विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अगाखान - अगाखान पहिला :- (१८००-१८८१) हसनअल्ली शहा (जन्म इराणांत १८०० त ) याला जेव्हां तो मुंबईस ब्रिटिशराज्याच्या आश्रयाला प्रथम येऊन राहिला त्यावेळीं ''हिज हायनेस अगाखान '' ही पदवी देण्यात आली. त्याचा पूर्वज अल्ली - महंमद पैगंबराचा जामात - होता असें मानितात. अल्लीचा मुलगा हुसेन यानें इराणच्या एका राजकन्येशीं लग्न लाविलें होतें. तेव्हां अर्थातच अगाखाननें आपला सबंध इतिहास पूर्वकाळांतील इराणच्या राजघराण्यांशी जोडला. शिवाय त्याच्या पूर्वजांनी, ख्रिस्ती धर्मयुद्ध चालू असतां बेनिफतिमी लोकांचे खलिफ म्हणून अनेक वर्षे इजिप्तमध्यें राज्य केलें होतें. इराण सोडण्यापूर्वी बादशहा फत्तेअल्लीशहानें अगाखानला कमीन या मोठ्या व महत्त्वाच्या प्रांताचा सुभेदार नेमिलें होतें. त्याची तेथील कारकीर्द, चिकाटी, नियमितपणा, आणि उच्च राजकीय धोरण या दृष्टीने वाखाणण्याजोगी म्हणतां येईल. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनीं व शहाच्या मर्जीतल्या दरबारी लोकांनीं आतून कारस्थानें चालवून देशांत अंतःक्षोभ उत्पन्न केला होता, तरी पुष्कळ दिवसपर्यंत त्यानें शहाचा स्नेह व प्रीति संपादन केली होती. सरतेशेवटीं त्याच्यावरची शहाची मर्जी अजीबात खप्पा होऊन, स्वसंरक्षणासाठीं ब्रिटिश हद्दींत त्याला पळून यावें लागलें. रहावयास हिंदुस्थान पसंत करुन, त्यानें मुंबईला आपले ठाणें दिलें. त्यावेळी पहिलें अफगाण युद्ध जोरांत होतें. तेव्हा इराणहून अफगाणिस्थानांतून इकडे येतांना, ब्रिटिश सैन्याला उत्तम प्रकारची मदत करण्यास त्याला आयतीच संधि मिळाली; व अशा रीतीनें आपलें दैव त्यानें ब्रिटिशांच्या हातीं दिलें. नंतर कांहीं वर्षांनीं सिंधच्या मोहिमेंत तो असाच ब्रिटिशांच्या चांगला उपयोगी पडला. त्यावेळी सरहद्दीवरच्या जातींतील अनेकांचा तो गुरु असल्यानें नेपियरनें या जातीचा बंदोबस्त करण्याच्या कामीं अगाची मदत घेतली होती. या आपल्या मुसलमान स्नेह्याची नेपियर फार चहा करी व शौर्य आणि मुत्सद्दीगिरी या गुणांविषयी तो त्याला फार मान देई. उलट आगाखानानेंहि ब्रिटिश सरकारशीं एकनिष्ठ राहून नेपियरच्या स्नेहास व विश्वासास आपली पात्रता दर्शविली. तो जेव्हां हिंदुस्थानांत कायम राहूं लागला तेव्हां सरकारनें ब्रिटिशांच्या मुसलमानी प्रजेच्या मोठ्या इस्मायली संप्रदायाचा तो वरिष्ठ पुढारी असें कबूल करुन, ''हिज हायनेस'' ही पदवी व मोठें पेनशन त्याला बहाल केलें. त्या वेळेपासून तों मरेपर्यंत (१८८१ ) अगाखानानें ब्रिटिशांच्या छत्राखालीं मोठ्या शांततेनें काळ कंठिला व त्याचप्रमाणें आपल्या अनुयायांचीं धर्मकृत्यें पार पाडिली. त्याची धार्मिक सत्ता मानणारे लोक केवळ हिंदुस्थानांतच होते असें नव्हे तर, अफगाणिस्तान, खोरासान, इराण, अरबस्तान, मध्य आशिया आणि दूरचे सीरिया, मोरोक्को देश, येथें देखील त्याचे पुष्कळ अनुयायी होते. तो शेवटपर्यंत ब्रिटिश राज्याशीं पूर्णपणें एकनिष्ठ राहिला व सरहद्दीवरील जातींवर त्याचा मोठा वचक असल्यानें, वायव्यसरहद्दीवरच्या ब्रिटिशांच्या मोहिमांमा त्याचें अमोल्य सहाय्य मिळालें. हिंदुस्थानांत देखील मुसलमान लोक जेव्हां धार्मिक किंवा राजकीय स्वरुपाचे दंगे करीत तेव्हां त्यांना शांत करण्याचे कामीं आगाखानाचा उपयोग होत असे.
याच्या मृत्यूनंतर याचा वडील मुलगा अगाखान दुसरा याच्या अधिकारावर आला. त्यानें आपल्या वडिलांचा कित्ता इतका चांगला गिरविला कीं स्थानिक सरकारची त्याच्यावर मर्जी बसली व त्याला Knighthood of the Order of the Indian Empire ही मोठी पदवी मिळून मुंबईच्या कायदेकौन्सिलांत स्थान मिळालें.
अगाखान तिसरा (सुलतान महंमदशहा ) - हा दुसर्या अगाखानाचा एकुलता एक मुलगा, १८८५ मध्यें बापाच्या मरणानंतर आपल्या कुळाचा व त्याच्या उपासकांचा मुख्य झाला. याचा जन्म १८७७ त झाला व इराणच्या राजघराण्यांतल्या त्याच्या आईनें इस्माइलांच्या धर्मगुरुला अवश्य असें धार्मिक व पौरस्त्य शिक्षण त्याला दिलें. इतकेंच नव्हे तर त्याच्या बापाला व आजाला न मिळालेलें उत्तम युरोपीयन शिक्षणहि दिलें. या दुहेरी शिक्षणानें अगाखानाला आपल्या अनुयायांच्या धार्मिक व सामाजिक हितांकडे उत्तम प्रकारें लक्ष पुरविण्याची अंगीं पात्रता झाली. आपल्या अनुयायांना आशीर्वाद देण्याकरितां व त्यांच्यांतली भांडणे मिटवून त्यांना उपदेशानें व पैशानें मदत करण्याकरितां त्यानें दूरवर प्रवास केला. १८९७ सालीं व्हिक्टोरिया महाराणीकडून Knight Commander of the Indian Empire ही पदवी त्याला मिळाली, व त्याचप्रमाणें जर्मनीचा बादशहा, तुर्कस्थानचा सुलतान, इराणचा शहा इत्यादिकांकडून त्याच्या लोकहितार्थ कामगिरीबद्दल अशीच मान्यता मिळाली. पुन्हां ब्रिटिश सरकारकडून १९०२ मध्यें G.C.I.E. व १९११ मध्यें G.C.S.I. अशा पदव्या मिळून, यूरोपीय महायुद्धांतील त्याच्या कामगिरीबद्दल पहिल्या प्रतीच्या राजाचा दर्जा व ११ तोफांच्या सलामीचा मान त्याला मिळाला (अद्यापि हयात).