विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजीव संयुक्त पदार्थ - या वर्गांत हल्लीं परदेशांतून येणारे कृत्रिम रंग येतात. हे सर्व कृत्रिम रंग रासायनिकरीत्या तयार केलेले असतात. त्यांपैकीं प्रमुख म्हणजे क्रिसोइडाइन नांवाचा नारिंगी रंग, बिस्मार्क ब्राउन, फेनिलिन ब्राउन, मँचेस्टर ब्राऊन इत्यादि पिंगट रंग, गोल्ड ऑरेंज, मंदारिन ऑरेंज, किंवा ऑरेंज नंबर तीन इत्यादि नारिंगी रंग येतात. या वर्गांत कांहीं पिंवळे व तांबडे रंगहि येतात. सेंद्रिय रसायनशास्त्रांत अजीव संयुक्त पदार्थ (अ‍ॅझो काँपाउन्डस ) म्हणजे ज्ञ.न:न.ज्ञ' या घटनेचे पदार्थ समजले जातात. या सारणींत ज्ञ=आरिल मूलक आणि ज्ञ'=आदिष्ट उत्कर्बिल किंवा आरिल मूलक असें समजावें. (आरिल हा शब्द आर्य शब्दांतील ऋधातूपासून तयार केला असून त्याचा अर्थ ओजस्विन्, तेजस्विन् हा आहे. इंग्रजी Aryl या शब्दाशीं आरिल या शब्दाचें उच्चार व अर्थसाम्य असल्यानें Aryl=आरिल हा शब्द या कोशांत योजला आहे). नत्र संयुक्त पदार्थां (नायट्रो कांपाउंडस) चें उज्जिदीकरण ( रिडक्शन ) करून अजीवि संयुक्त पदार्थ तयार होतात. हें ज्जिदीकरण अम्लद्रवांत केलें असतां त्या जातीचे अमिन पदार्थ तयार होतात, परंतु अल्कीय द्रवांत उज्जिदीकरण केलें म्हणजे अजीवी संयुक्त पदार्थ तयार होतात. हें उज्जिदीकरण करण्याकरितां अल्क आणि जस्ताचा कीस यांचा उपयोग करतात. अजीवी पदार्थ अजीवी संयुक्त पदार्थापेक्षां (डाय अझोकांपाउन्डस) अधिक स्थिर असतात याचें कारण अजीवी संयुक्त पदार्थांतील द्विपाशबद्ध (डब्ली लिंक्ड) नत्रपरमाणु उदीन बीजगर्भाशीं (बेंझीन न्युक्लिअस) आसक्त ( अटॅच्ड ) झालेले असतात. या वर्गात अजीवी रंग (अ‍ॅझोकलर्स ) म्हणून जो महत्त्वाचा रंगवर्ग आहे त्याचा समावेश होतो.

अल्कीय जशद चूर्णाऐवजीं अल्कीय वंगायिता (स्टॅनाइट) चाहि उज्जिदीकरक म्हणून उपयोग करतात. याशिवाय अजीवित (डाय अ‍ॅझोटाइझ्ड ) अमिनाचा संयोग, भानल (फिनोलिक ) किंवा अमिन घटनातुल्य संयुक्त पदार्थाशीं केला म्हणजे देखील अजीवि संयुक्त पदार्थ तयार होतात, परंतु या अमिन किंवा भानलांतील परस्थान ( पॅरा पोझिशन) हें मात्र अव्याप्‍त ( फ्री ) असलें पाहिजे. अजीवी अमिनें (डायअ‍ॅझो आमाईन्स ) तन्मूलक अनाम्ल ( बेस ) आणि त्या आनाम्लाचा उद्धरिद, यांशीं उष्ण केलीं असतां ह्यजीवि अमीनांच्या अणूंची पुनर्रचना होऊन सुद्धां हे अजीवि संयुक्त पदार्थ तयार होतात. हे अजीवी संयुक्त पदार्थ अत्यंत रंजित ( कलर्ड ) असतात परंतु त्यांत क्षारोत्पादक, अम्ल किंवा अनाम्ल संघ असल्या- शिवाय त्यांचा रंगाचे कामीं उपयोग होऊं शकत नाहीं. प्राणिदीकारकांच्या योगानें यांचें रूपांतर अजीविप्राण ( अजी- विप्र ? अझॉक्सी=Azoxy ) संयुक्त पदार्थांत होतें आणि उज्जिदीकरणा ( रिडक्शन ) च्या योगानें त्यांचें रूपांतर उदजीवि संयुक्त पदार्थांत ( हायड्राझो ) किंवा अमिनांत होतें.

