विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजंठा येथील लेणीं - निझामच्या हद्दींत उ. अक्षांश २०.२५ व पू. रेखांश ७६.१२. फर्दापूर पासून नैऋत्येस सोडेतीन मैलावर अजिंठा अथवा सह्याद्रि पर्वताच्या एका मुख्य खिंडीमध्येंह हीं लेणीं आहेत. यांस जाण्याकरितां जी. आय. पी. रेलवेच्या पाचोरा जंक्शनवरून जाम्नेरच्या ब्रँच लाईननें २५ मैलांवरच्या पाहूर स्टेशनावर उतरून पुढें सडकेनें पंधरा मैल निजाम सरकारच्या हद्दीतील अजिंठा गांवापर्यंत जावें लागतें. गांवापासून लेण्यापर्यंत सुमारें चार मैल पर्वताच्या तीन चार ओळी ओलांडून प्रवास करावा लागतो. हा पुढचा रस्ता नागमोडी व खडकाळ असून फार अडचणीचा आहे, व त्यापुढें अगदीं एकांताच्या व भयानक अशा खिंडींत लेणीं आहेत. लेण्यांच्या पलीकडे मोठा कडा तुटलेला असून तेथून ७ पायर्यांनीं एक धबधबा पडतो. डोंगराच्या माथ्यावर पूर्वी लेणापुर नांवाचें खेडें असून त्यास जाण्याकरितां लेण्यांपासून पायर्या खोदून वाट केलेली होती हीं लेणीं पूर्वीच्या हमरस्त्यावर असून येथील वनशोभाहि अप्रतिम आहे. या लेण्यांचा उल्लेख ह्युएन त्संग यानें केलेला आढळतो. पण तो येथें आला नव्हता. (Stan Julien Memo.Sur. les count Occident [I १५१)
त्याच्या वर्णनावरून असें दिसतें कीं, त्या वेळीं या गुंफा बौद्धधर्मीयांचें तीर्थयात्रेचें स्थान असून हजारों मुनष्यांची तेथें सतत येरझार चालत असे. पुढें बौद्धधर्माचा निरास झाल्यावर या स्थळाचें महत्त्व कमी होऊन तिकडे जाणारांना सभोंवतालच्या जंगलांतील क्रूर भिल्ल व हिंस्त्रपशू यांचा त्रास होऊ लागला व त्यामुळें तेथील रहदारी हळूहळू कमी होत होत नाहींशी झाली, व पुढें तें स्थल अज्ञात होऊन राहिलें. अशी स्थिति १८२१ पर्यंत होती. पुढें कंपनी सरकारच्या मद्रासच्या अंमलदारांना अजिंठ्याच्या लोकांच्या तोंडून तेथें लेणीं असल्याचें कळलें, परंतु रस्ता अति बिकट व भीतिप्रद होता. तरी जनरल सर जेम्स अलेक्झांडर यानें तेथें जाण्याचें धाडस केलें. मार्गांत अनेक संकटें आली तरी शेवटीं तो मुख्य जागीं जाऊन पोहोंचला. सर्व लेणीं पाहून तो अगदीं थक्क होऊन गेला. व त्यानें हीं लेणीं प्रसिद्धीस आणलीं. तरी पुढें १८४९ पर्यंत त्या लेण्यांची उपेक्षा केलेली आढळते व तोंपर्यंत येथें जाण्याचा रस्ताहि फार बिकट व भीतिप्रद होता. १८४९-५५ यांच्या दरम्यान कोर्ट डायरेक्टर्सनीं मेजर गिल यास येथील कांहीं चित्रांच्या नकला करण्यास पाठविलें. {kosh टीप. यानें ३० मोठालीं चित्रें काढून लंडनला पाठविलीं त्यांपैकीं २५ सिडनहॅम स्फटिकभवनांत मांडलीं होतीं १८६६ च्या अग्निप्रलयांत तीं जळून गेलीं. बाकीचीं पांच चित्रें व Mrs Speirs Ancient India या पुस्तकांतील कांही खोदकामाच्या लहानशा नमुन्यांशिवाय गिलचें काम उपलब्ध नाही.}*{/kosh} १८७४ त त्यानें सर्व लेण्यांची उत्तमप्रकारें पहाणी करून बरींच चित्रें साफ केलीं. १८७४ मध्यें चित्रें असलेल्या लेण्यांस दरवाजे व खिडक्या बसविण्याचें ठरलें होतें परंतु तें तसेंच राहिलें. लेणीं साफ करण्याचें काम अद्यापि चालूच आहे.
