विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकालॅरेन्शिआ - हिच्या संबंधी रोमन लोकांत अशी एक दंतकथा आहे कीं, ही फास्ट्युलस या धनगराची बायको होती.  या धनगरानें, रोमशहराचे आद्यसंस्थापक रोम्युलस व रीमस हे टायबर नदींत वहात जात असतांना त्यांस वर काढून त्यांचा जीव वांचविला.  त्यानें ह्या मुलांस आपल्या बायकोच्या स्वाधीन केलें व तिनें त्यांचें आपल्या मुलांबरोबर संगोपन केलें.  ही बाई वाईट चालीची होती म्हणून तीस ''लांडगी '' असें म्हणत असत, व तिनें रोम्युलस व रीमस यांचे संगोपन केलें यावरुनच या दोघा मुलांस लांडगीनें वाढविलें अशी दंतकथा लोकांत प्रसिद्ध आहे.  दुसर्‍या एका दंतकथेप्रमाणे हें एका सुंदर मुलीचें नांव आहे.  ही मुलगी हर्क्युलीसनें द्यूतांत जिंकून मिळविली.  ह्या मुलीनें आपल्या जवळची सर्व संपत्ति रोमन लोकांस दिली म्हणून त्या लोकांनी हिच्या नांवानें वार्षिक उत्सव करण्याचा क्रम सुरु केला. कांहींच्या मतें ही भूदेवीची माता होती.