विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अग्निमांद्य - अन्न न पचणें हें अन्नमार्गांतील व इतर इंद्रियाच्या रोगांचें एक लक्षण होय, व म्हणून वैद्यशास्त्रांत याला स्वतंत्र रोग मानीत नाहींत. परंतु ज्यांच्या इंद्रि- यामध्यें किंवा जठर, आंतडीं इत्यादि अन्नमार्गामध्यें कांहीं बिघाड न होतां ज्यांची अन्नपचनक्रिया सुरळीत चालत नाहीं व ज्यांना वरील अन्नामार्गाची दुर्बलता हेंच कारण लावतां येईल अशा रोग्यांची संख्या बरीच मोठी असल्यामुळें या लक्षणाचा येथें स्वतंत्ररीत्या विचार केला आहे. कारण शहरांतील अस्वाभाविक रहाणीमुळें हा सर्वसाधारण रोगच आहे असें बाह्यत: दिसतें. याचीं कारणें तर पुष्कळच आहेत. कित्येकदां असें होतें कीं हळूहळू प्रगट होणारा एखादा भयंकर रोग शरीरांत बिर्‍हाड करीत असतो. पण तो बाल्यावस्थेंत असल्यामुळें त्याचीं लक्षणें प्रामुख्यानें नजरेस न येतां तदनुषंगिक अपचन हेंच वरचेवर होऊं लागल्यामुळें अपचनाखेरीज आपणांस दुसरें कांही एक होत नाहीं असें रोग्यास वाटतें.

(१) अन्न सदोष असल्यामुळें होणारें अपचन:- यांत वाईट व जडान्न येवढेच दोष समाविष्ट नसून जें अन्न एरवीं खाल्ल्यानें हितवर्धक झालें असतें तें बेसुमार खाल्ल्यामुळें प्रकृति बिघडणें, अगर अनियमितपणानें, अगर वारंवार खाणें किंवा मोठालीं लंघनें सदा करणें यांचाहि समावेश होतो. भिन्न भिन्न माणसांनां कोणास कमी तर कोणास जास्ती त्यांचे प्रकृतिमानाप्रमाणें लागतें; इतकेंच नव्हे तर त्याच माणसाचा आहार वरचेवर परिस्थित्यनुरूप् बदलतो. उन्हाळ्याच्या दिवसांपेक्षां हिंवाळ्यांत अन्न जास्त जातें. नेहमीं बैठा रोजगार करणार्‍या लोकांपेक्षा ज्यांनां उघड्या हवेंत पुष्कळ श्रम होतील अशीं कामें करावीं लागतात त्यांचा आहारही मोठा असतो. दांत दुखरे अगर किडके असल्यामुळें, अगर जेवण लवकर आटपण्याची घाई असल्यामुळें अन्नचर्वण नीट न होणें हें एक फार महत्त्वाचें कारण आहे. याशिवाय जे पदार्थ आपण खातों ते पचनास हलके अगर जड स्वभावत:च असतात, अगर स्वयंपाकांत त्यांवर होणार्‍या भाजणें, उकडणें, तळणें, तेल, तूप, फोडण्या, मसाले इत्यादि संस्कारांमुळें ते तसे कधीं कधीं होतात. आपण पेय पदार्थ पितों ते सर्वच व सर्वांसच हितावह असतात असें नव्हे. चहा पिणें यासारखाही अपचन होण्यास उत्तेजक दुसरा पेय पदार्थ नाहीं. चहा सर्वांनां आवडत असेल पण मानवत मात्र नसावा. जेवतांनां अति पाणी प्याल्यानेंहि अपचन होतें. कारण जाठररसांत पाणी फार मिश्र झाल्यामुळें तो हीनवीर्य होतो, व अन्नपाचक अशी लाळेची उत्पत्ति कमी होते. यामुळें पोटांत अन्नास फार वेळ पचन होण्यासाठीं थांबावें लागतें. किडके दांत, व तोंडांत फोड, हिरड्यांतून रक्त, पू इत्यादि कारणांनीं मुखशुद्धींत बिघाड होणें हेंहि एक कारण आहे.