हीं एकंदर २९ लेणीं आहेत त्यांपैकीं दोन अर्धवट असून एकाचा रस्ता बिकट आहे व दुसर्यांस मुळींच रस्ता नाहीं. यांपैकीं पांच लेणीं ( ९,१०,१८,२६,२७ ) चैत्य ( बौद्ध देवळें ) असून लांबट आकाराचीं व आंतील बाजू वाटोळी अशीं आहेत. मध्यें दोन खांबांच्या रांगा आहेत व अर्धवर्तुळाकृति भागांत डाघोबा आहे. पुढें कमजास्त उंचीची भिंत असून तिला एक दरवाजा व दोन खिडक्या अथवा तीन दरवाजे आहेत. कांहींच्या पुढें पडव्या असून वर गच्ची आहे. बाकीचे विहार असून ते बहुतेक चौकोनी आहेत. त्यांच्या बाजूंना खोल्या आहेत. यांच्यामध्येंहि खांब आहेत. समोरच बुद्धाची मूर्ति बहुतकरून असते.
यांपैकीं कांही लेणीं अर्धवट राहिलेलीं आहेत परंतु एक खेरीज सर्व लेण्यांमध्यें चित्रें रंगविलेलीं आहेत. हीं सर्व लेणीं ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकापासून ख्रिस्तीशकाच्या आठव्या शतकापर्यंत १००० वर्षांत निरनिराळ्या काळीं खोदलीं गेलीं असावीं. यांपैकीं कांहीं लेण्यांत शिलालेख आहेत परंतु त्यांपासून विशेषसी ऐतिहासिक माहिती मिळत नाहीं. परंतु यांतील चित्रांवरुन हिंदुस्थानांतील तिसर्यापासून आठव्या शतकापर्यंतच्या लोकांची राहणी चांगली समजते. या चित्रांमध्यें त्यावेळचे राजे, राण्या, मंत्री, नोकरचाकर, शिपाई (सैनिक), कारागीर शेतकरी यांचीं त्या वेळच्या पोषाखांत चित्रें असून निरनिराळ्या प्रसंगांवरून त्यांच्या चालीरीती व धर्म यांचें ज्ञान होतें. चित्रकलेच्या दृष्टीनें पाहिलें असतां हीं चित्रें अप्रतिम असून इतकीं भावनादर्शक चित्रें जगांत क्कचितच आढळतील असें ग्रिफिथ वगैरेंचें म्हणणें आहे.
लेणें १ :- हा विहार असून याला पुढे पडवी असून तिच्या बाजूंना व आंत खोल्या आहेत. यांतील खांबांवर, पुढच्या बाजूस व आंत सर्वत्र फारच उत्तम नक्षीकाम केलेलें असून बुद्धाच्या चरित्रांतील कांहीं प्रसंग खोदलेले आहेत. आंतील बाजूवर निरनिराळे देखावे रंगविलेले आहेत. एकंदर सुमारें २० निरनिराळे प्रसंग रेखाटले असून त्यांत एक इराणांतून आलेल्या वकिलातीचा देखावा आहे.
लेणें २ :- हें पहिल्याप्रमाणेंच एक विहार असून यांत पुष्कळ खोदकाम केलेलें आहे व सुमारें ३८ चित्रें आहेत.
लेणें ३ :- हें दुसर्या लेण्याच्या थोडेंसे वरच्या बाजूस असून अर्धेच राहिलेलें आहे.
