विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनकापल्ली :- मद्रास इलाखा विजयापट्टम जिल्ह्याची नैऋत्येकडील तहशील. उ. अ. १७० २९' ते १७० ५५' व पू. रे. ८२० ५७' ते ८३० १५' क्षेत्रफळ २९७ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें एक लक्ष पासष्ट हजार. अनकापल्ली गांव व १४३ खेडीं या तहशिलींत आहेत. इ. स. १९०३-४ मध्यें एकंदर उत्पन्न १२२०००. तहशिलीचा उत्तरेकडील प्रदेश फार सुपीक असून तांदुळ व ऊंस इत्यादि फायदेशीर पिकें चांगलीं पिकतात. या तहशिलींत फक्त जमीनदार्या आहेत. गोडे घराणें, कासीमकोट, विजयानगरम् आणि चिर्पुरपल्ली या जमिनदार्या मिळून ही तहशील झाली आहे. कासीमकोट जमीनदारी ही पूर्वी चिकेकोल सरकारची फौजदारी होती. व इ. स. १७९४ ते १८०२ पर्यंत कासीमकोठ हें एका जिल्ह्याचें मुख्य ठिकाण होतें. इ. स. १८०२ नंतर याचा विजयानगर जिल्ह्यांत समावेश करण्यांत आला. (इं. गॅ. ५).