(२) इतक्या अन्नविषयक कारणांखेरीज रोग्यास होणार्‍या इतर कारणांमुळे अपचन होतें. कांहीं अनिष्ट, अशुभ बातमी येऊन थडकली कीं खाल्लेलें आपोआप पचविण्याची स्वाभाविक शक्ति स्तंभित होऊन उलट अन्न ओकून पडण्याचाहि संभव असतो. अशीच स्थिति मानसिक चिंता, भीति, गददग यामुळें उत्पन्न होते. शरीरयष्टीस येणार्‍या कमकुवतपणाचा परिणाम जठर व अन्नपचन यांवर होत असतो. कसरतीनें उदर छाती पोट इत्यादींचे स्नायु कमविले नसल्यास उदरांतील गात्रें व इंद्रियें शिथिल पडतात व त्यांचा भार पोटास जाणवतो. व अपचन होण्याची खोड अशामुळें जडते. लहानपणीं झालेल्या आंत्ररोगामुळें झालेली आंतड्याची गुंतागुंत हृदयदौर्बल्य, व त्यामुळें अपुरे होणारे रक्ताभिसरण, परिभ्रष्ट मुत्रपिंड यांपैकी कोणत्याहि कारणानें अपचनाची व्यथा सुरू होणें शक्य आहे, इतकेंच नव्हे, तर त्याबरोबर पोटशूल हेंही लक्षण असणें संभवनीय आहे. औषधोपचार व पथ्यपाणी सर्व संभाळूनही अपचन बरें होत नाहीं असा अनुभव आल्यास मूत्रपिंड बिघडले असावेत, अशा स्थितीचें तें लक्षण आहे. किंवा रोगी तरुण असून पंधरा वीस वर्षे उमरीचा असल्यास संधिवाताचें अगर कफक्षयाचें पूर्वचिन्ह आहे असें समजण्यास हरकत नाहीं. फार वर्षे अपचनानें अशक्त झालेला मनुष्य क्षयजंतूंच्या आकस्मित तडाख्यांत सांपडण्यास योग्य सावज असतो, हें जरी खरें आहे तथापि उलटपक्षीं हेंहि खरे आहे कीं मनुष्याला अगोदरच क्षय फुप्फुसांत झाला असतां बरें होण्यास अति चेंगट अशा प्रकारचें अपचन त्याबरोबर बहुधा असतें. यावरून हें ध्यानांत येईल कीं कोणत्याहि कारणानें मनुष्याच्या शरीरांत दौर्बल्यानें प्रवेश केला म्हणजे जठरादि पचनेंद्रियें विकृत न होतां देखील पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाहीं व या अपचनाचा प्रकृतीवर स्पष्ट परिणाम घडतो.

या अपचनाचीं लक्षणें :- हीं निरनिराळ्या कारणांमुळें भिन्न भिन्न रोग्यांमध्ये नानाप्रकारचीं असतात, व तीं सर्व येथें वर्णन करणें शक्य नसल्यामुळें त्यांतील प्रामुख्यानें सतत साधारणत: आढळणारीं लक्षणें येथें देतों :- जिभेस बुरशी असते, तोंडास दुर्गंधि असते, रुचि नसते, भूक लागत नाहीं, मळमळणें अगर ओकारी, उरांत दुखणें, पोटास तडस लागणें, वात धरून पोट फुगणें, आंबट ढेकरा येणें, घशाशीं जळजळणें, व पाणी घशाशीं येऊन तें तोंडावाटे पडणें, बद्धकोष्ट अगर अतिसार, इत्यादि या रोगाचीं मुख लक्षणें आहेत.