लेणें ४ :- हा सर्वात मोठा विहार आहे. यामध्येंहि कांहीं खोदकाम आहे. यामध्यें एकच अर्धवट चित्र दिसतें.
लेणें ५ :- या विहाराची पडवी खोदून झाली असून बाकीचें काम अर्धवट आहे. यामध्येंहि कांही खोदकाम केलेलें आहे.
लेणें ६ :- हा दुमजली विहार असून सर्वांत अलीकडील असावा. यांत कांहीं खोदकाम आहे व रंगविलेल्या चित्रांचे कांहीं अवशेष आहेत.
लेणें ७ :- हा विहार वरील विहारांपेक्षां थोडा निराळ्या पद्धतीचा आहे. यांत शाक्यमुनीची सिंहासनाधिष्ठित मूर्ति असून सभोंवती कांहीं आकृती खोदलेल्या आहेत. यांत कांहीं रंगविलेलीं चित्रेंहि आहेत.
लेणें ८ :- हा विहार सर्वांत जुना असून ख्रि. पू. पहिल्या शतकांतला असावा. याचा पुढचा भाग पडून गेला आहे. आंत दोन खोल्या ( गर्भगृह ) असून त्यांत मूर्ति नाही.
लेणें ९ :- हा ख्रि. पू. पहिल्या शतकांतील चैत्य असावा. यांत स्तूप असून कांही खोदकाम आहे व ५ रंगविलेलीं चित्रें आहेत. हीं चित्रें मागाहूनचीं व निरनिराळ्या काळचीं आहेत.
लेणें १० :- हा चैत्य असून ख्रि. पू. दुसर्या शतकांतील म्हणजे या लेण्यांपैकीं सर्वांत जुना असावा. यांत स्तूप असून वासिष्ठीपुत्राचा एक शिलालेख आहे. यांत सर्व बाजूंना चित्रें काढलेलीं होतीं व कांहीं अक्षरें लिहिलेलीं आढळतात.
लेणें ११ :- हा विहार असून याच्या पडवींत दोन्ही बाजूंस दोन खोल्या असून मधल्या दालनांत बुद्धाची मूर्ति व एक मनुष्याची आकृति खोदलेली आहे व आंत एक खोली आहे. यांतील चित्रें खराब होऊन गेलीं आहेत.
लेणें १२ :- यांत एक दालन असून १२ खोल्या आहेत व एक शिलालेख आहे.
लेणें १३ :- यांत एक दालन असून ७ खोल्या आहेत.
लेणें १४ :- हें तेराव्या लेण्याच्या वरच्या बाजूस असून यांत एक दालन असून कांहीं खांब आहेत. हे येथील इतर खांबांप्रमाणें अष्टपैलू नसून चौकोनी व निराळ्या धर्तीचे आहेत.
लेणें १५ :- या विहाराला पुढें पडवी, आंत एक चौकोनी दालन व १० खोल्या आहेत, व एक बुद्धाची मूर्ति आहे.
लेणें १६ :- हा एक विहार असूत यांतील शिल्पकाम उत्कृष्ट आहे. यांत एकंदर १६ खोल्या आहेत, व एक भव्य बुद्धाची मूर्ति आहे. यांत एक शिलालेख असून त्यांत मध्यप्रांताच्या विंध्यशक्ति वगैरे ६।७ वाकाटक घराण्यांतील राजांचा उल्लेख आहे. यांत बुद्धाच्या चरित्रांतील वगैरे १४ चित्रे आहेत.
लेणें १७ :- हा विहार असून यांत एक शिलालेख आहे. त्यांत अश्मक, धृतराष्ट्र, त्याचा पुत्र हरि सांब, त्याचा पुत्र क्षितिपाल सौरि सांब, उपेन्द्र गुप्त व त्याचा पुत्र स्काच अशीं
राजांचीं नांवें आढळतात. हे स्थानिक राजे असावे. यांत एकं-दर ६१ चित्रें आहेत.
