विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनंत :- (१) परमेश्वर नाम (२) एक कद्रुपुत्र. (३) कधीं हें नांव शेषासहि लावतात. (४) अनंतचतुर्दशीस पूजा करून हातांत बांधावयाचा चौदा गांठींचा रेशमी दोरा यासारखाच दुसरा अनंती नांवाचा दोरा बायकांच्या डाव्या दंडाला बांधतात.
अ नं त व्र त :- अनंतव्रत हें एक प्रमुख भारतीय व्रत असून ह्याचें पालन दरवर्षी भाद्रपद महिन्यांतील शुध्द चतुर्दशीस करावयाचें ठरलेलें असतें. प्रत्येक कुटुंबांत हें व्रत चालत नसून दुसर्या कोणीं हें व्रत करावयास सांगितल्यास, किंवा अनंतदोरक कोठें सहजगत्या सांपडल्यास अगर हें व्रत वंशक्रमागत असल्यासच करावें लागतें. अनंत हें शेषशाई नारायणाचें अगम्य स्वरूप् असून त्याची कल्पना सर्परूपांत दर्शविली जाते.
ह्या अनंतव्रतांतील पूजेकरितां लागणारी अनंतशेषाची प्रतिमा दर्भाची करावी लागते, व चौदा प्रकारचीं फलपुष्पें ह्या पूजेस लागतात, त्याचप्रमाणें नैवेद्यास देखील निरनिराळीं चौदा पक्वान्नें लागतात. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचे दिवशीं कुटुंबांतील यजमानानें दिवसभर शुचिर्भूत राहून उपवास करून संध्याकाळीं पत्नीसह अनंतपूजा करावयाची असते, व त्या दिवशीं प्रसादाकरितां भोजनास शक्त्यनुसार आप्तेष्ट बोलाविण्याचीहि चाल आहे.
वरील दर्भाच्या अनंतमूर्तीबरोबरच बाजारांतून रेशमाचा व जरीनें सर्पाकृति केलेला असा अनंतदोरक आणवून त्याचीहि पूजा करावी लागते व पूजेनंतर हा दोरक पुढील वर्षापर्यंत, निदान कांहीं विशिष्ट कालमर्यादेपर्यंत हातांत बांधावा लागतो. अनंतव्रतपालनानें अनंत कल्याणाची प्राप्ति होऊन आपलें नष्ट ऐश्वर्य, संपत्ति किंवा राज्यें मिळतात असा समज आहे.
पांडव कष्टप्रद असा वनवास बारा वर्षे भोगीत असतां त्यांनीं एकदां श्रीकृष्णास आपल्या, नष्टैश्वर्याच्या पुन:प्राप्तीचा उपाय विचारला, त्या वेळीं श्रीकृष्णानें त्यांना अनंतव्रत रण्यास सांगितलें व ह्या व्रताचा प्रभाव दाखविणारी कथा सांगितली.
कृतयुगामध्यें सुमंतु नामक वसिष्ठ गोत्री ब्राह्मणानें भृगुऋषीच्या दीक्षा नामक कन्येशीं विवाह केला, व तिजपासून त्यास सुशीला नामक पवित्र व उदारप्रकृति मुलगी झाली. पुढें कालांतराने दीक्षा मृत झाल्यामुळें सुमंतूनें कर्कशा नामक एका अति दुष्ट व भांडखोर स्त्रीबरोबर विवाह केला. पुढें सुशीला उपवर झाली व तिच्या विवाहाबद्दल पित्यास काळजी वाटूं लागली. एकदां '' कौंडिण्य '' नामक ऋषि सुमंतूच्या घरीं आला. त्यावेळीं हा आपल्या मुलीस योग्य वर आहे असें जाणून सुशीलेच्या विचार घेऊन वरनिश्चिय केला. लग्नसोहळा योग्य रीतीनें पार पडला, व वधुवरें सुमंतूच्या घरीं दोन महिने राहिलीं. पुढें जाण्याची वेळ जवळ आली, त्यावेळीं सुमंतूस सुशीला व कौंडिण्य यांचा वियोग सहन न होऊन, त्याचप्रमाणें आपल्या दुष्ट पत्नीचा भांडखोर स्वभाव पाहून फार वाईट वाटलें. कौंडिण्यानें दोन तपस्व्यांनीं फार दिवस एका ठिकाणीं राहूं नये असें सुमंतूचें सांत्वन करून तेरा दिवस जास्त मुक्काम केला.