हा आजार फाजील खाल्ल्यानें नवीनच उद्‍भवला असेल तर होणारीं लक्षणें अशीं:- प्रथम पोट दुखूं लागून मळमळूं लागतें; नंतर डांचणारें अन्न वांति होऊन पडून जातें. व रोग्याला बरें वाटून तो पूर्ववत् निरोगी होतो. आम्लपित्तामुळें वांति होण्याची संवय असणार्‍या माणसांना वरील प्रकारचें अपचन केव्हां केव्हां होतें. पण जुनाट अपचनाचीं लक्षणें वेगळ्या प्रकारचीं असतात. जेवणांनंतर पोटांत कालवल्यासारखें होऊन पोटांत जड वाटं लागून तें दुखत तर नाहीं, पण त्यास तडस लागते. कधीं कधीं पोटदुखीही पण असते. अशा प्रकारचीं लक्षणें दर जेवणानंतर होतात किंवा कांहीं विशिष्ट प्रकारचें अन्न खाल्यानेंच होतात. किंवा पथ्य करा अगर न करा कांहींही जड किंवा हलका पदार्थ खाल्यानेंहि हीं लक्षणें होतात. याचा परिणाम असा होतो कीं जठरांत अन्न फार वेळ राहिल्याने तें आंबतें व पोटांत वात धरून कर्पट, आणि आंबट दुर्गंधियुक्त अशा ढेंकरा येतात. कधीं कढत आंबट अगर साधें किंवा कडू पाणी व त्यांत कांहीं शितें असें घशाशीं जळजळत येतें. व त्यानें तोंडास चुळ सुटतात. पुन: भोजन केल्यानें अमळ बरें वाटतें. पहिल्या सारखीं लक्षणें पुन: होऊं लागतात. खाण्याची वखवख सुटते किंवा क्षुधा मंद असते, किंवा भलत्याच पदार्थावर वांछा जाते. पोटाची विकृति जिभेवरुन लागलीच कळते. जठर व अन्नमार्ग दुर्बल झाला असतां जीभेस तवकीलासारखी पांढरी बुरशी येते. कडा व शेंडा लाल असून वरील खवले स्पष्ट दिसत असलेली जीभ पोटांत दाह आहे असें सुचविते. फिकट रंगाची व बिलबिलीत जीभ असल्यास पोष्टिक औष- धाची गरज आहे असें ती सुचविते. जितकें अपचन जुनाट तितका बद्धकोष्ठ होण्याचा संभव अधिक असतो, व नवीन विकार असतां अतिसार होऊन जुलाब होतात. पुष्कळदां तर असें होतें कीं त्या अपचानाचे पीडेपेक्षां इतर लक्षणें शरीराच्या अन्य भागांत जीं होतात त्यांनींच रोग्यास अधिक पीडा होते. उदाहरणार्थ:- उरांत दुखणें, दम लागणें, छाती धडधडणें, डोकेंदुखी, चक्कर व भोंवळ, दृष्टिमांद्य, हातपाय गार वाटणें व अतिग्लानि हीं लक्षणें या रोगांत फार करून असतातच. शिवाय मेंदूवर परिणाम होतात ते असे:- निद्रानाश, चिरडखोरपणा, औदासिन्य, उद्वेग रोग इत्यादि.

उपचार:- याविषयीं सामान्य सूचना थोडक्यांत येणें प्रमाणें:-अन्नामध्यें इष्ट फेरफार करणें हें पहिलें कर्तव्य होय. रोग्याचें वय, पाचनशक्ति, व त्याच्या काम धद्याच्या मानानें होणारी शरीराची झीज याचें मनन करून अन्न कमी करावें किंवा नाहीं हें ठरवावें. जेवढें अन्न खरोखरी हवें त्यापेक्षां अन्न कमी खाण्याचे ऐवजीं अंमळ जास्तच खाण्याकडे माणसांची प्रवृत्ति खास असते यांत शंका नाहीं. आणि ज्यांना ही अपचनाची पीडा आहे त्यांनीं पूर्ण भूक शांत होण्याचे अगोदर उठावें हाच नियम चांगला आहे.

जेवणानंतर तें पचन होण्यासाठीं चारसहा तास तरी जाऊं देऊन मग पुन: खावें. पण वरचेवर खाणें जसें वाईट तसें वरचेवर व बराच वेळ उपसा करणें हेंहि वाईट आहे. आपणाला जें अन्न मानवतें, व पचतें असें ठाऊक आहे तेंच अन्न खावें व ज्यानें अपचन होतें असें ठाऊक आहे तें मिष्टान्न असलें तरी वर्ज्य केलें पाहिजे. एकास जें पचतें तें दुसर्‍यास पचेल असा नियम नसतो. अशा माणसांनी नैट्रोजनयुक्त पौष्टिक अन्न वर्ज करून पिष्टान्न अधिक सेवन करावें व अपचन ज्या मानानें कमी होत जाईल त्या मानानें हा नियम पाळण्यांत ढिलाई केली तरी चालेल. जेवणाचे अगोदर एक अगर दोन भांडीं कढत पाणी अशा रोग्यांनीं प्यावें. जेवतांना पाणी बहुतेक पिऊंच नये. जेवणाचे अगोदर पाणी प्याल्यानें पहिली घाण धुऊन जाऊन जठर रस उत्पन्न होण्यास उत्तेजन मिळतें व मग अन्न पचन उत्तम होतें. अतिसावकाशपणें जेवून चर्वण उत्तम होऊं द्यावें. लाजूं नये. मानेचा मागील भाग, पोटाचा पुढील भाग व पोटर्‍या हीं गारठूं न देण्याची खबरदारी घ्यावी. कारण हीं गरम ठेवल्यानें अन्नपचन चांगलें होतें. पायमोजे घालावेत, व पोटास दोन तीन वेढे येतील असा गरम पट्टा बांधावा. फोडण्या, मसाले, चमचमीत केलेलें अन्न तळकट तेलकट पदार्थ न खातां साधें अन्न खात जावें. व तेंहि पचत नसल्यास कांहीं दिवस दुधावर रहावें. पण तें दुध तरी बेतानेंच पीत असावें. कोणी स्वयंस्फूर्तीनें अगर डाक्टरी सल्ल्यामुळें अन्नपचनासाठीं थोडें मद्य सेवन करितात. पण एकंदरींत त्यापासून तोटेच फार आहेत म्हणून त्यास कधीं स्पर्श करू नये. जेवणाचे अगोदर व नंतर पुरेशी विश्रांति असावी. ज्या मार्गानें एकंदर प्रकृति सुधारेल अशी व्यवस्था ठेवावी. म्हणून उघड्या हवेंत व्यायाम करावा. सकाळीं निजून लवकर उठावें व थंड पाण्यानें प्रात:स्नान करावें. हा नियम फार उत्तम आहे.