अजीव उदीन ( अ‍ॅझोबेन्झिन ) क६उ५न:नक६उ५ हा पदार्थ नत्रउदिनाचें ( नायट्रो बेंझिन ) उज्जिदीकरण अल्क हलांत जशदचूर्ण व दाहक सिंधूनें केलें असतां तयार होतो, किंवा या ऐवजीं अल्कीय वंगस हरिदानें हें उज्जिदीकरण होतें, तें याप्रमाणें:-

नत्रउदिन     उज्ज        अजीवउदिन     पाणी
२क६उ५नत्र२ + ४उ२ = क६उ५न:नक६उ५ +     ४उ२प्र

अजीव उदीनाचे अल्कहलांतून स्फटिक केले असतां ते नारिंगी लाल रंगाचे चपटे स्फटिक होतात. त्यांचा रसांक ६८ श असून उत्क्कथनांक २९३ श असतो.

अमिन अजीव संयुक्त पदार्थ :- हे पदार्थ लालसर पिवळे किंवा लाल वर्णाचे असतात. हे बहुधा स्फटिकरूप असतात आणि यांचें त्वरित उज्जिदीकरण होतें. नीलीन ( अनीलीन )
आणि निलीन उद्धरिद यांच्या बरोबर हे पदार्थ उष्ण केले असतां इंदुलीनें ( इंदुलाइन्स ) होतात.

या वर्गांतील मुख्य पदार्थांचें संक्षिप्‍त वर्णन खालीं दिलें आहे :- अमिन अजीवउदीन क६उ५.न२.क६उ४नउ२ (अ‍ॅमिनो अ‍ॅझो बेन्झीन) हा पदार्थ ह्यजीव अमिन उदीना ( डाय अ‍ॅझो अमिनो बेंझिन ) पासून अणूंच्या अंतस्थ रजनेमुळें तयार होतो. याचे पिवळे चपटे किंवा सुईच्या आकाराचे स्फटिक असतात. यांचा रसांक १२६० श असतो. नत्र अजीव उदीना ( नायट्रो अ‍ॅझो बेझिन ) चें उज्जिदीकरण (रिडक्शन) अमोनि गंधक्रिदानें (अमोनियन सल्फाइड ) केल्यावर अमीन अजीव उदीन तयार होतो आणि त्यांचे (अमीन अजीव उदीनाचे ) उज्जिदीकरण वंगस हरिदानें ( स्टॅनस क्लोराइड ) केल्यावर त्याचें रूपांतर नीलीन ( अनीलीन ) आणि मित भानिलीन द्विअमिन ( मेटा-फेनिलीन डाय अमिन ) यांत होतें. यावरून याची घटना ठरते.

व्दि अमिन अजीव उदिन ( डाय अमिनो अ‍ॅझो बेन्झिन ) क६उ५न२क६उ३ (नउ२) २ हा पदार्थ ह्यजीव उदिन हरिदाची ( डाय अझो बेझीन क्लोराईड ) क्रिया मित भानिलीन द्वि अमिनावर ( मेटा फेनिलीन डायअमाइन ) केली म्हणजे खालीं दाखविल्याप्रमाणें तयार होतो.