लेणें १८ :- हें एका टांक्यास आच्छादन म्हणून व दुसर्या लेण्यास जाण्याकरितां वाट म्हणून खोदलेलें दिसतें.
लेणें १९ :- हा चैत्य असून चांगल्या स्थितींत आहे. यांत पुष्कळ खोदकाम केलेलें आहे. व कांहीं चित्रांचे अवशेष आहेत.
लेणें २० :- हा लहानसा विहार असून यांत एक पडवी, एक दालन व एकंदर ६ खोल्या आहेत. यांत बुद्धाची मूर्ति व कांहीं आकृति खोदलेल्या आहेत. चित्रांचे अवशेष आहेत.
लेणें २१ :- हा विहार असून यांत बरेंच खोदकाम केलेलें आहे. यांत बुद्धाची मूर्ति व कांहीं खोल्या आहेत. छतावर भूमितींतील आकृति वगैरे चित्रें आहेत.
लेणें २२ :- हा एक लहानसा विहार आहे. यांत शाक्य-मुनींची मूर्ति असून विपष्यि, शिखि, विश्वभु वगैरे बुद्धांचीं चित्रें आहेत व कांहीं शब्द लिहिलेले आहेत.
लेणें २३ :- हा एक विहार असून यांतील गर्भगृह अर्धवट राहिलें आहे. चित्रांचा कांहीं मागमूस लागत नाहीं.
लेणें २४ :- हा एक अर्धवट राहिलेला विहार आहे. व यांतील तयार झालेल्या खोदकामावरून हा पुरा झाला असता तर फारच अप्रतिम झाला असता असें दिसतें.
लेणें २५ :- हा एक लहानसा विहार असून याला एक पडवी व एकच दालन आहे.
लेणें २६ :- हा १९ व्या लेण्यांसारखाच एक चैत्य आहे. यांत पुष्कळच खोदकाम केलेलें आहे. यांत दोन शिलालेख आहेत. यांत एक बुद्धाची मृत्युशय्येवरील भव्य मूर्ति आहे.
लेणें २७ :- हें अर्धवट राहिलेलें आहे.
लेणे २८ :- यामध्यें एका चैत्यास आरंभ केलेला असून अर्धवट राहिलेलें आहे.
लेणें २९ :- यास जाण्यास रस्ता नसून यांत फक्त एका विहाराची पडवी खोदून झाली आहे.
'हिंदुस्थानांतील कोरीव लेण्यांचें वर्णन' या नांवाच्या फर्ग्यूसन व बर्जेसकृत पुस्तकावरून पुढील महत्त्वाची माहिती घेतली आहे पान [२८५ ]
''हीं लेणीं इ. सनापूर्वी पहिल्या शतकापासून इ. सनाच्या ७ व्या शतकापर्यंतच्या काळांत खोदण्यांत आलीं. त्यांत जीं फार प्राचीन आहेत, तीं पैठणच्या शातकर्णीच्या वेळचीं आहेत. हीं सर्व लेणीं बौद्धांचीं होत. त्यांतील प्राचीन हीनयान बौद्धपंथाचीं असून मागाहूनचीं महायानपंथाचीं आहेत. पहिल्यांत चैत्य व डागोबा असून दुसर्यांत बुद्धांच्या मूर्ति आहेत. या दोन्ही प्रकारच्या लेण्यांत रंगीत चित्रें आहेत. खरखरीत असलेल्या भिंतीवर भाताचा कुंडा व तागाचे वगैरे तंतु मिसळून चिकट केलेल्या गिलाव्याचा थर देऊन त्यावर हीं चित्रें काढिलीं आहेत. गिलाव्यावर प्रथम भूमिकेसाठीं एका प्रकारचा रंग देऊन नंतर त्यावरतीं चित्रें आंखून रंगविलेलीं आहेत.
