विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अखा - ब्रह्मदेशाच्या अगदीं पूर्वेकडील भागांत शान नांवाचीं संस्थानें आहेत त्यांच्या पठारावर राहणारी ही एक रानटी जात आहे. या संस्थानांत यांची लोकवस्ती सुमारे सवीस सत्तावीस हजार आहे. त्यांच्या भाषेवरुन ते तिबेटी ब्रह्मी असावेत असें दिसतें. यांचा चिनी लोकांशीं संबंध पुष्कळ दिवसांपासून असून कधीं कधीं त्यांचा यांचा लग्नव्यवहारहि होतो. चिनी लोकांपेक्षां हे थोडें उंच असून वर्णानें देखील काळे आहेत. हे कापूस व अफूची बोंडे यांची लागवड करतात. हे कुत्रे खाण्यात प्रसिद्ध आहेत. यांचा धर्म भुतांची व पूर्वजांची पूजा करणें हा असून ते मृतांचीं श्राध्दें करतात. मृतांस पुरण्यांत येतें, व त्यावेळीं टोणगा कापतात. (इं. गॅ. ५)