विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अटक जिल्हा - पंजाब प्रातांतील एक जिल्हा. क्षे. फ. ४०२२ चौ. मै. मर्यादा: प. व वा. सिंधू नदी, व त्याच्या पलीकडे वायव्य सरहद्दीवरील प्रांतांतील कोहात आणि पेशावर हे जिल्हे; ईशान्सेस त्याच प्रांतांतील हजारा जिल्हा; पूर्वेस रावळपिंडी जिल्हा; आग्नेयीस झेलम, द. शाहपूर, व नैऋत्येस मियानवाली हे जिल्हे. तलगंगचें पठार समुद्रसपाटीपासून १२०० फूट उंचीवर असल्यामुळें, तेथील हवा इतर भागापेक्षां थंड आहे. अटकचे डोंगर, जंडलचे वालुकामय उतार आणि नरर व मखदच्या लहान टेंकड्या येथें उन्हाळा फार कडक असतो, उष्ण वारे वाहतात व सूर्याचे किरण फार प्रखर असतात. वार्षिक पावसाचें मान सरासरी १७ ते २४ इंच असतें.

इ ति हा स - या जिल्ह्याचा व रावळपिंडी जिल्ह्याचा इतिहास जवळ जवळ एकच आहे. बुद्धांच्या वेळच्या अवशेषांपैकीं मुख्य हसन अब्दाल हें गांव, तक्षिला राजधानीच्या ताब्यांत होतें. ओहिंद जवळ गझनीच्या महंमुदानें आनंदपाळाचा पराभव केला होता.

लो क सं ख्या - १९२१ त, या जिल्ह्याची लो. सं. ५,१२,२४९ होती. लो. सं. पैकीं शें. ९० मुसलमान आहेत. पंजाबींच्या निरनिराळ्या जाती येथें आहेत. पुस्तू भाषा चालते.

शे त की - जिल्ह्याच्या उत्तरेकडे चाचचें सखल मैदान अतिशय सुपीक आहे. सोहान व इतर प्रवाहांच्या कांठच्या गांवांची जमीनहि सुपीक आहे. इतर ठिकाणची जमीन चांगली नाहीं. या जिल्ह्यांत वस्ती फार विरळ असल्यामुळें, पाऊस कमी झाला तरी दुष्काळ फारसा कधींच भासत नाहीं. येथील मुख्य पीक गहूं हें असून हरभरा, गळिताचीं धान्यें, बाजरी वगैरे पिकेंहि होतात. जोंधळा, बाजरी, वगैरे पिकें शरद ऋतूंत होतात. ह्या जिल्ह्यांत घोड्यांची पैदास चांगली होते.

अटक तालुक्यांत गरकब येथें संगमरवरी दगडाचे खलबत्ते व दुसर्‍या वस्तू होतात. काळाचित्त डोंगरांत दगडी कोळसा सांपडतो. फत्तेहजंग जवळ पेट्रोलियम काढण्याच्या पांच विहीरी आहेत.

व्या पा र व द ळ ण व ळ ण - या जिल्ह्यांत महत्त्वाचे कारखाने नाहींत. अटक तालुक्यांत रेशमी कशिद्याचें काम व सर्व ठिकाणीं देशी कापड होतें. याशिवाय, लुंगी, लांकडी कातकाम, लोखंडी भांडीं, कुलुपें, जीन,चटया, साबण, वगैरे जिन्नसा तयार होतात. हझारो येथें तपकीर होते; कापड, तांदूळ, मीठ, भांडी, वगैरे जिन्नस बाहेरून येतात.

नार्थवेस्टर्न रेलवेचा फांटा या जिल्ह्याच्या उत्तर भागांतून जातो. मध्य भागांतून कुशाळगड फांटा गेलेला आहे. पश्चिम भागांत, मारीअटक हा फांटा कँबेलापूरपासून मुलतानकडे गेलेला आहे. आगगाडीच्या मुख्य फांट्याजवळून गेलेला हसन अब्दाल-अबटाबाद हा रस्ता व रावळपिंडी कुशाळगड रस्ता, हे दोन पक्के रस्ते आहेत.

रा ज्य व्य व स्था - अटक, पिंडीघेब, फतेहजंग व तलगंग या तालुक्यांवर तहसीलदार व नायब तहसीलदार आहेत.

जिल्ह्याचें मुख्य ठिकाण कँबेलपूर हें असून तेथें डेप्युटी कमिशनर असतो.

पिंडीघेब व हझारो येथें मुनिसिपलिट्या आहेत. अटक ही 'नोटिफाइड' एरिया आहे. इतर ठिकाणचा कारभार जिल्हा बोर्डाकडे आहे.

१९०१ त, लो. सं. पकीं शें. ३.६ ( पुरुषांपैकीं शें. ६.४ व स्त्रियांपैकीं शें. ४) लोकांना लिहितां वाचतां येत होतें.