विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजमीर शहर - राजपुतान्यांतील अजमीर-मेरवाड प्रांतांतील एक मुख्य शहर. उत्तर अक्षांश २६०, २७' आणि पूर्व रेखांश ७४०, ३७' हें शहर मुंबईच्या उत्तरेस ६७७ मैल आहे. लोकसंख्या (१९११) ८६,२२२ इ.स. १८७९ सालापासून येथें आगगाडी झाल्यामुळें लोकसंख्या सारखी वाढत आहे. या शहराच्या इतिहासाविषयीं अजमीर मेरवाड पहा.
हें शहर तारागड डोंगराच्या पायथ्याशीं वसलेलें आहे. रुंद रुंद रस्ते व कांहीं इमारती सुंदर असून शहराभोवतीं एक दगडी तट बांधलेला आहे. त्यास पांच दरवाजे आहेत. तट हल्लीं सुस्थितींत नाहीं. तारागड डोंगरावर किल्ला बांधलेला असून किल्ल्याच्या टप्यांत शहर वसलेलें आहे. पायथ्यापासून किल्ला सुमारें १३००।१४०० फूट उंच आहे. इ.स.१८३८ सालीं किल्ला निकामी करण्यांत आला व इ.स.१८६० सालापासून या किल्ल्याचा उपयोग नसिराबाद आणि महू येथें असलेलें गोरें सैन्य उन्हाळ्यांत राहण्यास करतें; किल्ल्यांत मुसुलमान फकीर सय्यद हुसेन याची कबर आहे. शके १६६१ मध्यें दिल्ली घेतल्यानंतर नादीरशहा या पिराच्या दर्शनास येणार होता असा उल्लेख आहे (रा. खं ६-१३३,२४४). तो फकीर हा कीं मुइनउद्दीन हें सांगतां येत नाहीं. अजमीर येथें प्राचीन इमारती पुष्कळ आहेत अढाइ-दिनका झोंपडा नांवाची एक प्रसिद्ध मशीद बरी व जुनी आहे. प्रथमत: ही मशीद चव्हाण राजा विशालदेव यानें बांधलेली वेदशाळा होती परंतु महमद घोरीनें हीस मशिदीचें रूप दिलें. असे सांगतात कीं महमद घोरी या शाळेवरून जात असतां अडीच दिवसांनीं येथें परत आल्यावर त्या शाळेची मशीद झालेली असली पाहिजे व याच मशिदींत मी निमाज पढेन असे त्यानें फर्माविलें होतें. म्हणून या मशिदीस अडीच दिवसांचें झोंपडें असे नांव मिळालें आहे. मशीद हल्लीं चांगल्या स्थितींत आहे. दिल्ली जवळील कुतुबमिनार व ही मशीद साधारण एकाच वेळीं बांधलेलीं आहेत. अजमीर-पासून दहा मैलांवर पुष्कर तीर्थ नांवाचें प्रसिद्ध सरोवर आहे. (पुष्कर पहा).
अनासागर तलावाच्या बांधावर शहाजहान बादशहानें बांधलेलीं पांच संगमरवरी क्रीडागृहें फारच रम्य आहेत. यांपैकीं एकच मोडकळीस आलें असून बाकीचीं सुस्थितींत आहेत. पूर्वीं यांपैकीं तीन क्रीडागृहांत ब्रिटिश अंमलदार रहात असत. हल्लीं त्यांना पूर्वीच्या स्थितींत ठेवलें आहे.
दरगा ख्वाजा साहेब नांवाची दुसरी इमारत येथें पहाण्यासारखी आहे. हींत मुइनउद्दीन खिस्ती नांवाच्या फकीराची कबर आहे. हा सुमारें इ. स. १२३५ सालीं मरण पावला. येथें दरवर्षी रजब महिन्यांत उरूस भरत असतो. दरग्यांत अकबर, शहाजहान यांनीं बांधलेल्या मशिदी आहेत. अकबर बादशहानें बांधलेल्या मशिदींत चितोडच्या लुटींत मिळालेला चौघडा आणि पितळी समया ठेवलेल्या आहेत.
अजमीरचा किल्ला अकबरानें बांधला. किल्ला चौकोनी असून प्रत्येक कोंपर्यावर अष्टकोनी बुरुज आहेत. मोंगल बादशहा अजमीरास असतांना याच किल्यांत त्याचा मुक्काम असे. मराठ्यांच्या वेळीं हेंच त्या प्रांताचें मुख्य ठिकाण होतें. हल्लीं किल्ल्यांत तहशिलीची कचेरी ताहे. मूळ इमारतींत पुष्कळ फेरफार केल्यामुळें पूर्वीचें रूप् पार पालटून गेलें आहे. शहराभोंवतालचा तट याच वेळचा असून त्यास दिल्ली, मदार, उस्त्री, आग्रा आणि तिरपोलिया दरवाजे आहेत.