द्वि अजीव उदिन हरिद     मितभानिलीन द्वि अमिन   द्वि अमिन अजीव उदिन        उद्धराम्ल
क६उ५न:नह               +   क६उ४(नउ२)२                    = क६उ५न:नं.क६उ३(नउ२)२+  उह

हा पीतवर्णी स्फटिकरूप् अनाम्ल आहे. याचा अम्लद्रव रक्तवर्णी असतो. याचा उद्धरिद (हायड्रोक्कोराइड) हा पिंवळ्या नारिंगी वर्णाचा रंग बाजारांत ( क्रिसोइ डाइन ) कांचनिदिन
या नांवानें विकला जातो. लोकर व रेशीम यांस पिवळा रंग देण्याचे कामीं हा योजतात.

त्रि अमिनो अजीव उदिन ( ट्राय अमिनो अ‍ॅझो बेंझिन अथवा मेटा-अमिनो-बेंझिन-अ‍ॅझो-मेटा फेनिलीन-डायअमाईन किंवा बिस्मार्क ब्राऊन, फेनिलिन ब्राउन, व्हेसुव्हाइन,  मँचेस्टर ब्राउन) नउ२.क६उ४.न२.क६उ३(नउ२)२ म्हणजेमित-अमिन-उदिन-अजीव-मित-भानिलीन द्वि अमिन हा पदार्थ नत्रसाम्लाची (नायट्रस अ‍ॅसिड) क्रिया मितभानिलीन- द्विअमिनावर केली म्हणजे तयार होतो.  मितभानिलीन द्विअमिनउद्धरिदाच्या द्रवांत सिंधुनत्रायिताचा द्रव घालावा म्हणजे हा पिंगट रंग तयार होतो तो असा :-

मितभानिलिन द्वि अमिन उद्धरिद मितभानिलीन
(नउ २) क६ उ ४. न २. ह + क ६ उ ४ (नउ २)२  = (नउ २) क६उ४न:न.क६उ३ (नउ २)२ + उह
                  बिस्मार्क ब्राऊन                            उद्धराम्ल

द्वि अमिन अणु मधील एक अमिन संघ ह्यजीवित होतो आणि द्वि अमिनच्या दुसर्‍या अणूशीं संयुक्त होऊन हा अजीव रंग होतो.

याचे पिंगट स्फटिक असतात. ते गरम पाण्यांत सहज विद्रुत होतात. यानें सुतावर गाढ पिंगट रंग बसतो परंतु सुतास रंग देण्यापूर्वी सुतावर रंगबंधक औषधें चढवावीं लागतात.

मथिल नारंग (मेथिल ऑरेंज= हेळिआन्थीन. गोल्डऑरेंज, मंदारिन ऑरेंज; किंवा ऑरेंज नं. ३) हा परद्वि मथिल आमिन उदिन अजीव उदीन गंधकिकाम्ल (पॅराडायमेथिल अमिनो बेंझिन अ‍ॅझो-बेंझिन सल्फोनिक अ‍ॅसिड) याचा सिंधु (सोडिअम) क्षार आहे. याची सारणी (कउ३) २नंकउ४.नं२. क६उ४गप्र३धु) अशी आहे. ही नारिंगी रंगाची स्फटिकमय भुकटी असते. ही पाण्यांत विद्राव्य असते व त्या द्रव्याचा पिवळा रंग असतो. यांतील अम्ल असंयुक्त स्थितींत लालभडक रंगाचें असतें. यामधील नारंगाचा उपयोग अल्काम्लसूचि म्हणजे इंडिकेटर या नात्यानें होतो. मथिल नारंगाची घटना काय आहे ती त्याचें उज्जिदीकरण (रिडक्शन) उद्धराम्ल युक्त द्रवांत वंगस हरिदानें (स्टॅनस क्लोराइडनें) केलें म्हणजे त्यापासून गंधकिल निलीनाम्ल (सल्फअनिलिक अ‍ॅसिड) आणि पर अमिनद्वि मथिल निलीन (पॅराअ‍ॅमिनो डायमेथिल अनिलीन) हे पृथग्भूत होतात यावरून ध्यानीं येईल.

