विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकबराबाद - अंतर्वेदीतील एक महाल. पूर्वी हा एक सुभा म्हणून समजला जात असे. अकबराबादेची सुभेदारी मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे यांच्यामार्फत दिल्लीचा पातशहा आणि मराठे यांमध्यें झालेल्या करारनाम्यांत मराठयांस मिळाली. (रा. खं. १. १-४ ).
१६७१ शकांत अकबराबाद वगैरे प्रांतांची सुभेदारी व फौजदारी शिंदेहोळकर यांकडे दिल्याचा बाळाजी बाजीरावाबरोबर करार झाला. (रा. खं.६. २०० .३०० ). व पुढें शिंदे होळकरांनीं तेथील कमावीसदार नेमलें. १६७३ जेष्ठ. – शिंदेहोळकरांनीं अकबराबाद वगैरे अंतरवेदींतील दहा महाल दामोदर महादेव व पुरुषोत्तम महादेव यांस कमाविशीस दिले. (रा.खं. ६-२२६-३२३).
यानंतर मराठी दप्तरांतील या स्थलाविषयींचे उल्लेख येणें प्रमाणें :- महाराजा चेतसिंहानें फा॥ व॥ ६ शके १७१८ रोजीं दौलतराव शिंद्याला धाडलेल्या पत्रांत ''इन दिनौमो फौज सरकारकी दतीआसें अकबराबादको गई.'' असा मजकुर आहे. ( रा.खं.१०.४४२.३५६ ) किल्ले अकबराबाद राजश्री जगन्नाथराम याचे स्वाधीन केला आहे असा मजकूर शके १७१८ च्या एका पत्रांत सापडतो. (रा.खं.१०, ४६४,३७० ).