अनासागरपासून जवळच सतराव्या शतकांत जहांगीर बादशहाचे वेळीं तयार केलेला दौलत बाग असून त्यांत जुने पुष्कळ वृक्ष आहेत. त्यावर हल्लीं म्युनसिपालिटी देखरेख करीत असून गांवांतील लोकांचें फिरावयास जाण्याचें हें एक मुख्य ठिकाण आहे.
व्या पा र आणि उ द्यो ग धं दे - अजमीर हें एक महत्त्वाचें रेलवे स्टेशन आहे. येथें पुष्कळ नामांकित पेढ्या असून त्यांचा व्यापार आसपासच्या संस्थानांत चालतो व कांहींच्या शाखा हिंदुस्थानांतील सर्व मुख्य मुख्य शहरांत आहेत.
इ.स.१८६९ पासून येथें म्युनिसिपालिटी अस्तिवांत आहे. सन १९०२-३ सालीं हिचें उत्पन्न १८३००० रुपये होतें. येथें सन १८९१-२ च्या दुष्काळनिवारणार्थ काढलेल्या कामांत फॉय सागर तलाव बांधलेला असल्यामुळें गांवास पाण्याची सोय फार उत्तम झाली आहे.
शि क्ष ण - मेयो कॉलेज व सरकारी आर्टस कॉलेज या शिक्षणविषयक संस्था येथें आहेत. मेयो कॉलेजमध्यें संस्थानिकांचीं मुलें शिक्षण घेण्यास येतात.
अजमीर येथें तुरुंग व मोठें हॉस्पिटल आहे. राजपुतान्यांत भरभराटींत असलेलीं जी एकंदर नऊ शहरें आहेत त्यांत अजमीर हें दुसर्या नंबरचें शहर असून १८८१ पासून या शहराची संख्या प्रत्येक खानेसुमारींत वाढलेलीच दृष्टीस पडते. अजमीर व बिकानेर याखेरीज सर्व शहरांची लोकसंख्या कमी झाल्याचें आढळत असल्यामुळें अजमीर व बिकानेर येथील वाढ विशेष लक्षांत घेण्यासारखी आहे. शिवाय जननाची नोंद योग्य प्रकारें केली जात नाहीं असें असतांहि अजमीर शहराची लोकसंख्या वाढती असल्याचें खानेसुमारींत दिसत आहे. तथापि अजमीरच्या लोकसंख्येंत शेंकडा ४७ इतर संस्थानें व जिल्हे यांमधून आलेले बहिरागत आहेत हें लक्षांत घेतां खुद्द अजमीरांत जननापेक्षां मृत्यूच अधिक होत असावे असें अनुमान निघतें. बहिरागतांपैकीं सुमारें १/४ संयुक्त प्रांतांतील असतात. अजमीर हें बहुतेक सर्वजातीय वस्तीचें शहर आहे; सर्वांत अधिक लोकसंख्या मुसुलमान शेख जातीच्या लोकांची असून पुढें ब्राह्मण, पठाण, कोळी, महाजन, रजपुत, ख्रिस्ती, सय्यद, कायस्थ व इतर असा संख्यानुक्रम लागतो. बहुतेक बाहेरून येणारे लोक सहकुंटुंब येतात यावरून ते कायम वस्ती करण्याकरितां येतात असें दिसतें.
येथें तीन हॉस्पिटलें व एक नर्सिंग असोसिएशन आहे. दोन कॉलेजें, तीन हायस्कूलें, दोन मुलींच्या व कांहीं मुलांच्या शाळा, रेलवे टेक्निकल स्कूल वगैरे शिक्षणसंस्था आहेत. हिंदु, मुसलमान व यूरोपियन यांच्या इतर संस्था आहेत. येथें चार वर्तमानपत्रें निघतात. राजपुतान्यांत अनेक ठिकाणीं ज्यांच्या शाखा आहेत अशा व्यापारी कंपन्या येथें पुष्कळ आहेत. अजमीर जेलमध्यें सतरंज्या, गालीचे चांगले सुबक तयार होतात. येथील चंदनी फण्या व माळा प्रसिद्ध आहेत. दोन जिनिंगचे कारखाने, चार पिठाच्या गिरण्या, बर्फाचे दोन कारखाने व लोखंडी ओतकामाचा कारखाना येथें चालतो.