औषधोपचार :- हा विषय वैद्यशास्त्राचा व वैयक्तिक असल्यामुळें वरील नानाविध कारणांनीं होणार्‍या अपचनास लागू पडणारें असें विस्तृत वर्णन देणें येथें अशक्य आहे. परंतु कांहीं उपयुक्त औषधींचे गुणधर्म व उपयोग देतों ते असे:- बायकार्बनेट आफ सोडा हें औषध जेवणापूर्वी कडवट पाचक औषधाशीं ( काडेकिराईत ) मिश्र करून दिल्यानें भूक लागते. व जेवणानंतर दोनतीन तासांनीं दिल्यास, त्यापासून कर्पट  ढेंकरा, आम्लपित्त यांचा नाश होतो. बिसमथयुक्त औषधें दाहयुक्त अजीर्णांत देण्यास चांगलीं. तीं द्रव्यरूपानें किंवा पुड्या अशा दोन्ही तर्‍हेनं देतां येतात. मज्जाशक्ति वाढवून अन्नपचन सुधारण्यास कुचला, किंवा त्याचें सत्त्व हीं औषधें उत्कृष्ट आहेत. जडान्न किंवा साधें जेवण पचविण्यास हायड्रोक्लोरिक आसिड व पेपसिन हीं औषधें आहेत. पण वांती हें लक्षण त्रासदायक झाल्यास इन्ग्लूव्हीन नांवाचें पाचक औषध उपयोगी पडतें, पिष्टान्न पचत नसल्यास डायास्टीज अगर माल्ट, किंवा पोपयीचें पिकलेलें फळ, अगर पॅपेन नामक त्याचें सत्व यांपैकीं एक अगर अधिक पदार्थ देणें चांगलें. पोटांत व आंतड्यांत अन्नरस आंबूं नये. यासाठीं सल्फोकार-बालेट ऑफ सोडा हें औषध चांगलें आहे व अशीं दुसरींही थोडीं औषधें आहेत. पोटांत अन्नरस कुजल्यामुळें वारा धरुं नये यासाठीं जंतुघ्न अशीं बिसमथ सालीसिलेट, बेटानपथोल हीं औषधें चांगला गुण दाखवितात. ही सर्व औषधें अगर दुसरीं कोणतींहि देशी अगर विलायती औषधें किती जरी उत्तम असलीं तरी तज्ज्ञ माणसास आपली प्रकृति दाखवून मग घेत जावीं.

या रोगाबद्दल आर्य वैद्यकीय विवेचन येणेंप्रमाणें:-अजीर्ण म्हणजे खाल्लेलें अन्न व पान हीं न जिरणें. अन्नादिक न जिरल्यानें जे रोग होतात त्यांचें वर्णन अष्टांग हृदय अ. ८ या प्रकरणांत केलें आहे.

