विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजातशत्रु - ( अजमासें ख्रि. पू. ५५४ - ५२७ ). - हा शैशुनाग घराण्यांतील सहावा राजा सुमारें ख्रि. पू. ५५४ मध्यें मगधाच्या गादीवर बसला ( बुद्धोत्तर जग पृ. १६६; १७१-२ व २४३ पहा ). याचीं कूणिक किंवा कूणिय अशीं नामांतरें आहेत.हा गादीवर कसा आला यासंबंधीं बराच मतभेद आहे. याचा पिता बिंबिसार यानें वृद्धापकालीं राज्य आपल्या पुत्राच्या (अजातशत्रुच्या ) स्वाधीन केलें असें जैन दंतकथा म्हणते, तर अजातशत्रुला गादीवर केव्हां बसेन अशी उत्कंठा लागून त्यानें पित्याचा वध केला असें बौद्ध व ब्रह्मी दंतकथा प्रतिपादन करतात. पुराण बौद्धकथांत हें कृत्य गौतमबुद्धाचा शालक जो देवदत्त त्याच्या चिथावणीवरून झालें असें सांगितलेलें आढळतें [र्‍हीस डेव्हिड्स, बुद्धिस्टिक इंडिया]. अखेरी अखेरीस व्हि. स्मिथचें अजातशत्रुच्या पितृवधाची हकीकत बनावट असावी असें मत झालें होतें [ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया पहा]. बिंबिसाराच्या कारकीर्दीत वर्धमान महावीर व गौतमबुद्ध हे दोन महान धर्मसंस्थापक मगधदेशांत स्वमतप्रसार करीत होते. महावीर अजातशत्रूच्या आईचा एक जवळचा आप्‍त होता. तो व गौतमबुद्ध हे दोघेहि अजातशत्रूच्या कारकीर्दींतच निवर्तलेले दिसतात. अजातशत्रूची व गौतमबुद्धाची एकदां मुलाखत झाली असावी. सामञ्ञाफल सुत्तांत या भेटीची कथा आहे; त्यांत अजातशत्रूनें आपल्या पितृघाताच्या अपराधाबद्दल पश्चात्ताप दर्शवून बुद्धावर आपली असलेली भक्ति व्यक्त केल्यावरून, गौतमानें त्याला क्षमा केली असे वर्णन आहे. मर्हुत स्तूपावर या प्रसंगाचें चित्र आहे. [ बुद्धोत्तर जग पृ. १४७ पहा].

कोसलराजाची बहीण अजातशत्रूची सावत्र आई असून, नवर्‍याचा अमानुषपणें वध झालेला पाहून ती साध्वी दु:खातिशयानें मरण पावली. तेव्हां कोसल राजा अजातशत्रूवर चालून आला. पुष्कळ दिवस लढाई चालून शेवटीं मगध राजानें कोसलावर मात केली; व कोसल राजकन्येचें पाणीग्रहण करून त्याच्याशीं तह केला [ व्हि. स्मिथ,अर्ली हिस्टरी. र्‍हीस डेव्हिड्सनें थोडी निराळी हकीकत दिली आहे-बुद्धात्तर जग पृ. १६८ पहा].

या जयानें अजातशत्रूची आकांक्षा न शमतां, त्यानें गंगेच्या उत्तरेकडील, हल्लीं ज्याला तिरहूत म्हणतात त्या लिच्छवींच्या राज्यावर स्वारी केली. या देशाची राजधानी वैशाली असून तेथील राजकन्या अजातशत्रूची आईच होती. तरी अजातानें आपल्या आजोबाचा मुलूख आपल्या हस्तगत केला. पुढें त्यानें हिमालयाच्या पायथ्यापर्यंतचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला व अशा रीतीनें गंगा व हिमालय यांमधील भाग मगधराजाच्या अंकित करून सोडला. यानें लिच्छवींनां अटकाव करण्याकरितां शोणतीराच्या उत्तरेस त्याच्या गंगेशीं होणार्‍या संगमाजवळ पाटली गांवीं एक किल्ला बांधिला व पुढें याचा नातू उदय यानें पाटली नगराची स्थापना केली. पुढें हें नगर कुसुमपुर, पुष्पपुर किंवा पाटलिपुत्र या नांवांनीं प्रसिद्धीस आलें व मौर्यांच्या अमदानींत मगधाचेंच नव्हे तर अखिल भारताचें केंद्रस्थान बनलें. या नगररचनेचें वर्णन वायुपुराणांत आहे. याचीं तीनहि नांवें पुष्पवाचकच आहेत हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.

अजातशत्रु सुमारें ख्रि. पू. ५२७ त वारला.

वरील अजातशत्रुचा काळ व्हि. स्मिथच्या आधारें दिला आहे. परंतु स्वत: स्मिथलाहि हा काळ समाधानकारक वाटत नाहीं. प्रथम त्यानें ख्रि. पू. ५०५-४७५ हा स्थूलमानानें अजातशत्रूचा काळ व ख्रि. पू. ४८७ किंवा ४८६ हा बुद्धनिर्वाणाचा काळ गृहीत धरला होता. (अर्ली हिस्टरी, १९१४ सालची आवृत्ति पहा). परंतु या सनांची ख्रि. पू. ५२७ हें महावीराचें निर्वाणाचें परंपरागत साल व त्याची आणि अजातशत्रुची भेट या गोष्टींशीं त्यास संगति जुळवितां न आल्यामुळें महावीर हा बिंबिसाराच्या कारकार्दीतच वारला असावा असें म्हणून त्यानें आपली सुटका करून घेतली.

यानंतर खारवेलच्या अंकितलेखाच्या वाचनामुळें सर्वच शैशुनागांचा काळ मागें ढकलणें प्राप्‍त होऊन अजातशत्रूच्या कारकीर्दीस ख्रि. पू. ५५४-५२७ हा काल द्यावा लागला. परंतु या कालाशीहि महावीर व बुद्ध हे बिंबिसार व अजात-शत्रु यांचे समकालीन होते व ते अजातशत्रूच्या कारकीर्दीत मरण पावले ही परंपरागत समजूत नीट जुळेना. तेव्हां या चक्रव्यूहांतून बाहेर पडण्याच्या भानगडींत न पडतां महावीर निर्वाणाचें साल ख्रि. पू. ४७७ असावें या याकोबीच्या मताच्या उल्लेखानें एकंदर प्रश्न अधिकच गूढ करून, यासंबंधाचा कालनिर्णय समाधानकारक झालेला नाहीं असे म्हणून तो मोकळा होतो.

बिहार आणि ओरिसाच्या रिसर्च ( संशोधन ) सोसायटी (मंडळा) च्या जर्नलच्या डिसेंबर १९१९ च्या अंकांत रा. के. पी. जयस्वाल यांनी राजा अजातशत्रूची मूर्ति संशोधल्याचें वृत्त दिलें आहे [ मॉडर्न रिव्ह्यु फेब्रुवारी १९२०] . पूर्वी ही यक्षाची मूर्ति म्हणून समजत. पण त्या मूर्तीच्या आसनावर एक लेख आहे त्यांत, सेनि [ श्रेणि ] अज [ त ] शत्रु, कुणिक सेवासिनगो ( शिशुनाग ) मगधनम् राज, इत्यादि अक्षरें स्पष्ट आहेत त्यावरून शंका घेण्याचें कारणच नाहीं असें जयस्वाल यांनीं दाखविलें आहे.