच्या शस्त्रांकरितां व स्तोत्रांकरितां, कांहीं अपवाद खेरीज करून वैतान सूत्रामध्यें विसाव्या कांडाचा उपयोग केला आहे.
१९ व्या काण्डाचा या सूत्रांशीं असलेला संबंध विशेष लक्ष पुरविण्यासारखा आहे. यांतील फारच थोडया मंत्रांचें अवतरण प्रतीकांनीं केलें आहे. जसे कौ. ६,३७;४५,१७; व ६८,२९, मध्यें १९. ५२,१: कौ. ६,३७ मध्यें १९. ५९,१: कौ. ६६, मध्यें १९. ६०,१: कौ. ५७,९६ मध्यें १९. ६४,१: कौ. १३९, १० मध्यें १९. ६८,१. बाकीचीं एकोणीसाव्या कांडांतील अवतरणें ही सकलपाठांतील सूत्रांत दिलेले मंत्र होत व म्हणून ही शौनकीय संहितेमधून घेतलेलीं नव्हत. कौ. ६,३७ मध्यें दारिलानें एका कोपर्यांतल्या प्रतिकाकरितां( १९,५९ ) सगळया सूक्ताचा सकल पाठ दिला आहे ही चमत्कारिक गोष्ट आहे ! वर दाखविलें आहे कीं कौशिकांतील अथर्व सूत्र या नांवानें संबोधिलेल्या भागामध्यें १९ व्याकांडांतलें एकहि अवतरण प्रतीकानें दिलेलें नाही. या शाखेचीम्हणून तयार झालेली व मान्य झालेली संहिता आणि स्पष्टपणें निराळया ठिकाणाहून आलेला दुसरा मंत्रसमूह यांच्या मधील स्थान कौशिक सूत्रांत या १९ व्या कांडाचें असावें असें रोटच्या मताप्रमाणें पिप्पलाद शाखेभर १९व्या कांडाचा विषय पसरला होता. आपणास असें गृहीत धरावयास हरकत नाहीं कीं, या कांडाचा विषय अथर्ववेदाच्या सर्व शाखांच्या संप्रदायांना माहीत होता, तो पहिल्या संस्करणाचे वेळीं गाळला होता, पण मागाहून संगृहीत करण्यास योग्य असा वाटल्यामुळें मूळवेदांत सामील केला गेला असावा. व्हिटनेच्या मतें अथर्व परिशिष्ट, एकोणिसावें कांड मुदलींच मानीत नाही. कौशिकसूत्राचें धोरण संशयित स्वरूपाचें दिसतें; कांहीं मंत्र त्याच्या शाखेच्या इतक्या परिचयाचेआहेत कीं त्यांचें निदर्शन नुसत्या प्रतीकांनीं केलें असतां पुरें होतें; तर दुसरे कांहीं अथपासून इतिपर्यंत देणें भाग होतें. नंतरच्या अथर्ववाङमयांत या मंत्रांचा परिचय अर्थात् जास्त द्दढ झालेला द्दष्टोत्पत्तीस येतो. परिशिष्टांत १९ वे कांड बाकीच्या अथर्ववेदाप्रमाणेंच मानलें असून त्यांतीलच अवतरणें विशेषत: वारंवार येतात. उदाहरणार्थ १९,७ हें नक्षत्रकल्प १० मध्यें घेतलें आहे; १९,९ हें नक्षत्र २६ व अथर्वपरिशिष्ट ४,४; ६,२ मध्यें घेतलें आहे इत्यादि. अथर्वपरिशिष्ट ३४ मधील गणमालेमध्यें १९ व्या कांडातले पुष्कळ मंत्र अवतरण करून घेतले आहेत.
