विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकिमिनियन - अकिमेनिड किंवा हखामनी ह्या नांवांचें एक प्राचीन इराणी राजघराणें असून याचा इराणवर ख्रिस्त पूर्वी ५५८ ते इ.स. ३३० पर्यंत अंमल चालू होता. या घराण्याचा राजकीय इतिहास पूर्वी प्रस्तावना खंडांत व पुढें इराण या सदरखालीं दिलेला आहे. तथापि या राजघराण्याच्या उपासनामार्गाचें महत्व झरतुष्ट संप्रदायाच्या विकासाच्या अभ्यासास विशेष असल्यामुळें त्याच्या धार्मिक अंगांचें येथें विस्तारशः विवेचन करुं.
या राजांच्या धार्मिक कल्पनांसंबंधीं थोडी बहुत माहिती, ग्रीक अभिजात वाड्मयामध्यें, त्याचप्रमाणें बाबिलोनी, मिसरी व ग्रीक जुन्या अंकित लेखांमध्यें, व या राजांनी जुन्या इराणी भांषेंत बाबिलोनी व नूतन एलामी भाषांतरासहित लिहून ठेविलेल्या त्यांच्या स्वतःच्याच अंकित लेखामध्यें सांपडते. या घराण्यांतील ज्या राजाविषयीं या ठिकाणी विचार करावयाचा आहे, ते राजे म्हणजे सायरस, कंबायसिस, पहिला दरायस, पहिला क्सर्क्सीझ आणि दुसरा व तिसरा आर्टाक्सर्क्सीस हे होत.
(१) सा य र स दि ग्रे ट.- या राजाच्या धार्मिक कल्पनांचे ज्ञान होण्यास, झनोफन याची सायरो पिडिआ ही ऐतिहास अद्भुतकथा, जुना करार व बाबिलोन मधील शिलालेख इतकी सामुग्री आहे. सायरोपीडिआ ही कल्पित कथा असल्यामुळें तींतील माहितीचा उपयोग सारासार विचारानेंच केला पाहिजे. या कथेमध्ये सायरस राजा हा, झूस, हीलिऑस, जीआ, हेस्टिआ वगैरे अनेक ग्रीक देवतांप्रीत्यर्थ यज्ञ करीत असल्याचें वारंवार दाखविलें आहे. हिरोडोटस व स्ट्रेबो यांनीं आपल्या ग्रंथांत असे उल्लेख केले आहेत कीं, इराणी लोक सूर्य, व चंद्र, पृथ्वी, अग्नि, जल, वायु, अॅफ्रोडायटि नामक विवाहदेवता, झूस नामक आकाशदेवता इत्यादिकांची उपासना करतात. या दोन्ही विधानांचा मेळ घातला असतां असें दिसून येतें कीं, झेनोफन यानें उल्लेखिलेली सायरसची उपासना ही ज्याला धाकटा अवेस्ता म्हणून म्हणतात त्यांत दृग्गोचर होणार्या इराणी संस्कृतीशी जुळणारी एक प्रकारची शक्तींची उपासनाच होती. त्याच्याच या उपास्य देवता अहुरमझ्द, मिथ्र, अतर्ष (अग्नि) व अनहित याहून निःसंशय भिन्न नव्हत्या. या खेरीज ज्या दुसर्या कुलदेवतांची उपासना सायरस करीत असल्याचें दाखविलें आहे, त्या देवता मूलतः मृतलोकांचीं पिशाचें असून मागाहून त्याच नांवाच्या फ्रवषी नांवांच्या रक्षणकर्त्या देवता बनल्या. उलटपक्षीं सायरोपीडिआ या कथेमध्यें मरणोन्मुख सायरसनें मृत्यूनंतर आपल्या शरीराचें दफन करण्याविषयीं सांगितल्याचें म्हटलें आहे. तें झरथुष्टी चालीच्या अगदीं विरुद्ध आहे. स्ट्रेबोनें केलेल्या सायरसच्या थडग्याचें वर्णन वरील म्हणण्याची खात्रीच पटवीत असून पासार्गाडी येथें सांपडलेलें सायरसचें थडगें त्या वर्णनाबरहुकूम आहे. परंतु हिरोडोटेसनें असें म्हटलें आहें कीं, इराणी लोक मृतशरीरें गिधाडे, कुत्रीं इत्यादि प्राण्यांपुढें टाकून, नंतर त्यांजवर मेणाचा लेप करुन ती जमिनींत ठेवितात.