अन्नाचें रसादि धातूंत योग्य रीतीनें रूपांतर न होतां विकृत अन्नरसानें जे रोग होतात ते अजीर्णाचे रोग असें मानतात.
सामान्यतः वातिक, पैत्तिक, व श्लोष्मिक असें तीन प्रकारचें अजीर्ण मानतात. या अजीर्णविकारापासूनच विषूचिका, आमदोष, अलसक, इत्यादि रोग उत्पन्न होतात. शौचाला न होणें किंवा जास्त होणें, ग्लानी येणें, अपान वायू न सुटणें, पोट फुगून जडपणा येणें, व भोंवळ, हीं अजीर्णाचीं, सामान्य लक्षणें आहेत. शौचाला न होणें, वातिक अजीर्णांत पोट दुखणें, शौचाला साफ न होणें, पोट फुगणें व आंग गळणें हीं लक्षणें होतात.

पित्ताचे अजीर्णास विदग्धाजीर्ण म्हणतात. व तहान, मोह, भोंवळ, आंबट ढेकर, व दाह हीं लक्षणें असताता. ह्याच अजीर्णानें अल्मवित्त नांवाचा विकार होतो.

कफाचे अजीर्णांत डोळे व गाल यांस सूज येते व नुकतें जेवल्याप्रमाणेंच ढेंकर येतात. तोंडाला पाणी सुटतें, मळमळतें, व जडपणा येतो. याशिवाय रसाजीर्ण म्हणून चवथें एक अजीर्ण मानलें आहे, यांत अन्नरसाचें धातूंत रूपांतर पूर्ण रीतीनें झालेलें नसतें त्यामुळें ढेंकर शुद्ध आली तरी भोजनाविषयीं अप्रीति, हृदयांत थोडी पीडा, व जडपणा हीं लक्षणें होतात. हीं वर सांगितलेलीं चार प्रकारचीं अजीर्णें फार वाढली असतां बेशुद्धी, बडबड, ओकारी, तोंडाला पाणी सुटणें, आंग गळणें, भोंवळ, हे उपद्रव ( रोगानंतर झालेले रोग ) होऊन मरण सु़द्धां येतें. अलसक, विषूचिका, व विलंबिका या रोगांस अन्नादिकांचे अजीर्णच कारणीभूत होतें.

अतिशय जेवण करणार्‍या दुर्बल माणसानें वारंवार फार खाल्लें असतां त्या अन्नांच्या अजीर्णानें वातादि दोष कुपित होऊन अपक्व अन्नांतच मिसळून त्या अपक्क अन्नास बाहेर टाकूं लागल्यास विषूचिका (या रोगाचीं व हल्लींच्या कॉलर्‍याचीं लक्षणें सारखीं आहेत ) व तें अपक्व अन्न आंत सांठल्यास अलसक असे रोग उत्पन्न होतात.

यांपैकीं विषूचिकेचें वर्णन खालीं लिहिल्याप्रमाणें. टोंचणें, फोडणें इत्यादि नाना प्रकारच्या वेदना. सुयांनीं टोंचल्याप्रमाणें ज्यांत होतात त्या रोगास विषूचिका असें म्हणतात. ''सुचीभिरिव-गात्राणिविध्यतीतिविषूचिका''॥ या रोगांत ओकार्‍या व जुलाब फार मोठ्या प्रमाणांत होतात व वायूचें आधिक्य असेल तर पोट दुखणें, भोंवळ, पोट फुगणें, कंप, हीं लक्षणें होतात. पित्ताधिक विषूचिकेंत ताप, अतिसार, अंतरिंद्रियांत दाह, तहान, डोळ्यांपुढें अंधेर्‍या येणें, हीं लक्षणें होतात. कफाधिक विषूचिकेंत ओकारी, आंग जड होणें, बोलतां न येणें, थुंकी फार सुटणें, इत्यादि कफाचीं लक्षणें होतात.

अग्नि मंद असणार्‍या, व वेगांचें ( मलमूत्रादि ) धारण करणार्‍या दुर्बल मनुष्यानें खाल्लेलें अन्न दोषांनीं दुष्ट होऊन तें शल्याप्रमाणें पोटांत एकाच जागीं सांठतें. त्या दुष्ट अन्नाच्या भोंवतीं कफ असतो. यामुळें त्याचा मार्ग अडतो, व आंतले आंत वायु घुसळतो. यामुळें पोटदुखी, पोट फुगणें, इत्यादि विषूचिकेंतील दोषलक्षणें ज्या दोषाचें आधिक्य असेल त्याप्रमाणें सुरू होतात. या विकारांत दुष्ट अन्न आळशी मनुष्याप्रमाणें एके जागींच असतें यामुळें या विकारास अलसक असें म्हणतात.