प्रा ण अ जी व सं यु क्त प दा र्थ. - प्राण अजीव संयुक्त पदार्थ तयार करण्याकरितां भानल (फिनोल) ईषद् अल्क व शीत द्रव तयार करून त्यांत द्विअजीव (डाय अझोनियम) च्या क्षाराचा द्रव घालावा म्हणजे हे पदार्थ तयार होतात. हा द्विअजीविल संघ (डाय अझोग्रूप) उत्प्राणिल संघाच्या (हायड्राक्सिल ग्रूप) संमुख येतो व परस्थान व्यापतो, परंतु यास अडथळा केल्यास तो आसन्न स्थानीं जातो. तो साक्षात् मितस्थानीं कधींहि जात नाहीं.

पर प्राणअजीवउदिन ( पॅरा ऑक्सि अ‍ॅझो बेंझिन ) किंवा उदिन-अजीव-भानिल ( बेंझिन अ‍ॅझो फिनोल ) क६उ५न:क६उ४ (प्रउ)४ हा पदार्थ तयार करण्याकरितां द्वि. अजीवित निलीनीन् ( डाय अझोटाइझ्ड अनिलीन ) चा संयोग अल्कद्रवांतील भानल ( फिनोल ) शीं करावा लागतो.

हा नारिंगी लालवर्णी स्फटिकीभवन पावणारा पदार्थ असून तो १५४० श वर वितळतो.

आसन्न-प्राण अजीविल उदिन ( ऑर्थो ऑक्सी ऑझो बेंझिन ) क६उ५न:न(१)क६उ४.प्रउ(२) या घटनेचा पदार्थ पर-पदार्थ तयार करतांना त्यासह अल्पांश प्रमाणांत होतो. यापासून तो बाष्पोद्रेकानें पातन करावा. हा आसन्न पदार्थ बाष्पपाताबरोबर येतो. याचा नारिंगी वर्ण असून सूचिकाकार स्फटिक असतात. याचा रसांक ८२.५-८३ श असतो. पातळ अमोनि हरिदाच्या द्रवांत जशदचूर्णाच्या योगानें याचें उज्जिदीकरण केलें म्हणजे त्याचेपासून आसन्न (आर्थो) अ‍ॅमिनो फिनोल (अमिन-भानल) आणि निलीन (अनिलीन) तयार होतात.

मित-प्राण अजीवि उदीन (मेटा ऑक्सी अ‍ॅझो बेंझिन) क६उ५न:न(१)क६उ४ (प्रउ) ३ हा पदार्थ आसन्न (आर्थो) सालेयिदिन (अनिसिडीन) आणि द्विअजीवि उदिन (डाय अ‍ॅझो बेंझीन) यांच्या घनीकरणानें (कंडेन्सेशननें) तयार होतो. यांपासून जो पदार्थ तयार होतो तो नंतर व्द्यजीवित (डाय अझोटाइज्ड) करून अल्कहलानें उज्जीदीकृत (रिड्यूस्ड) करावा म्हणजे उदीन अजीविमित सालेयल (अ‍ॅनिसोल) होतो आणि त्यापासून त्यावर स्फट हरिदानें (अल्युमिनियमक्लोराइड) उदक प्रक्रिया केली म्हणजे मितप्राण अजीवउदीन तयार होतो. हा ११२-११४० श मानावर वितळतो. त्याचें उज्जीदीकरण (रिडक्शन) सहज होतें व तज्जातीय (कॉरेस्पान्डिंग) उदजीव संयुक्त पदार्थ तयार होतो.

