विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अदिति : अदितीचें वैदिक स्वरूप `वेदविद्या’ (पा. ३२५-३२६ ) विभागांत वर्णिलें आहे, पुराणांतून पुढील माहिती आढळते. कश्यप ॠषीच्या तेरा स्त्रियांतील ज्येष्ठ. ही, प्रचेतस दक्षाची कन्या असून हिला, आदित्यसंज्ञक बारा देव हे पुत्र होते ( महा० आदि० ६५ ).  मैनाक पर्वताच्या मध्यभागीं असणार्‍या विनशननामक तीर्थांच्या ठिकाणीं अदितीनें पूर्वीं चरु शिजविला होता असें प्रसिद्ध आहे (महा. वन. १३५). प्राज्योतिष नामक इतरांना अगम्य व अत्यंत अभेद्य असें एक असुरांचें नगर होतें यांत महाबळी भूमिपुत्र नरकासुर अदितीचीं रत्नमय कुंडलें हिरावून नेऊन राहिला होता. त्यास श्रीकृष्णानें जिंकून कुंडलें परत आणलीं (महा. उद्यो. ४८). कदंब कवीनें लिहिलेलें  दितिकुंडलाहरण नांवाचें एक नाटक वरील प्रसंगावर लिहिलेलें आहे.

श्रीकृष्णांनीं पूर्वीं अदितीच्या उदरांत सात वेळ गर्भरुपानें वास्तव्य केलें. आणि अदितीचीं जीं पृश्निप्रभृति रूपांतरें त्यांमध्यें तिच्या गर्भरूपानें निर्माण झालेला असा श्रीकृष्ण एकच आहे (महा. शांति. ४३).  पूर्वी देवयुगांत मोठमोठे महात्मे देव तीन लोकांचें अनुशासन करीत असतां अदितीनें पुत्रप्राप्तीसाठीं नित्य एक पायावर उभें राहून घोर व दुर्घट तपश्चर्यां चालविली आणि त्या योगें तिच्या उदरीं भगवान् विष्णु हा जन्म पावला (महा. अनु. ८३).