विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी (१७३१-१८०४) :- हा एक स्पॅनिश मुत्सद्दी होता. याचा जन्म १७३१ त अॅरॅगॉनमधील बारबुनेल्स येथें झाला. १७८५ त याला रोमच्या दरबारीं वकील नेमण्यांत आलें. येथें त्यानें जुन्या इटालियन वस्तूंचा संग्रह करण्यांत व कलाकौशल्याचा पुरस्कार करण्यांत बराच नांवलौकिक मिळविला. यहुदी लोकांना स्पेनमधून घालवून देण्याच्या दुर्घट व धोक्याच्या कामांत यानें पुढाकार घेतला होता व सहाव्या पायसची निवडणूक त्याच्याच मदतीनें घडून आली होती. फ्रेंच लोकांनीं १७९८ मध्यें रोम घेतल्यावर हा फ्लॉरेन्स येथें रहावयास गेला. परंतु पोपच्या अज्ञातवासांत व इ. स. १७९९ मध्यें तो व्हॅलेन्स येथें मरण पावल्यावरहि त्यानें त्याच्या वतीनें बरेंच कार्य केलें.
यानंतर यास पॅरिसच्या दरबारीं स्पेनतर्फे वकील नेमण्यांत आलें. येथें दुर्दैवानें, फ्रान्सच्या स्पेनवरील वर्चस्वाचा विघातक तह घडवून आणण्याची कामगिरी त्याच्या नशिबीं आली. यावर नेपोलियनची मर्जी होती. हा पॅरिस येथें १८०४ मध्यें मरण पावला.