ह्य जी वि अ मि नें :- (डाय अ‍ॅझो अमाइन्स) :- अमिनांची घटना ज्ञ. न: न. नउज्ञ१ (ज्ञ=मूलक ) या सारणीप्रमाणें असते. (१) प्राथमिक अमिनाची ( प्रायमरी अमाईन्स ) व्द्यजीविक्षारावर ( डाय अ‍ॅझोनियम साल्ट ) क्रिया केली म्हणजे (२) असंयुक्त प्राथमिक अमिनावर ( फ्री प्रायमरी आमाइन्स ) नत्रसाम्लाची क्रिया असतां आणि (३) प्राथमिक अमिनावर ( प्रायमरी अमाइन्स ) नत्रस् अमाइनां ( नायट्रोस अमाइन्स ) ची क्रिया केली असतां हीं तयार होतात. हीं स्फटिकरूप घनरूप असून प्राय: पीतवर्णी असतात. यांचा अम्लांशीं संयोग होत नाहीं. यांचें रूपांतर अमिनअजीवि ( अमिनो अ‍ॅझो ) संयुक्त पदार्थांत त्वरित होतें; यांचें दाट हरसंधिद ( हॅलोजन ) अम्लांच्या योगानें पृथक्करण होऊन उदिन हरसंधिदें ( बेंझिन हॅलॉइड्स ), नत्र आणि अमिन पृथक् होतात. अम्लनिरुदें ( ऑसिड अनहायड्राइड ) इमिन उज्ज परमाणु ( इमिनो हायड्रोजन अ‍ॅटम ) च्या स्थानीं जाऊन त्यांच्या स्थानीं अम्लिल ( अ‍ॅसिडिल ) मूलकें ( रॅडिकल्स ) निविष्ट होतात; आणि तीं पाण्याबरोबर उकळलीं असतां त्यांचें रूपांतर भानलांत (फिनोल) होतें.

ह्यजीवि अमिन उदिन ( डाय अ‍ॅझो अमिनो बेंझिन ) क६उ५न:नउक६उ५ हा पदार्थ प्रथम पी. ग्रीस यांनीं काढला. याचे पीतवर्णी स्फटिकरूप् पातळ पत्रे असतात. हे ९६श उष्णमानावर वितळतात व यापेक्षां थोड्या अधिक उष्णमानावर यांचा स्फोट होतो. हे अल्कहल इथ्र आणि उदिन यांत सहज विद्रुप होतात.

ह्यजीवे अमिन उदिन (डाय अझोइमिनो बेंझिन ) क६उ५न३ हा पदार्थ द्यजीवि उदिन परिस्तंभिदा ( डा अ‍ॅझो बेंझिन पर ब्रोमाईड ) वर अम्नवायूची ( अमोनियाची ) क्रिया केली म्हणजे तयार होतो. हें पीतवर्णी तेल असून त्याचा उत्क्कथनांक ५९ श असतो. यास गुंगी येण्यासारखा वास असतो. उष्णतेनें याचा स्फोट होतो. उद्धराम्लाच्या योगानें याचें रूपांतर हरनिलीन ( क्लोर अनिलीन ), मध्यें होतें आणि नत्र निघून जातो, आणि उकळत्या गंधकाम्लाच्या योगानें त्याचें रूपांतर अमिन भानल ( अमिनो फिनोल ) मध्यें होतें.

अजीविप्राण संयुक्त पदार्थ ( अ‍ॅझॉक्सि कपाउन्ड्स ) हे  ज्ञ. न. प्र. न. ज्ञ. ( ज्ञ=मूलक ) या घटनेचे असतात. हे बहुत करून पीतवर्णी किंवा रक्तवर्णी स्फटिकरूप् घन पदार्थ असतात. हे पदार्थ नत्र ( नायट्रो ) किंवा नत्रस ( नॅट्रोसो ) संयुक्त पदार्थाचें उज्जिदीकरण केल्यानें तयार होतात. हें उज्जिदीकरण अल्कहल युक्त दाहक पालाशानें उष्ण केल्यानें होतें. हें अजीवि (अझो) संयुक्त पदार्थांतचें प्राणिदीकरण केल्यानेंहि तयार होतात.