अजमीर शहर व त्याचें नांव यांची उत्पत्ति-कर्नल टॉइ म्हणतो {kosh Annals of Rajasthan. Vol I. p. ६६३ f.}*{/kosh} कीं पुष्कराचा अजपाल नांवाचा गुराखी चोहान राजा बुसिल्देव ( बीसल देव ) ह्याचा पूर्वज होता, व त्यानें हें शहर बांधिलें व ह्या शहराचें नांव त्याच्या नांवावरून पडलें. {kosh Archaeological Survey Reports Vol. II, p. २५२ ff }*{/kosh} किनिंगहॅमचें मत असें आहे कीं अजमीरची स्थापना चोहान अथवा चाहमान राजा अजयपाल ह्यानें केली. हा राजा इ. स. ८१९ पूर्वी होऊन गेला. कनिंगहॅमनें फेरीस्ताचा आधार घेऊन हें शहर फार प्राचीन आहे असें ठरविलें आहे; कारण फेरिस्ता '' अजमीरच्या राजाचा '' उल्लेख इ. स. ६८४ त करतो. गझनीच्या महमूदानें इ. स. १०२५ त सोमनाथवर स्वारी करतांना अजमीर लुटलें होतें.
राजपुताना {kosh Rajputana Gazetteer, Vol. II. p. १४ }*{/kosh} गॅझेटीअरमध्यें अजमीरच्या स्थापनेचा काल इ. स. १४५ व स्थापनकर्त्याचें नाव राजा अज, '' पहिला चोहान अन्हल याचा वंशज '' असें दिलें आहे.
प्रो. लासेन् साहेबांचा {kosh Indische Alterthumskunde. Vol III. p. १५१ }*{/kosh} असा तर्क आहे कीं ह्या शहराचें मूळचें नांव अजमीढ असें असावें व त्या नंतर त्या ठिकाणीं ' अजमीर ' असें पुढें नांव पडलें असावें. टॉलेमीनें ( सुमारें इ. स. १५० ) ह्याच शहराचा गगस्मिर ( Gagasmira ) ह्या नांवानें उल्लेख केलेला आहे,
नयचंद्राच्या हम्मीर महाकाव्यांत ( १.५२ ) चोहान वंशांतला चाहमान याचा तिसरा उत्तराधिकारी अजयपाल यानें अजयमेरु किल्ला स्थापिला असें लिहिलेलें आहे.
प्रबन्ध चिंतामणि {kosh Bombay edition of the Prabandhachinatamani P.५२ ff. }*{/kosh} नामक ग्रंथांत चाहमान राजांची एक आनामिक यादी छापलेली आहे. त्या यादींत चोहान वंशांतील चवथा राजा अजय राज ह्याला ' अजय मेरु दुर्गणारक: ' असें म्हटलेलें आहे. ह्या चोहान वंशाचा आरंभ सन ६०८ मध्यें झालेला आहे.
अजमीर हें शहर फार प्राचीन कालचें आहे ह्याविषयीं वर दिलेल्या सर्व प्रमाणभूत ग्रंथांचें एकमत आहे.
परंतु, डॉ.जे.मॉरिसन् साहेबांनी चाहमानांच्या वंशावरील लेखांत {kosh Vienna Or. Journal, Vol VII. p. I९१. }*{/kosh} '' विसावा राजा अजयराज अथवा सल्हण '' ह्याच्या खालीं पृथ्वीराजविजय नामक ग्रंथांतून एक लहानशी टिप्पणी दिलेली आहे. त्या टिप्पणींत {kosh Prithvirajavijaya. Sarga V, ७७, ९९, १००, १०२. }*{/kosh} ह्या राजानें अजयमेरु बांधिला असें विधान केलें आहे. ह्याप्रमाणें ह्या शहराची संस्थापना उत्तरकालीन आहे असें ठरविलें आहे.