पुढें चौदाव्या दिवशीं जामात जावयाच्या वेळीं सुमंतूनें आपल्या कर्कशा स्त्रीस मेजवानीची तयारी करण्यास सांगितलें. परंतु त्या खाष्ट स्त्रीनें घर बंद केलें. कोंडिण्य व सुशीला यांनीं सुमंतूची रजां घेऊन रथांतून प्रयाण केलें. मार्गांत नदीकांठीं कांहीं सुवासिनी स्त्रिया उत्तमोत्तम वस्त्रालंकार धारण करून अनंतचतुर्दशीव्रत करीत असतांना पाहून सुशीला ही त्या व्रतांत सामील झाली. कोंडिण्य ऋषीनें आपलें नित्य अनुष्ठानसंपवून दोघांनीं रथांत बसून पुढील मार्ग धरला, व सरतेशेवटीं ते अमरावती नगरी जवळ येऊन पोहोंचतात, तोंच तेथील नागरिकांनीं त्यांचें आदरातिथ्य करून त्यास आपला राजा केलें व अशा रितीनें अनंतव्रताचा प्रभाव त्यांनां तत्काळ कळून आला.
एके दिवशीं सुशीलेच्या हातांत बांधलेला अनंतदोरक पाहून, कोंडिण्यास जिज्ञासा उत्पन्न झाली. तेव्हां सुशीलेचें बोलणें त्यास खरें न वाटून व कांही तरी जादूटोणा आहे असें वाटून त्यानें रागानें तो अनंत तोडून टाकला, व सुशीलेच्या विनवणीस न जुमानतां तो दोरा अग्नींत टाकला. सुशीलेस अत्यंत वाईट वाटून तिनें लागलीच अग्नींतून तो अनंत बाहेर काढून त्याचें पूजन केलें.
ह्या प्रकारच्या वर्तनामुळें कोंडिण्यास दारिद्य्र आलें, व आपलें राज्य, संपत्ति वगैरे सर्व त्यानें गमाविली. आपल्या मूर्खपणाचा पश्चात्ताप होऊन त्यानें मूर्तिमंत लक्ष्मीनारायणाचें दर्शन होईपर्यंत अन्नपाणी न घेण्याचा निश्चय केला. अशा रीतीनें ह्या दोघां पतिपत्नीनीं अनंताचा शोध लाविला व त्याचें पूजन केल्यावर पूर्वीचें सर्व वैभव त्यांस पुनश्च प्राप्त झालें; अशी कथा आहे.
अनंत :- (१) यानें कात्यायन श्रौतसूत्रावर टीका लिहिली आहे. ' प्रतिज्ञापरिशिष्ट भाष्य ' हा ग्रंथ अनंतानें लिहिला. देवभद्र व याज्ञिकदेव यांनीं अनंताच्या ग्रंथांतून उतारे घेतले आहेत. अनंतानें वसुदेव, कर्क, पितृभूति, यशोगोमिन् व भर्तृयज्ञ यांच्या ग्रंथातून उतारे घेतलेले आहेत. [ऑफ्रेक्ट-कॅट. कॅट. पीटरसन-रिपोर्ट ४ ]
(२) अनंताच्या पित्याचें नांव हरि होतें याचा अनंतसुधारस या नांवाचा पंचांगगणित ग्रंथ आहे. शककाल १४४७ असावा. ग्रंथ सूर्यसिध्दांतानुसारि आहे. मुहूर्तमार्तंडकार नारायण याचा पिता अनंतच असावा. पण याबद्दल संशय आहे.
