विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अझर बैजन - अझर बैजनच्या लोकराज्याला १९१७ पर्यंत अस्तित्व नव्हतें. रशियाची बादशाही सत्ता नष्ट झाल्यावर काकेशिया पर्वतापलीकडील कांहीं रशियन प्रांतांनीं स्वतंत्र राज्यें स्थापलीं, त्यांपैकीं हें एक होय. अझर बैजनला पूर्वीचा राष्ट्रीय इतिहास मुळींच नाहीं. फार काय पण या लोकांना आपण कोणत्या मानववंशांतले आहोंत याची जाणीव नव्हती. बाकू व एलिसाव्हेटोपोल हे दोन प्रांत मिळून १९१७ मध्यें अझर बैजन लोकराज्य बनलें. हा प्रदेश १८१३ मध्यें गुलिस्तानच्या तहानें इराणाकडून रशियाकडे गेला. अझरबैजन हें नांवहि रशियन अमलाखालीं लुप्‍त झालें होतें तें लोकराज्य स्थापन झाल्यावर पुन्हा धारण करण्यांत आलें. हा प्रदेश कुरु व आरास ह्या दोन नद्यांमध्यें आहे. तो चांगला सुपीक असून तेलाच्या खाणींनी युक्त आहे. त्यांतील दोन तृतीयांश लोक तार्तरवंशांतल्या एक जातीचे आहेत. ते शिया पंथाचे आहेत; पण अ‍ॅनाटोलियांतील सुनी लोकांशीं त्यांचा चांगला स्नेहभाव आहे. एकंदर लोकसंख्या २६,००,००० असून त्यांपैकीं १७,४०,००० मुसुलमान, ५,४०,००० आर्मेनियन व २,३०,००० रशियन आहेत, व बाकी इतर युरोपियन वगैरे आहेत. सरहद्दीबद्दल अझरबैजनचा वाद एरिव्हॉन व जॉर्जिया या दोन शेजारच्या लोकराज्यांबरोबर चालू आहे. अझर-बैजनचें अजमासें क्षेत्रफळ ३२,००० चौरस मैल आहे.

येथील मुख्य धंदा तेल ( पेट्रोलियम ) काढून, तयार करून परदेशी पाठविणें हा आहे. बाकू शहराच्या-अझरबैजनची राजधानी-आसपास तेलाच्या पुष्कळ खाणी सांपडल्या आहेत. त्यामुळें बाकू शहराला मोठें राजकीय व व्यापारी महत्त्व आलें आहे. हें शहर रेल्वेनीं मास्को, अफगाण सरहद्द, पामीर, इराणांतील एरिव्हान व टाब्रिझ शहरें, तुर्कस्थानांतील एर्झेरूम आणि काळ्या समुद्रावरील बाटूम शहराला जोडलें गेलें आहे. यांत तेलाच्या खाणी असल्यामुळें जागतिक युद्धाच्या वेळीं या भागांत महत्त्वाच्या हालचाली झाल्या.

तरुण तुर्क पक्षाच्या सार्वमहंमदीयसंघटनेच्या धोरणाचा मध्य आशिया व हिंदुस्थान यांच्याप्रमाणें अझर बैजनवरहि फार परिणाम झाला. पण त्याहूनहि अधिक परिणाम रशियांतील बोल्शेव्हिक राज्याचा झाला. तुर्की व रशियन धोरणांच्या परस्पर संघातांनीं अझर बैजनचा अलीकडील इतिहास बराचसा बनला आहे.