हीनयान आणि महायान पंथांच्या लेण्यांतील फरक अगदीं स्पष्ट आहे. हीनयान पंथांतील भिक्षु एक दोन सोबती घेऊन ओबडधोबड लेण्यांत एकीकडे रहात असत. म्हणजे त्यांनीं या बाबतींत प्राचीन हिंदुधर्मांतील संन्याशाची वहिवाट चालू ठेविली होती. पण महायान पंथाचे भिक्षु भव्य सुंदर लेण्यांत राहून सर्व सुखसोईचा उपभोग घेत. शिवाय पहिल्यांतील लोक बुद्धाच्या शरीराच्या अवशेषावर उभारलेल्या डागोबाची मात्र पूजा करीत, तर दुसरे बुद्ध, बौधिसत्त्व आणि तारा आदिकरुन त्यांतील स्त्रीस्वरुप शक्ति, यांचे प्रचंड पुतळे करून त्यांची पूजा करीत. त्यांनीं मूर्तिपूजेचें फारच अवडंबर माजविंलें.
सामान्यपणें या लेण्यांतील चित्रें बुद्धाच्या चरित्रांतील किंवा जातक कथांतील विषयांवर आहेत. अगदीं अलीकडच्या एका लेण्यांत मात्र इराणच्या खुसरू नामक राजाकडून आलेल्या शिष्ट मंडळाची पुलकेशी आपल्या दरबारांत भेट घेत आहे असा देखावा दाखविला आहे. ''
अजिंठालेण्यांतील चित्रें किती हृदयंगम व भावनोद्दीपक असतात हें पुढील एका देखाव्याच्या वर्णनावरून दिसून येईल.
मृत्युशय्येवर एक राजकन्या पडली असून, तिचे डोळे अर्धवट मिटले आहेत, मान लटकी पडलेली आहे व गोत्रें शिथिल झालीं आहेत. एका दासीनें तिला आधार दिला आहे व दुसरी तिचा हात आपल्या हातांत घेऊन मोठ्या कळवळ्यानें तिच्या तोंडाकडे पाहात आहे. या दुसर्या स्त्रीच्या चेहर्यावर राजकन्येचें आयुष्य सरत आलें अशी खात्री झाल्याकरणानें चिंतेची गाढ छाटा पसरली आहे. आणखी एक दासी मागे उभी राहून राजकन्येला वारा घालीत आहे व डाव्याबाजूस दोन पुरुष अतिशय दु:खित मुद्रेनें पाहात आहेत. खालीं जमिनीवर इतर नातेवाईक निराश स्थितींत बसले आहेत. त्यापैकीं एक स्त्री तर तोंडावर हात धरून ओक्साबोक्सी रडत आहे. ( लेणें नं १६ )
हा हृदयभेदक देखावा कलेतिहासांत सर्वश्रेष्ठ असल्याबद्दल पाश्चात्त्य पंडितहि ग्वाही देतात. फ्लारेंटाईन कला यापेक्षां जास्त सरस चित्र रेखाटील व व्हेनेशियन कला यांतील रंगावर ताण करील यांत संशय नाही; पण यांतील अविर्भावदर्शन मात्र कोणालाच साधणार नाहीं असें ग्रिफिथसाहेब आपल्या रिपोर्टांत (१८७३-७४) म्हणतात.
