विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतफंदी - नगर प्रांतांत संगमनेर म्हणून जो मोठा गांव आहे तेथील हा राहणारा होय. हा वाजसनी ब्राह्मण होता, व याचें गोत्र कौडिण्य होतें. याच्या बापाचें नांव कवानी बाव व आईंचें नांव राजूबाई (राऊबाई-महाराष्ट्र कविचरित्र; संतकविकाव्यसूचीकार गऊबाई लिहितात, हा कदाचित् मुद्रकदोष असेल.) असून याचें आडनांव घोलप होतें. संगमनेरास मलीक-फंदी म्हणून एक चमत्कारिक फकीर होता, त्याशीं याचा फार स्नेह असल्यामुळें लोकांनीं त्याचें फंदी हे उपपद यास जोडलें, व तेव्हांपासून यास असे नांव पडलें. याचें जन्म शके १६६६ रक्ताक्षि नामक संवत्सरीं झालें होतें व हा मरण पावला त्या वेळीं ७५ वर्षांच्या वयाचा असून त्या वेळेस शालीवाहन शक १७४१ होता.

अनंत फंदी पूर्वी तमाशे करीत हिंडत असे व स्वत: रचलेल्या लावण्या तमाशांत म्हणून पोर्‍यांस नाचवीत असे. एकदां असें झालें कीं, अहल्याबाई होळकरीण संगमनेरास येऊन उतरली असतां तिला याचें वृत्त कळलें. त्यावरून तिनें यास बोलावून आणून सांगितलें कीं, जें कृत्य तुम्हीं करतां तें ब्राह्मणास करणें योग्य नाहीं. तेव्हांपासून यानें तमाशा करणें सोडून दिलें व कथा करणें धरिलें. यापूर्वी अनंतफंदी होळकर राज्यांत गेले असतां बाईनें त्यास तमाशा ऐवजीं कीर्तन करण्याचा उपदेश केला होता. त्यानंतर लोकाग्रहास्तव यावेळीं एकदांच तमाशाला फंदीनें सुरुवात केली असतां अवचित संगमनेरास अहिल्याबाईची स्वारी आली व तिनें फंदी तमाशा करीत आहे हें ऐकून त्याचें डोकें मारण्याचा हुकूम केला. हें वृत्त तमाशांत फंदीस समजतांच त्यानें तमाशाचें कीर्तनांत परिवर्तन केलें. तेव्हां बाई खूष होऊन त्याला बक्षिस देऊन पुढें गेल्या; अशी एक दुसरी कथा आहे ( म. कविचरित्र ).

याची कविता कटाव, फटके, लावण्या व क्वचित् श्लोक आर्या आणि ओंव्या अशा प्रकारची असून ती प्राय: सर्व मराठी भार्षेत आहे. ओंवीबद्ध असा याचा एकच माधवग्रंथ मात्र आहे. अनंतफंदीस श्रीपतफंदी अथवा सवाई फंदी व बापूफंदी या नांवाचे दोन पुत्र होते. सवाईफंदीहि कवि होता. याचे वंशज हल्लीं संगमनेरास आहेत. ( नवनीत ).

अनंतफंदीची वाणी राजजोश्यासारखी सुसंस्कृत नसली तरी ती प्रसादयुक्त व जोरकस आहे. त्याच्या कीर्तनाची सर्व महाराष्ट्रभर प्रसिद्धी होती. त्याच्या समकालीन शाहिरांचें मत त्याविषयीं उत्तम होतें हें होनाजी बाळाच्या फंदीवरील लावणीवरून उघड होतें.

फंदी अनंत कवनाचा सागर अजिंक्य ज्याचा हातखंडा ॥
चमत्कार चहुंकडे चालतो सृष्टीवर ज्याचा झेंडा !! ध्रु० ॥
    X    X    X    X
सरस्वती जिव्हाग्रिं अक्षयीं भंग नसे ज्याचा हरपा ।
कवन बहुत उदरामधिं भरलें फणस जसा मोठा कापा ॥

फंदीच्या माधवग्रंथांत सवाई माधवरावाच्या मृत्यूची कथा वर्णन केली आहे. याचे ६ अध्याय असून, ओंव्या ३६० आहेत. शिवाय या कवीच्या लावण्या व फटके अनेक आहेत. यास ऐतिहासिक कवि म्हणतां येईल. याच्या काव्यावरून तत्कालीन इतिहासावर बराच प्रकाश पडतो. खडर्याच्या लढाईवरचा फंदीचा पोवाडा प्रसिद्ध आहे. सवाई माधवराव, दुसरे बाजीराव, नाना फडणीस, होळकर, फत्तेसिंग गायकवाड वगैरे त्यावेळच्या थोर व्यक्तींवर फंदीनें फटके रचले होते. यानें हिंदुस्थानी लावण्याहि रचल्या होत्या.

अनंतफंदीचे वडील चिरंजीव श्रीपत उर्फ सवाई फंदी हेहि चांगले कवि होते. '' फंदी मूल '' हीं अक्षरें याच्या कवितेच्या शेवटीं आढळतात. यानें गायकवाडींत वर्षासन मिळविलें. सवाईफंदीचा रावबाजीवरचा पोवाडा सर्वांच्या तोंडी होता; त्यांत तत्कालीन दु:स्थिति, पेशव्यांचे दुर्गण चांगले रेखाटले आहेत.

उटया केशरी टिळा कस्तुरी कमालखानी हार गजरे ।
गहेनाजी बहेनाजी अक्षयीं जवळ पालखीच्या हुजरे ॥
जुनीं माणसें ती कणसाला महाग गैर त्याची बुज रे ।
चार चटारी भटारि हलके जाणुनि घे अलबत मुजरे ॥
    X    X    X    X
शाल्योदन मिष्टान्न भोगता सवा शेर ज्याचा सवता ।
चोविस वर्षे चैन भोगिली, राज्यक्रांति जाणुन नवता ॥ ध्रु० ॥
या फटक्यावरून कवीचा निर्भीडपणा व्यक्त होतो.
( सं. क. का. सू. अ. को. नवनीत; महाराष्ट्र कविचरित्र )