विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अछनेरा - संयुक्त प्रान्तांत आग्रा जिल्ह्यांत किरवाली तालुक्यांत हें एक शहर आहे. आग्रा राजपुताना रस्त्यावर अथवा राजपुताना माळवा व कानपूर अच्छनेरा रेलवेंच्या जंकशनवर उत्तर अक्षांश २७.१० व पूर्व रेखांश ७७.४६ मध्यें हें वसलेलें आहे. इ. स. १९०१ मध्यें लोकसंख्या ५७३५ होती. अठराव्या शतकांत जाट लोकांच्या वेळीं हें शहर पहिल्यानें महत्त्वास आलें. नंतर मध्यें र्हास पावून रेलवेचें जंक्शन झाल्यापासून हें पुन्हां महत्त्वाचें स्थान झालें आहे.
इ. स. १८५६ च्या २० कायद्याप्रमाणें येथें राज्यव्यवस्था चालविण्यांत येते. व्यापार म्हणण्यासारखा काही नाहीं. एक सरकी काढण्याचा कारखाना आहे. सरकी काढण्याकडे गुंतलेली माणसें १५० वर. तशीच एक प्राथमिक शिक्षणाची शाळा आहे.