लेण्यांतील चित्रांत मुख्य व्यक्ति राजा ही असते. जुन्या चित्रांत (१० वें लेणें. इ.स.१५० ) राजे एकाच जातीचे दिसतात; पण अलिकडील चित्रांतील (इ. स. ३००-६३०) राजे निरनिराळ्या जातीचे असावेत असें दिसतें, व ते सर्व हिंदीच दिसतात. कांही चित्रांत राजे लढाईंत, शिकारींत, किंवा प्रवासांत वगैरे गृहबाह्य व्यवसायांत गुंतलेले आहेत व कांहींत राजवाड्यांतील खाजगी किंवा दरबारी व्यवसायांत मग्न असल्याचें दाखविलें आहे. पुष्कळ चित्रांत राजाबरोबर राण्यांची चित्रें आहेत. त्यांच्या अंगावर दागिने आहेत व वस्त्रें डाकाच्या मलमलीप्रमाणें फार झिरझिरित आहेत. राजे व राण्या यांच्या खालोखाल महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे राजपुत्र व राजांचे प्रधान या होत. दरबारी लोक व स्त्रिया यांचीं चित्रें पुष्कळ ठिकाणीं आहेत. राजवाड्याच्या चित्रांत स्त्रीपुरुष चाकरांची खूप गर्दी आढळते. त्यांत बरेचसे खोजे नोकर आहेत. नोकरांचे पेहेरावहि निरनिराळ्या पद्धतीचे आहेत. लढायासंबंधीच्या चित्रांत राजाबरोबर सैनिकांचीं चित्रें आहेत. जुन्या चित्रांत ( १० वें लेणें ) सर्व सैनिक पादचारी असून त्यांच्याजवळ परशु, भाले व काठ्या असलीं हत्यारें आहेत. नंतरच्या ( इ. स. ४००-६०० ) चित्रांत पायदळाबरोबर घोडेस्वारहि असून त्यांच्याजवळ धनुष्यबाण, तरवारी, भाले, चक्रें, तसेंच बचावार्थ ढाली व शिरस्त्राणें, इत्यादि हत्यारें आहेत. व्यापार व कारागीर यासंबंधानें स्वतंत्र चित्रें नाहींत, पण स्त्रियांच्या अंगावरील वस्त्रालंकारांवरून सोनार, विणकरी, नकशी काम करणारे वगैरेंच्या कलाकौशल्याबद्दल बरीच कल्पना येते. चित्रांत रथादि वाहनें, जहाजें आहेत त्यावरुन जमिनीवर व समुद्रावर चालणार्या व्यापाराची कल्पना होते. शेतकर्यांचीं चित्रें क्वचित् आहेत, पण ते केळीं (१,१९), सुपारी (१,१८), आंबे (५), द्राक्षें (१४), वगैरे फळझाडें व अनेक प्रकारचीं फुलझाडें यांची लागवड करीत असत असें दिसतें. तसेंच या चित्रांवरून बौद्ध, जैन व ब्राह्मण धर्मांतील रीत रिवाजाबद्दल पुष्कळ माहिती मिळते. तात्पर्य, ऐतिहासिक संशोधकांनां हीं लेणीं म्हणजे माहितीनें भरलेली बहुमूल्य खाण आहे.
अजिंठा येथील लेण्यांचे वर्णन पुढील गृहस्थांनीं दिलें आहे.
(१) Burgess' Notes on the Buddha Rock Temples of Ajantha.
२) Mr.Griffith's Reports (१८७४-१८७९),
(३) Madras officers account १८१९. T.B.L.S. III. ५२०.
(४) Sir James E. Alexander's visit in १८२४.T.R.A.S.II.३६२
(५) Mr.Ralph's account of a visit in १८३८. J. B.B.R.A.S.III. part II. ७१-७२.
(६) Lient Blake's Description, Bombay Courier १८३९
(७) Description of Mandu & Ajuntha Bombay. Times Press १८४४.
(८) Mr.Fergusson's paper J.R.A.S.१८४२.
(९) Dr.J.Muir's Journey from Agra to Bombay. १८५४,
(१०) Major Gill's Stereoscopic photographs of Ajantha & Elura १८६२.
(११) Dr.Bhau Daji's transcripts and translations of Inscriptions J.B.B.R.A.S. VII. ५५-७४.
(१२) Major Gill's Illustrations of Architecture & Natural History in Western India १८६४.
(१३) Mr.Burgess' Rockcut Temples of Ajantha Ind. Ant. III. २६९-२७४.(१४) Griffith's account of the Frescoes Ind. Ant. I. ३५४; II. १५२; III.२५; IV. २५३.
(१५) Dr. Rajendralal Mitra's Foreigners in Ajantha Paintings, J.A.S Ben. XLVII.६२.
(१६) Mr. Fergusson's Chosroes II. in Ajantha Paintings. J.R.A.S. New series XI.
मुंबई गॅझेटिअर-खानदेश, बुलढाणा गॅझेटिअर.