यानंतर बाबिलोनी अंकित लेखांविषयी विचार करतां तेथील सायरसच्या उपासना संप्रदायासंबंधानें दोन शिलालेखांमध्यें उल्लेख आलेला आढळतो. या दोन्ही उल्लेखांत सायरसनें म्हटलें आहे की, बाबिलोनमधील शेवटचा तद्देशीय राजा नबुनाइद यानें सुमेर व अक्कड काढून या नगरांतील देवता त्यांच्या देवालयांतून काढून आपल्या राजधानींत आणिल्या होत्या त्या मार्डुक देवतेचा प्रिय भक्त जो सायरस त्यानें स्वस्थळी नेल्या. या लेखांत उल्लेखिलेल्या मार्डुक व त्याचा पुत्र नबु या देवता म्हणजे अहुर्मझ्द व त्याचा पुत्र अतर्ष (अग्नि) यांचीच दुसरीं नांवें आहेत असें सायरस मानीत असे, अशी कल्पना कित्येकांनी काढिली आहे. परंतु या उपपत्तीमध्यें तथ्यांश नाहीं असें दुसर्या कांहींचें मत आहे. या तिन्ही प्रकारच्या साधनसामुग्रीमध्यें ग्रीक लेख जास्त विश्वसनीय आहेत. व त्यांवरुन सायरसची उपासना पद्धति उत्तर अवेस्तामध्यें आढळून येणार्या धर्माशीं पुष्कळ जुळती आहे, असें कळतें. तथापि, सायरस हा झरथुष्ट्राच्या नवीन संप्रदायाचा अनुयायी होता, असे म्हणण्यास थोडा देखील आधार नाहीं. सायरस या शब्दाचा खरा उच्चार कुरुस् असा असावा.
(२) कं बा या सि स - या राजाच्या धर्मसमजुतींचे उल्लेख असलेली सामुग्री अत्यंत थोडी आहे. हिरोडोटस यानें आमेसिस याचें प्रेत अग्नीमध्यें दहन करण्यानें अग्नीचा पवित्रपणा कमी होतो, अशा कंबायसिस राजाच्या मताचा उल्लेख केला आहे. इराणामध्यें व अवेस्ताच्या मूलगृहामध्यें मृत शरीराच्या योगानें अग्नीला दूषित करणें हा एक अक्षम्य गुन्हा समजला जातो. जरी सामान्यपणें कंबायसिस हा वेडा मनुष्य होता असें समजण्यांत येतें, तरी सेइस येथील सुप्रसिद्ध देव, नेइत याच्या देवालयाच्या बाबतींत कंबायसिसनें स्वीकारलेलें धोरण अत्यंत उदापणाचें व पूर्वीच्या सायरस राजासारखेंच होतें. परंतु एपिस देवतेप्रीत्यर्थ सोडलेल्या बैलास मारण्याचे कंबायसिसने केलेले कृत्य ही एक वेडाची लहर असून त्यामध्यें उपासना पद्धतीचा कांहीं एक संबंध नव्हता.
(३) प हि ला द रा य स - या राजाच्या धार्मिक मतांचे ज्ञान होण्यास मुख्य साधन म्हणजे बाबिलोनी व नूतन मीलाए भाषांतरांसहित असलेले या राजाचे जुन्या इराणी भाषेंतील शिलालेख व या शिलालेखांमध्यें अहुर्मझ्द या सर्वोत्तम देवाच्या कृपेनें आपणास राज्य मिळालें असे दरायसनें म्हटलें आहे. राज्यांतील सर्व वाईट गोष्टी अनृत (द्रौग) जन्य असून दरायसला त्याचें सामर्थ्य, त्याच्या मतें तो असत्यवादी नव्हता या गोष्टीमुळें, आलेलें होतें. सदरहू द्रौगाचें अवेस्तांतील द्रुजशीं साम्य आहे. सत्वशील मनुष्यानें अनुसरावयाच्या मार्गास सत्यपथ (त्याम रास्ताम ) असें म्हटलें असून व अशा प्रकारची कल्पना जुना करार, वेद व बौद्ध ग्रंथ यामध्येंहि आढळून येते. 'अर्शता ' नामक उपकारक देवता व 'दुशियारा' नामक दुष्ट देवता या दरायसच्या लेखांत जशा आढळतात तशाच उत्तर आवेस्तांतहि आढळून येतात. या राजाचें परकीय संप्रदायाबद्दलचें धोरण सायरसप्रमाणेंच अत्यंत उदार स्वरुपाचें होतें. राज्यारुढ झाल्यावर पुनर्घटना केली तेव्हां त्यानें गौमत यानें जमीनदोस्त केलेल्या अग्निगृहांचा पुनरुद्धार केला. तथापि दरायस हा जरी अहुर्मझ्द देवतेचा एकनिष्ठ भक्त होता तरी त्यावरुन तो कट्टा एकेश्वरवादी होता असें मात्र म्हणतां येणार नाहीं.
