विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंगहर्ष मात्ररात :- हा नरेंन्द्रवर्धनाचा मुलगा असून यानें ' तापसवत्सराजचरित्र ' नांवाचें नाटक लिहिलें. आनंदवर्धन व त्याचा टीकाकार अभिनवगुप्त यांच्या ग्रंथांत या नाटकाचें नांव आलेलें आहे. ( पिशेल Z. D. M. G. 39. p. 315 ).

आनंदवर्धनाचा काल नवव्या शतकाचा उत्तरार्ध हा आहे. त्यावरून अनंगहर्ष हा त्याच्या अगोदर झाला असावा. ज्याअर्थी यानें 'रत्नावली'चा आधार घेतला असें दिसतें त्याअर्थी त्याच्यामतें याचें नाटक ७-९ या शतकांच्या दरम्यान रचलेलें असावें.

तापसवत्सचरित्रामधील कथानक भासाच्या स्वप्नवासवदत्ताप्रमाणेंच आहे. पण यांत कांहीं नवीन गोष्टी दृग्गोचर होतात त्या येणेंप्रमाणें:

वासवदत्तेच्या मरणानंतर उदयन तपस्वी होतो. तसेंच यौगन्धरायणानें पद्यावतीच्या हातांत उदयनाची तसबीर ठेवल्यानंतर त्याच्यावर अनुरक्त झालेली पद्यावतीहि तपस्विनी बनते. वासवदत्ता व उदयन यांमधील संभाषणप्रवेश हा यांत आढळत नाहीं. दोघेहि मरणोत्सुक होत्साते एकमेकाला प्रयाग येथें शेवटीं भेटतात. नंतर एकमेकांचें निवेदन होतें, व रुमण्वताचा विलय झाल्याचें वर्तमान कळतें.