विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकॅडमी - अक्याडमी (विद्यापीठ अथवा सरस्वतीमंदिर) या शब्दाची व्युत्पत्ति फार मनोरंजक आहे. हा शब्द ग्रीक वीर अकॅडीमस याच्या नांवानें असलेल्या बागेवरुन प्रचारांत आला. ही बाग अथेन्स शहराजवळ सुमारें एका मैलावर आहे. या बागेंत प्लेटोनें ५० वर्षे आपल्या अनुयायांस तत्त्वज्ञान शिकविलें म्हणून अकॅडमी याचा अर्थ विद्यापीठ असा झाला आहे.  व लक्षणेनें प्लेटोच्या तत्त्वज्ञानास अकॅडमिक पंथाचें तत्त्वज्ञान असें नांव पडलें आहे.  असल्या प्रकारचीं विद्यापीठें नऊशें वर्षे अथेन्स देशांत अस्तित्वांत व भरभराटींत होतीं.