विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकराणि - ( परगणा ) - हा परगणा म्हणजे पश्चिम खानदेशांत तापी व नर्मदा या नद्यांमधील सातपुडा पर्वताचा पठार प्रदेश होय. याच्या उत्तरेस नर्मदानदी, पूर्वेस बारवानी संस्थान व तुरणमाल, दक्षिणेस सुलतानपूर व कुकरमुंड तालुके, व पश्चिमेस काठी संस्थान आहे. १८७२ मध्यें येथील लोकसंख्या सुमारें १५ हजार होती व सुपीक जमीन सुमारें पंधरा हजार एकर आहे. या प्रदेशांत १७२ गांवे असून त्यांपैकीं सतरा ओसाड आहेत. या परगण्याचा सर्व प्रदेश डोंगराळ असून १६०० ते २५०० फूट उंचीवर आहे. यांतील कांहीं गांव चांगले श्रीमंत असून जीवंत झर्यांच्या पाण्याचा पुरवठा पुष्कळ आहे. मका व इतर धान्यांची पिकें चांगलीं होतात. विशेष उंच असलेल्या प्रदेशांत दाट जंगल असून त्यांतून जळाऊ लांकडाचा पुरवठा पुष्कळ होतो व शिवाय त्या जंगलांत अनेक प्रकारच्या औषधी व तसेच रंग तयार करण्यास उपयोगी अशा वनस्पती सांपडतात. येथील सृष्टिसौंदर्यहि विविध व उठावदार आहे. बहुतेक गांवांभोवतीं आंब्याच्या व मोहाच्या झाडांची दाट झाडी आहे. नदीकांठचा प्रदेश नेहमी हिरवाळ असतो व मधूनमधून शिंदीचीं वगैरे झाडें आहेत.
या डोंगराळ प्रदेशांतला तुरणमाळ हा सर्वांत महत्त्वाचा डोंगर आहे. तो पूर्वेच्या बाजूला ४०० फुट उंच आहे. त्याशिवाय कोमल, उदद, अष्टंभ वगैरे डोंगर आहेत. या प्रदेशांतील दगडांत रुपें, तांबे व लोखंड या धातूंचे रज आढळतात. या प्रदेशांत पाण्याचा पुरवठा भरपूर आहे. विहीरी, नद्या व जिवंत ओढे यांनां उन्हाळ्यांतहि पाणी असतें. पण कांहीं ठिकाणचें पाणी दोषी हिंवताप उत्पन्न करणारें आहे. येथील जमीन बरीच खडकाळ असल्यामुळें गहुं, हरभरा वगैरे धान्यें होत नाहींत. हा प्रदेश उंच असल्यामुळें येथील हवा सौम्य असते हिवाळ्यांत मात्र थंडी कडक पडून कधींकधीं विहिरीओढ्यांचे पाणी गोठतें. पावसाळ्यांत पाऊसहि खूप पडतो. येथील लोक मेहनती व उद्योगी असून लोकसंख्या वाढती आहे. येथें मुख्यतः वारली व पावरा जातीचे लोक असून त्यांपैकीं पावरा ही जात रजपूतवंशीय असावी. ह्या जातीचे लोक शेतकीच्या कामांत वारली वगैरे भिल्ल जातींपेक्षां अधिक कुशल आहेत. ते जरा बुजरे असले तरी थोड्या परिचयानेंच मोठ्या बोलक्या व आनंदी वृत्तीनें वागू लागतात. तसेंच ते मोठे प्रामाणिक असतात. सर्व लोक शेती करतात व पुष्कळसे गायम्हशींचे कळपहि पाळतात; बकरी कोंबडीं व बदकेंहि पाळतात. मेंढ्या व डुकरें कोणी पाळीत नाहीं. बाजरी, ज्वारी व नागली हीं मुख्य पीकें होतात.
खानदेशांतून अकराणी परगण्यांत जाण्यास पांच घाटमार्ग आहेत. त्यांपैकीं शाहाद्याकडून गेल्यावर लागणारा नवागांव घाटरस्ता बैल घोडे वगैरे जाण्यासारखा सोपा आहे. बाकीचे केवळ पायरस्ते आहेत, व एक दोन फारच अवघड मार्ग आहेत. अकराणी परगण्यांतून धान्य, मोहाचीं फुलें, मध, मधमाशांचे मेण, लाख, डींक व राळ या पदार्थांची निर्गत पुष्कळ होते.
या परगण्याचा इतिहास फारसा उपलब्ध नाहीं. धडगांवपर्यंतचा मुलूख खानदेश येथील मुसलमानी राजांच्या ताब्यांत होता. त्याच्या उत्तरेकडील नर्मदा नदीपर्यंतचा प्रदेश या डोंगराळ मुलुखांतल्या स्थानिक अधिपतींच्याच ताब्यांत असे. १७०० नंतर हा प्रदेश धुशवई येथील राण्यांच्या ताब्यांत गेला. त्यापैकी राणा गुमानसिंग यांनें अकराणी किल्ला बांधला. चार कारकिर्दीनंतर या घराण्याचा निर्वंश होऊन या मुलुखांत बेबंदशाही माजली. नंतर मतवारचा राणा भाऊसिंग यानें या परगण्यावर राज्य स्थापलें व रोशमल किल्ला ( हल्लीं पडला आहे) बांधला. या घराण्यानें १८१८ पर्यंत राज्य केल्यानंतर ब्रिटिश सरकारनें त्या घराण्याला रु. २८६८ पेन्शन ठरवून सर्व मुलुख खालसा केला. तथापि या राजघराण्याचा मान मोठा असून त्याचा बडोद्याचे गायकवाड व छोटा उदेपूरचे राणे यांच्याशी शरीर संबंध झालेले आहेत.