हिलेब्रँट यांनीं असा एक प्रश्न उपस्थित केला आहे कीं, एकादा मंत्र किंवा सूक्त, ज्या स्वरूपांत संहितेंत आलें आहे, त्यापेक्षां तें निराळया स्वरूपांत असावें असें या सूत्रावरून दिसतें काय ? या प्रश्नाचाहि विचार केला पाहिजे. सामान्यत: ॠचेंतील शब्द व सूक्तांतील ॠचांची संख्या व अनुक्रमया द्दष्टीनें सूत्रांत आलेले मंत्र व सूक्तें हीं अगदीं संहितेवरहुकुम आहेत. परंतु यासंबंधानें पुढें दिलेला मुद्दा लक्षांत ठेवण्यासारखा आहे. जेव्हां एकादें अथर्वसूक्त, स्पष्टपणें, अनेकावयवघटितस्वरूपाचें असतें, म्हणजे संहिताकारांनीं जेव्हां संहिता करण्याचें वेळीं पुष्कळ सूक्तांचें मिळून एक सूक्त बनविलेलें असतें, तेव्हां सूक्तकारांनीं अशा सूक्तांचा प्रत्येक अवयव लक्षांत घेऊन त्याचा योग्य स्थलीं उपयोग केलेला आहे. अथर्व ४,३८ हें सूक्त स्पष्टपणें पुष्कळ लहान लहान सूक्तांचें बनलें आहे. या सूक्ताच्या ५-७ या ॠचांवर ग्रिलनीं केलेल्या टीकेला कौशिकसूत्रानें पुष्टि दिली आहे व या सूक्ताच्या अंतस्थ पुराव्यावरून तीच गोष्ट सिद्ध होते. ॠचा १-४ मध्यें द्यूतविषयक अभिचार मंत्र आहे व कौशिक- सूत्रामध्यें ४१,१३ मध्यें अथर्व ७,५०; व ७,१०९ यांतील अशाच तर्हेच्या दुसर्या मंत्राबरोबर यांचा विचार केला आहे. ॠचा ५-७ या कौ० २१,११ मध्यें एका जनावराविषयीच्या अभिचारमंत्रांत घेतल्या आहेत. ह्या शेवटल्या ॠचा पहिल्या ॠचांपेक्षां पूर्णपणें इतक्या निराळया तर्हेच्या मानल्या आहेत कीं, त्यांना कर्कीप्रवादा: असें निराळें पारिभाषिक नांव दिलें आहे. त्याचप्रमाणें अथर्व ७,७४ हें सूक्तहि पुष्कळ निरनिराळया सूक्तांचें बनलें आहे ही गोष्ट सूक्तकाराच्या लक्षांत आलेली आहे. कौ० ३२,८ मध्यें पहिल्या दोन ॠचा अपचित नांवाच्या जखमा घालविण्याच्या तंत्राला लाविल्या आहेत. तिसरी ॠचा कौ० ३६,२५ मध्यें मत्सर घालविण्याचा मंत्र म्हणून, योग्यस्थळीं घेतली आहे व चवथी ॠचा कौ० १,३४ मध्यें योग्यस्थळीं घेतली आहे. अथर्ववेदाच्या संस्करणकारांना अशा निरनिराळया स्वरूपाच्या ॠचा एके ठिकाणीं घालण्यास त्यांच्या अंगीं असलेलें कोणतें न्यून म्हणजे त्यांना
त्याचा अर्थ कळला नाहीं किंवा दुसरें कांहीं कारण झालें असावें हें नेहमींच सांगतां येणें शक्य नाहीं. याचप्रमाणें अथर्व ७,७६ या सूक्ताचे कौशिक व वैतान दोन्ही सूत्रांनीं तीन भाग पाडले आहेत. वरील सर्व उदाहरणांत संहितेच्या परंपरेपेक्षां विधीची किंवा आचाराची परंपरा श्रेष्ठ मानिली आहे यांत संशय नाहीं.
[ अथर्ववेदासंबंधी संदर्भग्रंथ व वाङमय बुद्धपूर्व जग या ग्रंथाच्या शेवटीं दिलें आहे. ]