[ शं. बा. दीक्षित-भारतीय ज्योति:शास्त्र ]
(३) कामधेनु या नांवाचा ग्रंथ शके १२७९ मध्यें महादेव यानें लिहिला या कामधेनु ग्रंथावर अनंताची टीका आहे. जातकपद्धति या नांवाचा अनंताचा एक जातकग्रंथ आहे. याचें गोत्र गार्ग्य होतें. व राहण्याचें ठिकाण विदर्भ देशांत धर्मपुरी येथें होतें. पुढें अनंत काशीस राहत असे. अनंताचा बाप चिंतामणि फार विद्वान असून ज्योतिषीहि होता. मुलाचें नांव नीलकंठ होतें. नीलकंठाचा तोडरानंद म्हणून एक ग्रंथ आहे. ताजिकावरहि नीळकंठाचा ग्रंथ आहे त्यास ताजिक नीळकंठी म्हणतात. नीळकंठाचा मुलगा गोविंद नांवाचा होता. जाहांगीर बादशाहाचे दरबारांत गोविंदाची मानमान्यता विशेष होती. धर्मपुर हें त्यांचें वास्तव्यस्थान विदर्भ देशांत असून केव्हांकेव्हां याला मातृपूर असेंहि म्हणतात. पीयूषधारा नांवाची टीका मुहूर्तचिंतामणीवर त्यानें केलेली होती. ताजिक नीळकंठीवर रखाला नांवाची टीका गोविंदचे नांवावर मोडतो.
अ नं ता ची वं शा व ळ.
|
---------------------------------
|
चिंतामणि ( गार्ग्यगोत्रे )
----------------------------
|
अनंत ( पत्नी पद्या)
|
------------------------------------------
| |
नीळकंठ ( पत्नी चंद्रिका ) राम
शके १५०१ शके १५१२-२
|
गोविंद ( पत्नी गोमती )
अ. श. १४५१
|
माधव
श. १५५५
[ शं. बा. दीक्षित-भारतीय ज्योति:शास्त्र ]-
(४) - जयराम स्वामी वडगांवकर यांचे शिष्य दोन. एक अनंत व एक गोपाळ. गोपाळांचा समाधि शक १६१२. दोघांनीं मिळून काव्य केलें आहे. दुसरे एक अनंत ( भट ) समर्थ शिष्य हे सातार प्रांतीं मेथवड येथील ( १५८०-१६४५ ). तिसरे रंगनाथ स्वामीचे शिष्यापैकीं कोणी असावे. ग्रंथ-ब्रह्मस्तुति, माधवगुण, दौपदीस्वयंवर, रुक्मिणीस्वयंवर, रुडगर्वपरिहार,रुद्रयामल. ( सं. क. का. सू. )
(५) - गुरु समर्थ. ग्रंथ-रामचरित्र, बब्रुवाहनाख्यान, सुधन्वाख्यान, सुलोचनाख्यान, सीतास्वयंवर, गोपीगीत, रामदासस्तुति, सुलोचनागहिंवर, लहुकुशाख्यान, श्रियाळचरित्र, सिंहध्वजाख्यान, गरुडगर्वपरिहार, गजगौरीव्रत, अहिल्योद्धार, अहिमहिआख्यान. [ सं. क. का. सू. ]
(६) - गुरु रंगनाथ. ग्रंथ-पदें. ( सं. क. का. सू. )
(७) - ग्रंथ- गरुडाख्यान, निर्वाणषट्क, पाळणे, भूपाळया, लहुकुशाख्यान, चक्रव्यूह. ( सं. क. का. सू. )
(८) - मंडनाचा मुलगा अनंत, यानें ''कामसमूह '' या नांवाचा ग्रंथ लिहिला. इ. स. १४५७.
(९) - अंतु-सोनार. ग्रंथ-कोल्हाटखेळ ( सं. क. का. सू. )