इ ति हा स - अझर बैजनचा उल्लख इराणांतील सोराब व रुस्तुम वगैरे पौराणिक कथांतून एक प्रांत म्हणून येतो. अझर बैजनचा स्वतंत्र राष्ट्र या नात्यानें इतिहास २० सप्टेंबर १९१७ पासून सुरू होतो. १९१७ मार्च मध्यें रशियाचा झार पदच्युत होऊन नवें तात्पुरतें सरकार स्थापन झालें व त्यानें स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाचा पुकारा केला. त्याच वर्षाच्या सप्टेंबरांत वोल्शेव्हीक लोकशाही रशियांत स्थापन झाली. या धामधुमीचा फायदा घेऊन ट्रॅन्सकाकेशियन लोकांच्या कौन्सिलनें टिफ्लिस येथें सभा भरवून आपलें संयुक्त लोकराज्य जाहीर केलें. परंतु जॉर्जियन व आर्मेनियन ख्रिस्ती आणि अझर बैजनचे तार्तर मुसुलमान यांचें जमेना म्हणून त्यांचीं लहानलहान राज्यें बनून अझरबैजन तुर्कांशी, आर्मेनिया रशियाशीं, व जॉर्जिया जर्मनीशीं स्नेहसंबंध जोडूं लागला. बाकू व आसपासच्या प्रदेशावर बोल्शेव्हीक सरकारची सत्ता स्थापन झाली होती. तेथील रशियन व आर्मेनियन लोकांनीं तुर्की मुसुलमानांना तेथून हांकून लावण्याचा व कत्तली करण्याचा उपक्रम केला. या अंतस्थ फाटाफूटीमुळें १९१८ मे मध्यें संयुक्त लोकराज्य मोडून जॉर्जिया व अझरबैजन यांनीं प्रत्येकीं स्वतंत्र लोकराज्य स्थापलें. तुर्कस्थाननें सार्वमहंमदीय धोरणानुसार बाकू घेण्याची व मध्य आशियांत शिरण्याची तयारी चालविली. त्यांना विरोध करण्याकरितां बाकू येथील रूसो-आर्मे-नियन सैन्याला मदत म्हणून मेसापोटेमियांतून जनरल डनस्टर व्हिलच्या हाताखालीं ब्रिटिश सैन्य पाठविण्यांत आलें. लवकरच जागतिक युद्ध तहकुबीच्या तहानें थांबल्यावर तुर्की व जर्मन सैन्य या भागांतून निघून गेलें व ब्रिटिश सैन्य तेथें शिरलें. तुर्की सैन्य बाकू शहर सोडून गेल्यावर अझरबैजनच्या सरकारनें तें शहर आपल्या ताब्यांत घेतलें. तेथें सुव्यवस्थित राज्य-कारभार चालविण्याकरितां ब्रिटिश अधिकार्‍यांनीं अझरबैजनच्या अननुभवी लोकांस तेलाच्या खाणी चालविणें, बोटी बांधणे, स्टेट बँक चालविणें, पोस्ट व तार खात्याची व्यवस्था करणें, पोलीस व न्यायखातें व्यवस्थित ठेवणें वगैरे अनेक बाबतींत मदत केली. त्यामुळें या लोकराज्यामध्यें शांतता व सुव्यवस्था स्थापन झाली. पण १९१९ आगष्टमध्यें ब्रिटिश सैन्य तेथून काढून घेण्यांत आल्यावर अझरबैजनच्या राज्यकारभारांत गोंधळ माजला.

१९१९ जानेवारीमध्यें पॅरिस येथे भरलेल्या तह परिषदेनें कॉकेशियन प्रदेशाकडे बरेंच लक्ष पुरविलें, पण तेथील लोकराज्यांनीं सरहद्दीचा तंटा आपसांत मिटवावा असें ठरवून प्रकरण युद्धावर येऊं नये म्हणून तेथें एक हायकमिशनर नेमिला. बाटूम जॉर्जियाला देण्यांत आलें. पण सेव्हर्सच्या तहामुळें तुर्की राष्ट्रीय चळवळ अ‍ॅनाटोलियांत फार जोरांत येऊन त्याचा अझरबैजनवर परिणाम झाला. तुर्की राष्ट्र व रशियन बोल्शेव्हीक या दोघांना दोस्तराष्ट्रांकडून विरोध होत असल्यामुळें ते दोघे कांहीं काळ एक झाले व दोस्तांच्या हातून हा मुलूख परत घेण्याची खटपट त्यांनीं चालविली. रशियानें १९२० मध्यें अझरबैजनचें स्वतंत्र लोकराज्य नष्ट करून तेथें सोव्हिएट सरकार स्थापलें. पुढें तेथल्या तार्तर लोकांनीं बंड केल्यामुळें १५००० तार्तर लोकांची बोल्शेव्हिकांनीं कत्तल केली. पुढें तुर्कस्थान व रशिया यांनीं मिळून जॉर्जिया व एरिव्हान हीं स्वतंत्र लोकराज्यें नष्ट करून तेथें सोव्हिएट लोकराज्यें स्थापलीं. नंतर तुर्कस्तानला अर्दहान व कार्स हे प्रांत आणि आर्मेनियाचा कांहीं भाग मिळाला, व रशियानें ट्रान्सकाकेशियांतील आपला पूर्वीचा बहुतेक मुलुख परत ताब्यांत घेतला; आणि अझर-बैजन, जार्जिया व एरिव्हान हीं कांहीं काळ स्वतंत्र बनलेली राष्ट्रें नामशेष झालीं.