अजय राजानें इ. स. ११०० ते ११२५ ह्या कालामध्यें अथवा त्या सुमाराला राज्य केलें असावें, आणि अजयमेरु त्याच सुमाराला बांधला असावा ह्याला प्रमाण असें आहे:-
अजयराजाचा मुलगा अर्णोराज ह्यानें गुजराथचा जयसिंह सिद्धराज ह्याची मुलगी कांचनदेवी इच्याशीं लग्न केलें {kosh पृथ्वीराजविजय सर्ग ७ }*{/kosh} ह्यावरून तो जयसिंह-सिद्धराज ह्याच्याशीं समकालीन असावा व त्यापेक्षां लहान असावा असें ठरतें. जयसिंह-सिद्धराजानें इ.स.१०९४ ते ११४३ पर्यंत राज्य केलें. जयसिंहाचा उत्तराधिकारी कुमारपाल ह्यानें अर्णोराज अथवा आनाक ह्याच्याशीं जयशाली लढाई केली. {kosh Gujarat Chronicles }*{/kosh} ह्या लढाईचा शेवट इ.स.११४९-५० अथवा ११५०-५१ मध्यें झाला. {kosh Epigraphia indica. Vol II p. ४२२ }*{/kosh} अर्णोराजाचा दुसरा पुत्र चवथा विग्रह अथवा वीसलदेव ह्याच्या अजमीराच्या अंकीत लेखाचा काल {kosh Indian Antiquary Vol. XX. P. २०१.The date is that of the incision of Vigraha's Harakelinataka. }*{/kosh} इ.स. ११५३ आहे. ह्यावरून दिसून येतें कीं अर्णोराज इ. स. ११५० व ११५३ ह्यांच्यामध्यें मरण पावला असावा म्हणून अर्णोराजानें बाराव्या शतकाच्या दुसर्या पादांत व त्याच्या बापानें इ. स. ११०० वि ११२५ ह्या कालामध्यें अथवा त्या सुमाराला राज्य केलें असावें.
पृथ्वीराजविजय हा ग्रंथ दुसर्या पृथ्वीराजाच्या काळीं म्हणजे बाराव्या शतकाच्या शेवटच्या पादांत रचिलेला आहे. हम्मीरमहाकाव्य १४ व्या शतकाच शेवटीं व फेरिस्ताची हकीगत १६ व्या शतकाच्या शेवटीं लिहिलेली आहे. ह्यावरून, व एकट्या पृथ्वीराजविजयांतच दिलेली चाहमानांची वंशावलि अंकित लेखांतील वंशावलीशीं जुळते असे डॉ. मॉरिसन साहेबांनीं म्हटलें आहे, ह्यावरून, ह्या ग्रंथाचें प्रामाण्य जास्त महत्त्वाचें आहे असें ठरतें.
प्राचीन अरब भूगोलशास्त्रवेत्ते ह्या अजमीर शहराचा उल्लेख करीत नाहींत. फक्त प्रभावकचरितांत {kosh XXII. ४२० }*{/kosh} ह्याचा उल्लेख आलेला आहे. अजमीर ही चाहमानराजांची राजधानी फेरिस्ताच्या वेळेस असावी. ह्या राजांची सत्ता पूर्व राजपुतान्यांत इ. सनाच्या ६ व्या शतकापासून होती. ह्यावरून फेरिस्तानें चुकीनें शाकम्भरीच्या चाहमानांना '' अजमीरचा राजा '' असें म्हटलें असावें. ह्या सर्व गोष्टींवरून पृथ्वीराजविजयांतलेंच विधान बरोबर आहे असें ठरतें.
तें विधान असें की शाकम्भरीचा विसावा चाहमान राजा अजय हा ह्या स्थलाचा संस्थापक होता व तें शहर उत्तरकालीन आहे असें म्हणणें इतिहासाला अनुसरुन आहे.
अजयमेरु नांवाचा अर्थ पृथ्वीराजविजयांत {kosh V १०० Indian. Antiquary. Vol XXVI P. P. 262-164 }*{/kosh} दिल्याप्रमाणें '' अजयराजानें केलेला मेरु '' असा आहे. अशीं दुसरीं पुष्कळ नांवें प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, जेसलमेरु, कमलमेर ( कुम्भलमेरु ), बाल्मेर अथवा बार्मेर् ( बाहडमेरु ), झांजमेर ( झांझमेरु ), अजमीरगड (अजयमेरुगढ) .
अजमीरचा मराठेशाहीशीं संबंध बराच येतो. (१) अजमीर सुभ्याची सुभेदारी मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे यांस दिल्लीचा बादशहा व मराठे यामध्यें (१७५०) झालेल्या कारारनाम्यानें मिळाली (रा. खं. १.१.४).
(२) जोधपूरवर स्वारी करतांना अजमीर हें महत्त्वाचें लष्करी ठाणें होतें. सन १७५८ त राजे विजेसिंग यांनीं अपाजी शिंद्याचीं ठाणीं काढून लावलीं होतीं, म्हणून मराठ्यांनीं अजमीरास जमून जोधपूर व मिरत ह्या तालुक्यांतील गांव जमीनदोस्त करून टाकिले. (रा. खं. १-४८-८८).
(३) पुढे तो सुभा होळकरास इनाम मिळाला असावा. शके १७६४ त पठाण दिल्लीवर येणार अशी बातमी आल्यामुळें पातशहानें शिंदेहोळकरांस मदतीला बोलाविलें. त्या मदतीबद्दल अजमीर सुभा मल्हाररावास पातशाहानें दिला ( रा. खं. ६. १. ८२)