विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजयगड शहर - मध्यहिंदुस्थानांतील अजयगड संस्थानचें राजधानीचें शहर. उत्तर अक्षांश २४.५४' व पूर्व रेखांश ८०.१८' इ. स. १९०१ मध्यें लोकसंख्या ४२१६.

सध्याच्या राजधानीला '' नवा शहर '' हें नांव आहे. शहराच्यावर किल्ल्याचे तट उंच आकाशांत वर गेलेले दिसतात. हा किल्ला, बुंदेलखंडांतील जे आठ प्रख्यात कोट आहेत, कीं ज्याच्या बळावर बुंदेल्यांनीं मुसुलमानांना दाद दिली नाहीं त्यांपैकीं एक आहे. इ. स. १८०० मध्यें बांडाच्या अल्ली बहादुरनें हा किल्ला नऊ महिने वेढा देऊन घेतला. पण इ. स. १८०३ मध्यें त्याच्याकडून तो लखमन दौवा याच्याकडे गेला व इ. स. १८०९ मध्यें कर्नल मार्टिन डेलनें तो जिंकून घेतला.

किल्ला '' केदार पर्वत '' नांवाच्या डोंगरावर बांधलेला आहे व तो समुद्रसपाटीपासून १७४४ फूट उंचीवर आहे. पन्नास फूट माथा सोडून चढण सोपी आहे पण पुढें एकदम सुळके आकाशांत गेलेले आहेत. पूर्वीच्या लेखांत या किल्ल्याला जयपुरदुर्ग असें म्हटलेलें आहे. हा ९ व्या शतकांत बांधला गेला हें नि:संशय आहे तरी पण अबुलफझल शिवाय कोणीहि याचा उल्लेख इतिहासांत करीत नाहीं. हा तिकोनाकृति आहे. याला पूर्वी पांच दरवाजे होते पण सध्यां तीन बुजवून टाकण्यांत आले आहेत. तट तीन यार्ड रुंदीचा आहे. वर पाण्याचीं टांकीं पुष्कळ आहेत. तीन जैन मंदिरें उध्वस्त स्थितींत अजून वर दिसतात. तीं १२ व्या शतकाच्या पद्धतीवर बांधलेलीं आहेत. चदेल राजांच्या वेळचे इ. स. ११४१ ते १३१५ चे दरम्यानचे पुष्कळ शिलालेख आढळून आले आहेत.

या डोंगरावर सागवान व तेंडुचीं झाडें पुष्कळ आहेत. व त्यामुळें किल्ल्याच्या सौंदर्यांत पुष्कळ भर पडते.

शहरांत एक प्राथमिक शिक्षणाची शाळा, टपालगृह, व दवाखाना आहेत. जी. आय. पी. रेल्वेवर हें एक स्टेशन आहे. तेथून महार्‍याला जाणारा चांगला रस्ता आहे. मोटार, टांगे, बैलगाड्या वगैरेंतून तेथें लोक जातात. नरैनी येथें डाक बंगला आहे. हल्लींच्या राजधानीला ' नौशहर ' ( नवें शहर ) असे नांव असून ज्या डोंगरावर किल्ला आहे त्याच्या उत्तर टोंकाला तें वसविलें आहे. (? आनोल्ड-गाईड १९२० )