विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडयाळ :- तहशील भंडारा, जिल्हा भंडार. भंडाऱ्याच्या दक्षिणेस पवनीरस्त्यावर १४ मैलांवर हें एक मोठें खेडेगांव आहे. क्षेत्रफळ १३०० एकर. लोकसंख्या सुमारे तीन हजार.

येथें एक महावीर अथवा हनुमानाचें जुनें देऊळ असून मूर्ति फार मोठी आहे व ती स्वयंभू आहे असा समज आहे. कांहीं वर्षांपूर्वी खोदकाम चालू असतांना बाहेर काढलेली एक जैनांच्या पारसनाथ देवाची पाषाणमूर्ति आहे. येथें पांच सहा चांगले तलाव असून गांडळी लोकांची बरीच वस्ती आहे. रेशमी कांठाचीं धोतरें वगैरे काम, बांबूच्या टोपल्या व चटया येथें तयार होतात. येथें पोलिस ठाणें, प्राथमिक शिक्षणाची शाळा, टपालकचेरी व तपासणी अधिकार्‍यांकरतां बांधलेलें एक लहानसें घर आहे. आरोग्यरक्षणाकरितां या ठिकाणीं एक लहान रक्कम उभारण्यांत येते.