विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अथणी गांव :- मुंबई इलाखा बेळगांव जिल्हा  उ. अ. १६  ४०’ व पू. रे. ७५  ७’.  बेळगांवच्या ईशान्येस सुमारें ७० मैलांवर हा गांव आहे. लोकसंख्या (१९२१) १३५३८. जुना गांव पडका असून त्याचे उत्तरेकडील व दक्षिणेकडील दरवाजे अद्यापि पहावयास मिळतात. येथें दर रविवारी व सोमवारीं बाजार भरतो; व गुरांचा बाजार बराच चालतो. इ.स. १८५३ सालापासून येथें म्युनिसिपालिटी आहे. (इ. स. १८८२-८३ सालीं तिचें उत्पन्न १२५३० रुपये व खर्च १४०४० रुपये होता. ) येथें ५।६ जिनिंगचे कारखाने आहेत. मुख्य पीक कापूस, तसेंच जोंधळा वगैरे धान्यें होतात. गांवांत एक हायस्कूल, ए. व्ही. स्कूल, प्राथमिक शाळा आहेत. येथून विजापूरला मोटार जाते. येथें एक पडकी मातीची गढी असून तींत दोन वाडे आहेत. सिद्धेश्वर, अमृतेश्वर अशीं दोन जुनीं देवळें असून एक मशीदहि आहे.

इतिहास :- इ. स. १६३९ साली फ्रेंच प्रवासी मंदेलस्लो यानें अथनी शहर (Atteny city ) असा उल्लेख केला असून विजापुर आणि गोवा यांच्या दरम्यान मोठया व्यापाराचें ठिकाण आहे (Harris’Voyages II 129) असें वर्णन केलें आहे. इ. स. १६७० सालीं इंग्लिश भूगोलवेत्ता आजिल्वी यानें हा गांव विजापुरापासून दोन दिवसांचे रस्त्यावर असून व्यापाराचें ठिकाण आहे असें लिहून ठेवलें आहे (Atlas V 247).  इ. स. १६७५ सालीं इंग्रज प्रवासी फ्रायर यानें हुटणी (Huttaney) या नांवानें याचा उल्लेख केला आहे (East India and Persia 175).  इ. स. १६७९ सालीं मोंगल सेनापति दिलावरखान याच्या ताब्यांत हा गांव होता. हा गांव त्यानें शिवाजीपासून जिंकून लुटला होता. पितापुत्रांचें भांडण झाल्यामुळें संभाजी याचे पूर्वी कांहीं दिवस दिलावरखानाकडे येऊन राहिला होता. येथील लोकांस गुलाम म्हणून विकून टाकण्याची इच्छा दिलावरखानाची होती परंतु संभाजी या गोष्टीविरुद्ध होता. तथापि खानानें संभाजीच्या मताकडे दुर्लक्ष केलें, त्यावरुन संभाजी रागावून पुन्हां आपल्या बापास जाऊन मिळाला. यावेळीं इंग्लिशांच्या कारवार येथील वखारीशीं या गांवाचा बराच व्यवहार होता. इ. स. १७२० सालीं निजामानें हा गांव सर केला होता. परंतु आपला त्यावेळचा दोस्त कोल्हापुरचा राजा याचे हवाली केला; व त्यानें इ.स. १७३० सालीं सातार्‍याचे शाहु छत्रपतीस देऊन टाकला. इ. स. १७९२ सालीं कॅ. मूरनें हा महत्वाचा व्यापारी गांव होता, असें वर्णन केलें आहे. येथील दक्षिण व पश्चिम दरवाजे रास्त्यांनीं बांधले आहेत. इ.स. १८३९ सालीं निपाणीचा संस्थानिक निपुत्रिक मरण पावल्यामुळें हा गांव ब्रिटिश सरकारकडे आला. (बे. गॅ.).