या अलसक विकारांतील आमदोष अतिशय दुष्ट होऊन शरीरांतील सर्व छिद्रांत शिरुन राहतात. त्यामुळें दांडक्याप्रमाणें सर्व शरीर ताठतें, त्या विकारास दंडकालसक म्हणतात. या विकारानें लौकर मरण येतें. यावर औषध यशस्वी होत नाहीं.

विषूचिका व अलसक हे दोन्ही रोग त्रिदोषजन्य असून बरे होण्यास कठिण आहेत.

आपणास न पचेल इतकें पुष्कळ खाणें हें अजीर्ण विकारांस मुख्य कारण आहे; तथापि कांहीं वेळां थोडें खाल्लें (असतांही अजीर्ण करतात. ते पदार्थ येणेंप्रमाणें.) आपणास न आवडणारें अन्न, वातकारक विशषत: ज्यानें पोट फुगतें असें हरभरे, पावटे, इत्यादि अन्न, भाजकें अन्न, कच्चे पदार्थ, जड अन्न, मलिन, थंड व  रूक्ष अन्न, तसेंच कोरडें किंवा विदाही, (घशाशीं जळजळणारें) अन्न व फार पातळ अन्न हीं थोडीं खाल्लीं तरी पचत नाहींत.

अतिशय भूक लागल्यामुळें किंवा शोक व क्रोध यांनीं चित्त संतंप्‍त झालें असतां थोडें खाल्लेलें अन्नही पचत नाहीं.

पथ्यकारक अन्न व अपथ्यकारक अन्न हीं दोन्ही एकाच वेळीं खाल्लीं असतां त्यास '' समशन '' म्हणतात. जवेल्याबरोबर थोड्याच वेळांत पुन्हां जेवणें यास '' अध्यशन ''
म्हणतात.

अवेळीं ( अर्थात् जेवणाची वेळ नसतां ) थोडें किंवा पुष्कळ जेवणें यास विषमाशन म्हणतात. हीं तिन्ही प्रकारचीं जेवणें घोर असे अजीर्ण विकार उत्पन्न करून मृत्यु आणतात.

अजीर्ण विकारानें ज्याचे दांत, ओंठ, नखें, हीं काळीं झालीं आहेत, ज्याचे डोळे खोल गेले आहेत, जो ओकारीनें पीडला आहे, ज्याची शुद्धि नष्ट झालेली आहे, ज्याचा आवाज बसला आहे व ज्याचे सर्व सांधे ढिले पडले आहेत तो असाध्य होतो.

ढेंकर शुद्ध येणें, उत्साह असणें, आंग हलकें वाटणें, लघ्वी, शौच  इत्यादिकांचे वेग चांगले येणें, (शौचाला, लघ्वीला, साफ होणें) भूक व तहान चांगलीं लागणें, हीं लक्षणें आहार जिरल्याचीं आहेत.

अजीर्ण हा रोग स्वतंत्र व परतंत्र असा दोन्ही प्रकारचा असल्यामुळें प्रथम त्याची नीट परीक्षा करून औषधोपचार करावे. परतंत्र म्हणजे दुसर्‍या रोगामुळें उत्पन्न झालेला असल्यास त्याची अधिक चौकशी करावी. व स्वतंत्र असल्यास प्रथम लंघन करावें. एवढ्यानें काम न भागल्यास पाचक औषधें घ्यावींत व दोष जास्त असल्यास पाचक औषधांचाही उपयोग होत नाहीं. तसें झाल्यास ओकारीचीं व रेचनाचीं औषधें (म्हणजे शोधन औषधें) घ्यावीं.

अजीर्णाचाच अलसक या नांवाचा विकार झाला असल्यास ताबडतोब ओकारीचें औषध द्यावें. शेकावें. मळ आणी वायु यांचे अनुलोमन करणार्‍या वाती गुदद्वारांत घालाव्या. हात पाय वळूं लागल्यास शेकून ऊबदार फडक्यांनीं घट्ट बांधावेत.

विषूचिका झाली असतां खोंटा डागाव्या, उपसा करावा, व रेचक दिलेल्या माणसाला ज्याप्रमाणें क्रमानें अन्नावर येऊं द्यावें लागतें त्याप्रमाणें प्रथम मंड वगैरे देऊन अग्नी प्रदीप्‍त झाल्यावर नेहमीचें अन्न खाऊं लागू द्यावें व अजीर्णाच्या पहिल्या अवस्थेंत कोणतेंही पाचक औषध देऊं नये कारण त्या औषधानें पचन न होतां अजीर्ण वाढतें.