(४) प हि ला क्स र्क्सी झ - क्सर्क्सीझच्या धार्मिक मतांविषयींच्या ज्ञानाचें मुख्य साधन म्हटलें म्हणजे हिरोडोटस याचा ग्रंथ होय. त्यानें क्सर्क्सीझबद्दल असें म्हटलें आहे कीं ग्रीसवर स्वारी करीत असतांना तो जेव्हां हेलेस्पाँट या ठिकाणीं आला, तेव्हां त्यानें इलिअम येथील अॅथीनि देवतेस हजार बैल बळी दिले, व सूर्य आणि समुद्र या देवतांप्रीत्यर्थ हविर्दान केलें. त्याचप्रमाणें तो असेंहि म्हणतो कीं 'नउ वाटा', याठिकाणीं क्सर्क्सीझ राजानें नऊ ग्रीक मुलें व नऊ मुली बळी दिल्या, व इराणी लोकांमध्यें जिवंत पुरुन बळी देण्याची चाल होती. परंतु वरील ग्रीक इतिहासकाराच्या या म्हणण्यास दुसर्या कोणत्याच ठिकाणीं आधार मिळत नाहीं हे एक, व दुसरें मनुष्य जमिनींत पुरल्यानें पूज्य भूदेवतेस भ्रष्ट केल्यासारखें होत असल्यामुळें ही चाल इराणी धर्मसमजूतीच्या विरुद्ध दिसते. यामुळें हिराडोटसच्या उपर्युक्त माहितीवर भरंवसा ठेवतां येत नाहीं. एके ठिकाणीं क्सर्क्सीझच्या स्वारीबरोबर असलेल्या नऊ शुभ्र अश्वांकडून ओढिल्या जाणार्या झूस देवतेच्या रथाचा उल्लेख हिरोडोटस यानें केला असून व या रथाचा सारथी त्याबरोबर पायीं चालत असें असे तो म्हणतो. हा रथ म्हणजे स्वारीबरोबर येऊन राजास विजय मिळवून देणार्या अहुर्मझ्द या इराणी राष्ट्रीय देवतेचेंच देऊळ होय.
(५,६) दु स रा आ र्टा क्स र्क्सी झ ति स रा आ र्टा क्स र्क्सी झ - या दोन्ही राजांविषयींच्या माहितीचीं साधनें, एकाच दृष्टींनें फक्त महत्त्वाचीं आहेत. ही गोष्ट म्हणजे अहुर्मझ्द या देवतेखेरीज मिथ्र व अनहित या दोन नवीन देवांची नांवे या लेखांत दिसून येतात. या संबंधानें एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, प्लुटार्क हा इतिहासज्ञ जरी खर्या झरथुष्ट्र धर्माशीं अपरिचित नव्हता तरी त्यानें आर्टाक्सर्क्सीझ राजांच्या उपासनेसंबंधीं शिला लेखांत आलेल्या माहितीस पुष्टी दिली आहे.
या प्राचीन राजघराण्यासंबंधीची माहिती मध्यकालीन इराणी वाड्मयामध्यें बिलकुल आढळूं नये ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. पहिला आर्टाक्सर्क्सीझ याचा उल्लेख पेहलवी ग्रंथांमध्यें आर्देशिर या नांवानें आला असून त्यालाच ते स्पेंददादचा पुत्र बोहुमन म्हणतात. अशी उपपत्ति कांहीं विद्वानांनीं बसविली आहे. परंतु तिला बिलकुल आधार सांपडत नाहीं. झरथुष्ट्री आर्टाक्सर्क्सीझ हा स्पेंददादचा पुत्र होता, तर अकिमिनिअन आर्टाक्सर्क्सीझ हा क्सर्क्सीझपुत्र होता; अलबेरुणी यानें या दोन्ही व्यक्ती भिन्न होत असें सांगितलें आहे व तें बरोबरही आहे. शहानामा वगैरे ग्रंथांत या दोन्ही व्यक्ती एकच मानण्यांत आल्या आहेत, तें त्या दोहोंच्याहि आज्याचें नांव दरायस हेंच होतें त्यामुळे असलें पाहिजे. परंतु अवेस्ता व झंद या धर्मग्रंथांच्या दोन दोन हस्तलिखित प्रती राखून ठेवण्यास सांगणारा झरथुष्ट्राचा अनुयायी दरायसपुत्र दरायस हा, व अकिमिनिअन घराण्यांतील आर्सेसीझपुत्र तिसरा दरायस या दोन्ही व्यक्ती भिन्न होत.
वर दिलेल्या माहितीवरुन अकिमिनिअन राजे सूर्य, चंद्र इत्यादि इराणी देवतांनां मानीत होते व ग्रीस वगैरे परकीय देशांतील देवतांविषयींहि पूज्यभाव बाळगीत होते, तरी ते मुख्यतः अहुर्मझ्द या देवाचेच उपासक होते असें दिसून येतें. त्यांच्या दृष्टीनें अहर्मझ्द हें त्यांचे मुख्य राष्ट्रीय दैवत असून इतर सूर्यचंद्रादि देवता त्याच्या खालोखाल होत. यास विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे जुन्या इराणी अंकितलेखांचें गाथांपेक्षां ज्यांत झरथुष्ट्रपूर्व निसर्गोपासना पुन्हा डोकाऊं लागते त्या उत्तर अवेस्ताशींच अधिक आहे. त्याचप्रमाणें त्यांत व असुरी बाबिलोनी ग्रंथामध्यें पुष्कळ साम्यें आढळून येतात. या सर्व गोष्टींचा विचार करतां अकिमिनिअन राजे हे झरथुष्ट्रपंथी नसून मझ्दयस्नपंथी होते असें अनुमान निघतें.