विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकबरपुर - तहशील. संयुक्त प्रांत. फैझाबाद जिल्ह्यांतील तहशील.  उ. अ.२६' १५' ते २६ ३५' पू.रे. ८२ १३' ते ८२' ५४ क्षेत्रफळ ५३७ चौरस मैल.  लोकसंख्या सुमारें तीन लक्ष पंचेचाळीस हजार. हींत अकबरपूर, मझारा आणि सुरहुरपुर असे तीन परगणे आहेत.  हींत तीन मोठीं गांवें व ८५४ खेडीं आहेत.

एकंदर उत्पन्न ५२४०००, जमिनीचें उत्पन्न ४५१०००, कराचें उत्पन्न ७३०००. हींत दलदली व क्षार आलेली जमीन पुष्कळ आहे. या तालुक्याचे मुख्य ठिकाण अकबरपूर हें आहें.

अ क ब र पू र गां व - उ.अ.२६. २६ पू.रे.८२.३२ फैझाबाद जिल्ह्यांतील तालुक्याचें गांव हें औध रोहिलखंड रेलवेचें स्टेशन आहे.  लोकसंख्या सुमारें साडेसात हजार.  गांवांत एका किल्ल्याचे अवशेष असून आंत एक प्रेक्षणीय मशिद आहे.  नदीवर एक मोठा पूल बांधलेला आहे.  दोन्ही कामें अकबराच्या कारकीर्दीत कोणी मोहसीन खान यानें केलीं आहेत. धान्याचा व कातड्याचा व्यापार येथें बराच चालतो. (इं.गॅ.५) या गांवाचा मराठ्यांच्या इतिहासाशीं संबंध राघोबादादा यांच्या उत्तरेकडील मोहिमेंत व तीपूर्वीच्या राजकारणांत येतो.  अकबरपूर वगैरे ठिकाणचे जमीनदार गढ्या बळकावून बसले, व नबाबास सामील झाले.  त्यांनीं पुन्हा गढ्या खालीं करुन मराठे सरकारकडे रुजू व्हावें म्हणून प्रयत्‍न मल्हारजी होळकरामार्फत करण्यांत आला. ( राजवाडे खं.६, पृ. १६६, २७२). या प्रयत्‍नाचा परिणाम निश्चिमपणें ठाऊक नाहीं.  १७५७ सालीं आक्टोबर महिन्यांत राघोबादादास दिल्लीहून कूच करुन अकबरपुरापर्यंत ससैन्य जावें लागलें होतें हें खरें (राजवाडे खं.१. पृ. १००, १७५).