विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अठरा धान्यें व उपधान्यें. अठरा मोठीं धान्यें म्हणजे गहूं, साळ, तूर, जव, जोंधळा, वाटाणा, लाख, चणा, जवस, मसूर, मूग, राळा, तीळ, हरीक, कुळीथ, सावा, उडीद, व चवळी. एका मजेदार संस्कृत श्लोकांत हीं सर्व धान्यें गोंविलीं आहेत. तो श्लोक असा :

गोधूम शालि तुवरी यव यावनाल
वातानलंक चणका अतसा मसूरा: ।
मुद प्रियंगुतिलकोद्रवका: कुलित्था:
श्यामाक माषचवला इति धान्यवर्ग: ॥

१८ उपधान्यें :- हीं दोन प्रकारांनीं मोजतात; ( १ ) संजगुरा; भादली; वरी; नाचणी; बरग; कांग; खपलेगहूं; मका; करडई; राजगिरा; मटकी; पावटा; मूग; वाल; कारळा; देवभात; सातू; अंबाडी.

(२) संजगुरा; नाचणी; वरी; मका; मटकी; राजगिरा; शिरस; पांढरफळी; जिरें; मेथी; वेणुबीज; देवभात; कमळबीज; पाकड; अंबाडी; भेंडीबीज; गोवारी; कुडयाचें बीज. कांहींजण खसखस व पांढरा राळा अशीं आणखी दोन उपधान्यें यांत मिळवून उपधान्यांची संख्या वीस धरितात.