विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अतरसुंबा पोटविभाग - याच्या उत्तरेस देहगांव तालुका; पूर्व व दक्षिण दिशांस खेडा तालुक्याचा कांहीं भाग; व पश्चिमेस देहगांव पोटविभाग. याशिवाय या विभागांतील पुष्कळ गांवें ब्रिटिश हद्दींत आहेत.

हा प्रदेश डोंगराळ, अरण्यमय व रमणीय असा आहे. १८७९-८० सालीं पावसाची सरासरी २५.६० इंच होती. वात्रक, मागम, धम्मी, वाराणशी आणि मोहोर या नद्या यांतून वाहातात. पृष्ठभागची जमीन बहुतेक रेताड आहे तरी कांहीं ठिकाणीं काळी जमीन दिसते. वस्ती बहुतेक कोळयांची आहे. १९११ सालीं लोकसंख्या २०,२२२ होती.